वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥28॥ ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि | नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ।।29।। कीं परमधाम प्रकट | सर्व विद्यांचें मूळपीठ । शास्त्रजातां वसिष्ठ । अशेषांचे ॥30॥ ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदेचें ।।31।। नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्कारोनी महामती | व्यासाचिये ||32|| म्हणोनि हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥33॥ तेवींचि आइका आणीक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधी कोवळीक | दुणावली ||34॥ एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ।।35।। माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ||36 || एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा | म्हणऊनि जनमेजयाचें अवलीळा | दोष हरले ||37|| आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक | गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ।।38।।
हेही वाचा – Dnyaneshwari : ॐ नमो जी आद्या…
अर्थ
आता (ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची) खोल विचारांनीं भरलेली कथा (तिचें माहात्म्य) ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षाचा अपूर्व बगीचाच आहे; 28. अथवा, ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांताचा मोठा साठा आहे किंवा शृंगारादि नवरसरूपी अमृतानें तुडुंब भरलेला असा हा समुद्र आहे; 29. किंवा, ही (कथा) प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान (ब्रह्म) असून सर्व विद्यांचे मुख्यस्थान आहे; त्याचप्रमाणें संपूर्ण शास्त्रांमध्येही श्रेष्ठ आहे; 30. किंवा ही (कथा) सर्व धर्मांचे माहेरघर आहे; सज्जनांचा जिव्हाळा आहे; सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचे भांडार आहे; 31. अथवा, व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून, सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे. 32. म्हणून हा महाभारतग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे; या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. 33. याच प्रमाणे याची आणखी एक महति ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आणि त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली. 34. येथे चतुरता शहाणी झाली, तत्त्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले, 35. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा आणि योग्य वस्तूंना आलेला रूढपणा, यापासूनच चांगला दिसू लागला. 36. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली. पुण्याला विशेष तेज चढले आणि म्हणूनच (भारताच्या पठणाने) जनमेजयाचे दोष सहज नाहीसे झाले; 37. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की, रंगांमध्ये सुरंगतेची वाढ येथे झाली आहे, आणि यामुळेच सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त आले आहे. 38.
हेही वाचा – Dnyaneshwari : द्वैताद्वैत तेचि निकुंभ