वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत.
अध्याय पहिला
मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सोवती ||16|| प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसे एकवटत इभ | मस्तकावरी ||17|| उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ||18|| अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥19|| हे तिन्ही एकवटले | तेथें शब्दब्रह्म कवळलें । तें मियां गुरुकृपा नामलें । आदिबीज ॥20॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ॐ नमो जी आद्या…
अर्थ
पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रे हीच त्या (गणपतीच्या) दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच त्यांचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात. 16. वर सांगितलेल्या श्रुति- स्मृत्यादिकांत प्रतिपादिलेली तत्त्वे हीच (गणपतीच्या) अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून, ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिली आहेत. 17. ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादि दशोपनिषद् सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या 18. ॐकाराची मुकुटावर चांगली शोभतात. प्रथम अकारमात्रा, हे (गणपतीचे) दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा, हे त्याचे मोठे पोट आहे; आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. 19. ह्या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद कवटळला जातो. त्या बीजरूप ॐकारूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. 20.
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा