वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती जो । योगरूप ॥1॥ सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥2॥ कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥3॥ तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जें आडमुठीं तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रे म्हणितलें । हें न पुसों तूंतें ॥4॥ तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जे अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥5॥ हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं ये ॥6॥ परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैसें पाहेल । तेवींचि येरु से घेईल । म्हणौनि बिहे ॥7॥ परि आपण चित्तीं आपुलां । निकियापरी संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥8॥ तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें । आतां आदरेंसी बोलणें । घडेल तया ॥9॥ तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥10॥ तैसें गीतार्थाचें सार । जे विवेकसिंधूचें पार । नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥11॥ जें आदिप्रकृतीचें विसवणें । जे शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥12॥ तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजेल म्हणोनि परिसावा । चित्त देउनी ॥13॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसें मनपण मुदल जाये, मग अहंभावादिक कें आहे…
अर्थ
मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला – ‘पाचव्या अध्यायात दाखवलेला) जो योगरूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील, तो ऐका. ॥1॥ श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले, त्याच समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो. ॥2॥ दैव किती थोर आहे हे कळत नाही! ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे आणि पाण्याचा घोट घेऊन त्याची रुचि पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे, असे कळावे. ॥3॥ तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. कारण, मिळण्याचा संभव नसताना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, ‘आम्ही तुला ही गोष्ट विचारीत नाही.’ ॥4॥ या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने या वेळी घेरले आहे, असे कळून आले. ॥5॥ हे लक्षात येऊन संजय मनात हसला आणि आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेला आहे. एर्हवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे. ॥6॥ पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार? जन्मांधाला कसे उजाडेल? (पण ही गोष्ट धृतराष्ट्रास तशी उघडपणे सांगितली तर) तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. ॥7॥ पण तो मात्र आपल्याला कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खूष झाला. ॥8॥ त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल ॥9॥ ते संजयाचे सहाव्या अध्यायातील बोलणे, हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली ॥10॥ त्याप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलिकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय. ॥11॥ जो मूळ मायेचे विश्रांतिस्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत आणि ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, ॥12॥ असा हा सहावा अध्याय आहे, शिवाय, तो अलंकारांनी सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐकावा. ॥13॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तूं परिससी, परिसोनि अनुष्ठिसी…


