Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जैं चोकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये…

Dnyaneshwari : जैं चोकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये…

अध्याय आठवा

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥16॥

एऱ्हवीं ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियांचें जैसें । पोट न दुखे ॥152॥ नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें । तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥153॥ एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ॥154॥ जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी । विळोनि पांतीं उठी एकसिरी । चवदाजणांची ॥155॥

सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः। रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥17॥

जैं चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये । आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ॥156॥ येवढे अहोरात्र जेथिंचे । तेणें न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥157॥ येरां सुरगणाची नवाई । विशेष सांगावी येथ कांई । मुदला इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥158॥ परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें । आपुलिया डोळां देखते । आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥159॥

अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे । रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥18॥

भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥19॥

तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये । ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ॥160॥ पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ॥161॥

हेही वाचा – Dnyaneshwari : देहवैकल्याचा वारा, झणें लागेल या सकुमारा…

अर्थ

अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकींचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत. हे कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. ॥16॥

सहजच विचार करून पाहिले तर, ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी, त्यास पुन्हा पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही ॥152॥ अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले, ते पुरुष संसारबंधनात सापडत नाहीत. ॥153॥ एरवी, जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य आणि स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक (ब्रह्मदेवाचा लोक); ॥154॥ ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही (तर, ज्या गावच्या) एका दिवसात एकसारखी चौदा इंद्रांची पंगत उठते, (चौदा इंद्र होऊन जातात) ॥155॥

एक सहस्र युगे (चार युगांच्या सहस्त्र चौकड्या) झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय आणि एक सहस्र युगे राहणारी (ब्रह्मदेवाची) एक रात्र होय. असे जे जाणतात ते (ब्रह्मदेवाचे) अहोरात्र जाणणारे होत. ॥17॥

चार युगांच्या जेव्हा हजार फेर्‍या होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो आणि पाहा, त्याच प्रमाणे हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते, ॥156॥ ज्या ठिकाणचा दिवस आणि रात्र एवढी मोठी आहेत, त्या काळात जे मरत नाहीत, ते भाग्यवान हा दिवस (आपल्या डोळ्यांनी) पाहातात, ते स्वर्गातील चिरंजीव होत. ॥157॥ इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे आहे! मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पाहा की, ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा होतात. ॥158॥ परंतु ब्रह्मदेवाच्या आठा प्रहारांना आपल्या डोळ्यांनी पहाणारे जे आहेत, त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रींना जाणणारे म्हणावेत. ॥159॥

ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्त नामक वस्तूमध्ये त्या वस्तू लीन होतात. ॥18॥

हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय (याप्रमाणे) पुन: पुन्हा जन्मून पराधीन होऊन, रात्र सुरू झाली की, लय पावतो आणि दिवस सुरू झाला की, (पुन्हा) जन्मतो. ॥19॥

त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो, तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही, असे लीन असलेले जग आकाराला येते. ॥160॥ पुढे दिवसाचे चार प्रहर संपले की, हा आकारसमुद्र आटतो आणि पुन्हा पहाटे तसाच आकारसमुद्र भरावयास लागतो. ॥161॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!