Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितरक्ताच्या नात्यापलीकडचे स्नेहबंध

रक्ताच्या नात्यापलीकडचे स्नेहबंध

सुनील पानसरे

भाग – 2

माझे पूर्वाश्रमीचे सहकारी सरदेसाई यांच्या विनंतीनुसार मी श्री. स्वामी (सरदेसाई यांचा वृद्ध मित्र) यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सरदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी ज्या परिसरात राहात होते, त्या भागात मी आधी अनेक वेळा गेलो होतो, पण आज परिस्थिती थोडी वेगळी होती. मी जर एका वयोवृद्ध व्यक्तीबद्दल चौकशी करू लागलो तर, इथल्या लोकांना ते पचनी पडेल की नाही, याची मला कल्पना नव्हती. यात एक अशी भीती होती की, कोणाला तरी भलताच संशय यायचा! पण माझ्या या शोधाला यश आले. एका किराणा दुकानदारामुळे ते कुठे राहतात हे समजले. पण त्यांना मागील तीन-चार दिवसांत स्वामी दिसले नव्हते…

काहीतरी वाईट घडलं असावं, अशीच घंटी माझ्या मनात वाजूही लागली. घाबरत घाबरतच मी फ्लॅटच्या दारावरची बेल वाजवली आणि उत्तराची वाट बघू लागलो. दोन मिनिटांनी पुन्हा बेल वाजवली. पण आतून काहीच प्रतिसाद नाही! आता काय करायचं? शेजाऱ्यांना विचारायचं का? की आणखी थोडा वेळ वाट पाहायची? मी विचार करत होतो, तेवढ्यात सोसायटीचा सुरक्षा-गार्ड मला शोधत आला. मी फाटकावरच्या रजिस्टरमध्ये नोंद न करता सोसायटीमध्ये शिरलो असल्याचं कुणीतरी त्याच्यापर्यंत पोहोचवलं होतं.

मी त्याला माझी रामकथा ऐकवली तर, तो लगेच म्हणाला, “अहो, स्वामीकाका दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत राहायला.” मी त्याला विचारले की, “मग मागील दोन-तीन दिवस त्यांचा फोन का लागत नव्हता?” तर तो म्हणाला, “घर बदलायच्या गडबडीत काकांचा मोबाइल हरवला कुठेतरी…”

हुश्श, अखेर आता हे कोडं सुटायला लागलं होतं!

तेवढ्यात गार्डने मला त्यांच्या मुलाचा नंबर दिला, ज्याच्याबद्दल सरदेसाई सर मला काहीच बोलले नव्हते. मी तो नंबर सरांना पाठवला. सरांनी तो नंबर बघून मला त्वरेने कॉल केला आणि म्हणाले, स्वामी यांना मुलगा किंवा मुलगी नाहीतच! आता मात्र मी बुचकळ्यात पडलो. इकडे गार्ड म्हणतोय स्वामींना सामान हलवण्यासाठी त्यांच्या मुलाने आणि मुलीने मदत केली. सर म्हणताहेत त्यांना मुलंबाळंच नाही. काय चाललंय हे!

सर्व गोष्टी माझ्या डोक्यावरून जात होत्या. जर स्वामी एकटे राहत असतील, तर मग त्यांना सामान हलवायला मदत कोणी केली? गार्ड ज्या मुलीला ‘मुलगी’ म्हणत होता, ती कोण होती? मधल्या काळात सरांनी त्या नंबरवर कॉल केला आणि खात्री केली की, स्वामी ठीक आहेत आणि त्यांच्या नवीन घरी आराम करत आहेत. माझा जीव भांड्यात पडला… सर पण खुश होते, त्यांच्या मित्राची खुशाली कळल्यामुळे. त्यांनी मला मनःपूर्वक धन्यवाद दिले!

पण आता माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जे काही चालू होतं, ते नक्की काय आहे, हे मला सरांकडून जाणून घ्यायचं होतं. जणू काही माझ्या मनातलं सरांपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी मला स्वामींबद्दल सांगायला सुरुवात केली…

स्वामी खूप वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे आणि त्याला मुंबईसारख्या चांगल्या शहरातच राहायचं होतं. त्यामुळे स्वामी यांनी आपला लांबच्या उपनगरातला फ्लॅट विकून आणि निवृत्तीची रक्कम जोडून आमच्या जवळच्या उपनगरात दोन बेडरूमचा नवीन फ्लॅट घेतला. साधारण दीड कोटी रुपये खर्च केले होते. नंतर मुलाने त्यांच्याच ऑफिसमधल्या एका मुलीशी लग्न केलं आणि एका वर्षातच आई-वडिलांना घराबाहेर काढलं. स्वामी आणि त्यांच्या पत्नी जवळच्या भागातच फ्लॅट भाड्याने घेऊन राहू लागले. पण आपल्या एकुलत्या एका मुलाने आपल्याला घराबाहेर काढल्याचं दुःख त्यांची पत्नी फार दिवस सहन करू शकली नाही आणि त्या लवकरच देवाघरी गेल्या. स्वामी प्रचंड खचले होते. इथपर्यंत सरांना सगळं माहीत होतं. पुढची माहिती सरांना स्वामींच्या नवीन मुलाने दिली.

त्याने सांगितलं, त्यावेळी स्वामींना त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलामुलींमध्ये एक नवीन आशा दिसली. त्यांनी त्यांचं शिक्षण, करिअर यासाठी मदत केली. त्या दोन्ही मुलांनी खूप कष्ट करून, स्वामींच्या मदतीने, स्वतःच पदवीच शिक्षण पूर्ण केलं. जॉबसुद्धा मिळवले. ती मुलं स्वामींना खूप मान देत असत, त्यांची देखभाल करत असत.

आता मला कळलं की, सोसायटीच्या गार्डने ‘मुलगी’ म्हणून जिचा उल्लेख केला ती मुलगी म्हणजेच स्वामींनी मदत केलेली ती मुलगी होती! हे दोघे स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणेच स्वामींची पण काळजी घेत होते. घरी पोहोचता पोहोचता त्या मुलाचा मला कॉल आला, सरांनी नंबर दिला होता त्याला. त्याने मला सर्वकाही संगितलं. त्याने मला सांगितले की, स्वामींनी त्यांच्या अंतिम संस्कारांची जबाबदारी त्या दोघांवर सोपवली आहे, त्यांच्यासाठी ते दोघेच खरे वारसदार आहेत.

काय सुंदर नातं जुळलं होत तिघांचं! खूप भरून आलं मला.

मी अत्यंत खुशीत घरी परत आलो. पण त्या दिवशी रात्रभर याच विचारांनी माझी झोप उडाली होती की, आपल्या वृद्ध आई-वडिलांना कुणी घराबाहेर कसं काढू शकत! किती वाईट आहे हे!! पण, स्वामींना त्यांचं नवीन कुटुंब मिळालं. त्यांची पुण्याई थोर आहे. देव स्वामींना निरोगी ठेवो आणि त्यांच्या नवीन मुलांना खूप यश देवो!

समाप्त

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!