वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत.
अध्याय पहिला
आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।।21।। मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु | म्हणऊनि विशेष अत्यादरु | विवेकावरी ।।22।। जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ||23।। कां चिंता- माण जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ||24|| म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे । जैसे मूळसिंचन सहजें । शाखापल्लव संतोषती ।।25।। कां तीर्थं जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्राव – गाहनीं । ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ।। 26 || तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ।। 27 ।।
हेही वाचा – Dnyaneshwari : ॐ नमो जी आद्या…
अर्थ
आता त्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो. 21. ज्यांनी मला या संसारपुरांतून तारिले, ते सद्गुरु माझ्या हृदयांत आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. 22. ज्याप्रमाणे डोळयांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टि फाकते आणि मग (भूमिगत) द्रव्याचा सहज सुगावा लागून मोठा खजिना (दृष्टीला) प्रकट होतो; 23. अथवा ज्याप्रमाणे चिंतामणि हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात. त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्रीनिवृत्तिनाथांमुळे पूर्ण झाले आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. 24. एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो, गुरूला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते; 25. अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसाचे सेवन घडते; 26. त्याप्रमाणे (श्रीगुरुवंदनात सर्वांचे वंदन येत असल्यमुळे) मी त्याच श्रीगुरूला वारंवार पूज्यताबुद्धीने नमन केले. (कारण की,) तो इच्छिलेल्या आवडी पुरविणारा आहे. 27.
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : द्वैताद्वैत तेचि निकुंभ