वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥7॥ भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः । अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥8॥
आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक । ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥103॥ उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्हीआदिकरूनी । मुख्य जे जे ||104|| हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ।।105।। या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्व होय संहरे । हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ।।106।। एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं ।।107।। समितिंजयो सौमदत्ति । ऐसे आणीकाह बहुत आहाती । जयांचिया बळा मिती । धाताही नेणे ॥108॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः । नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥9॥
जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जे अस्त्रजात | एथूनि रूढ ||109|| हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं । परी सर्व प्राणें मजचिलागीं । आराइले असती ।।110॥ पतिव्रतेचें हृदय जैसें । पतीवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥111॥ आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें । ऐसें निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥112॥ झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती । हें बहु असो क्षात्रनीती । एथोनियां ||113|| ऐसें सर्वांपरी पुरते । वीर दळीं आमुतें । आतां काय गणूं यांतें । अपार हे ||114||
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणे पांडवसैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें…
अर्थ
हे द्विजश्रेष्ठा, आपल्या बाजूचे असलेलेही माझ्या सैन्याचे जे प्रसिद्ध नायक आहेत. (त्यांची काही नावे) तुमच्या दिग्दर्शनार्थ मी सांगतो ऐका. 7. आपण स्वतः आणि भीष्म, कृपाचार्य आणि समितिंजय, अश्वत्थामा, विकर्ण, त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र (भूरिश्रवा). 8.
आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत, ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो, ऐका. 103. तुम्ही आदि करून जे जे मुख्य मुख्य (वीर) आहेत, त्यापैकी एकदोन नावे केवळ संक्षेपाने सांगून टाकतो 104. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण. 105. या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती आणि संहार होऊ शकतात. फार कशाला? हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का? 106. येथे विकर्ण वीर आहे. तो अलीकडे अश्वत्थामा पाहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो. 107. समितिंजय आणि सोमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाहीं. 108.
आणखी इतरही अनेक वीर माझ्याकरिता जिवावर उदार झालेले, नाना प्रकारच्या शस्त्रांनी लढणारे अणि सर्वही युद्धशास्त्रामध्ये प्रवीण असे आहेत. 9.
ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, (अस्त्रांच्या) मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे? जेवढी म्हणून अस्त्रे आहेत, तेवढी सर्व यांच्यापासून रूढ झाली आहेत. 109. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत; यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जिवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. 110. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पतीवाचून इतराला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. 111. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम आणि उत्तम स्वामीभक्त आहेत. 112. हे युद्धकलाकुशल असून युद्धकौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे! क्षात्रधर्म (मूळ) यांच्यापासूनच (उत्पन्न) झाला आहे. 113. याप्रमाणे सर्व अंगांनी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यांत आहेत, आता यांची गणती काय करू? हे अपार आहेत. 114.
हेही वाचा – Dnyaneshwari : जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु…