सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेयां ॥197॥ जन्ममृत्यूंची भाख । हारपोनी जाय निःशेख । आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥198॥ मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरे म्हणों न शके ॥199॥ तवं तुझें नामचि जी आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनि ॥200॥ आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥201॥ हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा । कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ॥202॥ तुंवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मा ॥203॥ या पार्थाचिया बोला । सर्वांगें कृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥204॥ ऐसा पतिकराचिया तोषाआंतु । प्रेमाचा वेग उचंबळतु । तो सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ॥205॥
श्रीभगवानुवाच :- हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥19॥
मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता । कीं म्हणतसे बा पांडुसुता । भलें केलें ॥206॥ अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । अंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें ॥207॥ परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥208॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…
अर्थ
ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निरास होतो आणि अढळ अशी नित्यता आपणास प्राप्त होते. ॥197॥ ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढू लागते ॥198॥ मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर, सेवन करणारा आपण स्वत: परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत ते तू मला देत असताना, माझे चित ‘पुरे’ असे म्हणू शकत नाही. ॥199॥ महाराज, आपले नावच आम्हास आधी आवडते, आणि शिवाय आपली भेट होत असून आपले सान्निध्य प्राप्त झालेले आहे. त्याशिवाय, आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात. ॥200॥ आता हे सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे! तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि, मी इतके मात्र समजतो की, आपणास विचारलेल्या गोष्टींची पुनरुक्तीही झाली तरी हरकत नाही (पण ती पुन्हा तुम्ही सांगा). ॥201॥ अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणाता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणार्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय? ॥202॥ तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात, ते आम्ही मूर्तिमंत नादब्रह्मच अनुभविले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात आम्ही चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास घेत आहोत ना! ॥203॥ अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला आणि म्हणाला, हा अर्जुन, भक्ती आणि ज्ञान यांचा मळा झाला आहे. ॥204॥ याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्यांच्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले (ते ऐका), ॥205॥
श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत, त्यापैकी मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरुश्रेष्ठा, माझ्या (विभूतींच्या) विस्ताराला अंत नाही. ॥19॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ब्रह्मदेवाचे आपण वडील आहो, हे श्रीकृष्णास माहीत असूनही याची आठवण त्यांच्या चित्ताला होईना आणि ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना ठीक केलेस. ॥206॥ कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला ‘बाबा’ असे म्हणाले, यात आम्हाला काही आश्चर्य करावयाचे कारण नाही. (हे पाहा,) तो स्वत: नंदाचे मूल झाला नाही काय? ॥207॥ परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहो, ते तू ऐक. ॥208॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…


