अध्याय आठवा
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥26॥
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणऊनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥238॥ कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥239।। पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनियां अडवीं । रिगवत असे ॥240॥ जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥241॥ म्हणोनि फुडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अवसरें कहीं ॥242॥ एऱ्हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम । जन्में अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥243॥ जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटें धूम्रपंथें पडलियां । तरी संसारपांतीं जुंतलियां । भंवतचि असावें ॥244॥ हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे । म्हणोनि योगमार्ग गोमटे । शोधले दोन्ही ॥245॥ तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे । परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥246॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आंत अग्निज्योतींचा प्रकाशु, बाहेरी शुक्लपक्षु परी दिवसु…
अर्थ
जगाचे प्रकाशरूप आणि अंधकाररूप (म्हणजे अर्चिरादि आणि धूम्र) असे हे दोन मार्ग नित्य आहेत. पहिल्या मार्गाने मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही, पण दुसर्याने पुन्हा जन्म पावतो. ॥26॥
हे अर्जुना, अशा या अनादी कालापासून चालत असलेल्या दोन वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ आणि एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत ॥238॥ कारण की, आपल्या हिताकरिता योग्य-अयोग्य मार्ग पाहावे, खरे-खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे आणि अनहित कशात आहे, हे समजून घ्यावे ॥239॥ असे पाहा की, चांगली नाव (होडी) डोळ्यांपुढे दिसत असून (तीमध्ये न बसता) कोणी अथांग पाण्यात उडी घालील काय? अथवा राजमार्ग माहीत असून, कोणी आडरानात शिरेल काय? ॥240॥ विष आणि अमृत हे जो ओळखतो, त्याच्याने अमृत टाकवेल काय? त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो, तो आडमार्गाला जाणार नाही. ॥241॥ म्हणून खरे आणि खोटे, याची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही (अकाली देह पडणार नाही). ॥242॥ तसे केले नाही तर मरणाकाळी या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचे मोठे संकट आहे की, जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला, तो हेतू व्यर्थ जाईल. ॥243॥ अर्चिरादी मार्ग चुकून, अकस्मात जर धूम्रमार्गात (शरीर) पडले तर, संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. ॥244॥ हे (पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे) मोठे सायास पाहून, आता हे सायास कशाने एकवार दूर होतील (हे पाहावे). म्हणून हे दोन्ही मार्ग नीट रीतीने दाखविले ॥245॥ तर एका मार्गाने (अर्चिदादी मार्गाने) ब्रह्मत्वास जाता येते, आणि (दुसऱ्या धूम्रमार्गाने) पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्यास येईल, (त्याला त्या मार्गाची गती मिळेल.) ॥246॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ…


