वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
तुजसीं अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल । तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥234॥ म्हणवूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥235॥
यद्यप्यते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । कुलक्षयकृत दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥38॥ कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥39॥
हे अभिमानमदें भुलले । जरी पां संग्रामा आले । तर्ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥236॥ हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ॥237॥ हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां । तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥238॥ असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ॥239॥ का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनि । जाळूं सके ॥240॥ तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात । हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ॥241॥ ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥242॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः । धर्मे नष्टे कुलं कृत्सनमधर्मोऽभिभवत्युत ॥40॥
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥243॥ तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥244॥ म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजि ॥245॥
हेही वाचा – Dnyaneshwari : त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ…
अर्थ
(हे श्रीकृष्णा!) तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग सांग; आमचे काय राहीले? तुझ्यावाचून त्या दुःखानेच आमचे हृदय दुभंग होईल. ॥234॥ एवढ्याकरिता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत, हे राहू दे; ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला. ॥235॥
लोभाच्या योगाने अंतःकरण भ्रष्ट झालेल्या यांना (कौरावांना) कुलक्षय केल्याने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक जरी दिसत नाही, ॥38॥ तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष ढळढळीत दिसत असताना आम्हालादेखील, हे जनार्दना, या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव का असू नये? ॥39॥
हे कौरव अभिमानाच्या मदाने बहकून जाऊन जरी लढण्याकरिता आले आहेत, तरी पण आम्ही आपले हित (कशात) आहे, हे पहिले पाहिजे. ॥236॥ आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे, हे असे (भलतेच) कसे करावे? जाणूनबुजून कालकूट कसे घ्यावे? ॥237॥ महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला, तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे. ॥238॥ असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर, देवा, त्यात काय लाभ आहे? सांग बरे. ॥239॥ किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही, तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकील. ॥240॥ त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष (आमच्या) अंगावर आदळू पाहात आहेत; हे समजत असताही, या कामी कसे प्रवृत्त व्हावे? ॥241॥ त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक, मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो. ॥242॥
कुलक्षय झाला असता सनातन असे कुळधर्म नाश पावतात आणि धर्माचा नाश झाला असता अधर्म सर्व कुल व्यापून टाकतो. ॥40॥
ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. ॥243॥ त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी जर एकमेकांचा वध केला, तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावते. ॥244॥ म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या (कुळ) धर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्ये अधर्मच माजतो. ॥245॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसियांतें कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं…
क्रमश: