अध्याय आठवा
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च । मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥12॥
परी हें तरीच घडे । जरी संयमाचीं अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती ॥112॥ तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरु न संडी ॥113॥ तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥114॥ तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें । जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ॥115॥ तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । मग लग्नीं जेवीं ॐकारू । बिंबींचि विलसे ॥116॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् । यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् ॥13॥
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे । मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥117॥ म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म । जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ॥118॥ यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥119॥ तेथे अर्जुना जरी विपायें । तुझां जीवीं हन ऐसें जाये । ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥120॥ इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥121॥ ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें । तेथ काह्याचेनि अंतकःरणें । प्रणव स्मरावा ॥122॥ तरि अगा ऐसिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं । पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥123॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जें गगनाहून जुनें, जें परमाणुहूनि सानें
अर्थ
सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाचे ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन, ॥12॥
परंतु जर सर्वेंदियांच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. ॥112॥ मग ज्याप्रमाणे हात-पाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभावत:च कोंडलेले मन अंत:करणात स्वस्थ राहील. ॥113॥ अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता, मग प्राणवायूचा ॐकार करून (प्राणाने ॐकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो,) त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्ध्निआकाशापर्यंत आणावा. ॥114॥ तेथे मूर्ध्निआकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल, अशा अर्धवट स्थितीत, धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत अकार, उकार आणि मकार या तीन मात्रा अर्धमात्रारूप ॐकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत, ॥115॥ तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्निआकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ॐकार अर्धमात्रेत जसा शोभतो (लयास पावतो) तसा तो प्राण मूर्ध्निआकाशात शोभतो (लयास पावतो). ॥116॥
ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असता आणि माझे स्मरण करीत असता, जो देहाचा त्याग करून जातो, तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. ॥13॥
तेव्हा ॐ हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ॐकार स्मरण्याचे राहिले की, जे पूर्णब्रह्म तेच काय ते एक राहाते. ॥117॥ म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे आणि जे एकाक्षर ब्रह्म आहे, ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करत असताना ॥118॥ जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो, तो ज्या (ब्रह्म) प्राप्तीपलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करावयाची नाही, त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. ॥119॥ येथे अर्जुना, कदाचित तुझ्या मनात असे वाटेल की, (अंतकाळी हे स्मरण करावे, हे खरे परंतु) मग अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? ॥120॥ कारण इंद्रिये आपापली कामे करण्यास असमर्थ स्थितीत असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन, आत-बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर ॥121॥ मग त्यावेळेस योगसाधनेस कोणी बसावे? आणि इंद्रियांचा निग्रह कोणी करावा? आणि कोणत्या अंत:करणाने ॐकाराचे स्मरण करावे? ॥122॥ तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर, अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. ॥123॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें…


