Wednesday, August 6, 2025

banner 468x60

HomeललितMother and son : आईची कहाणी

Mother and son : आईची कहाणी

पराग गोडबोले

शनिवार होता. आठवडा संपायला काहीच तास शिल्लक होते. उद्या सुट्टी. लेकाला, खरेदीला आणि बाहेर जेवायला न्यायचं कबूल केलं होतं मी. वाट बघत होता तो याची, बऱ्याच दिवसांपासून. बेत ठरले होते आमचे, धमाल करायचे. एक दिन बेटे के नाम!

तेवढ्यात पडद्यावर ईमेल झळकला. उद्या काही महत्त्वाच्या कामांसाठी सगळ्यांना ऑफिसला बोलावण्याची दवंडी होती. मेल येताच माझं अवसानच गळालं, लेकाचा हिरमुसलेला चेहरा नजरेसमोर दिसायला लागला मला. किती आनंदात होता तो, आईसोबत संपूर्ण दिवस मिळणार, कधी नव्हे तो, म्हणून!

नवरा गेल्यानंतर त्याला सांभाळताना, आई आणि बाप अशा दोन्ही जबाबदऱ्या पार पाडत होते मी. लेकाचं आणि माझं एक नवीनच नातं आकाराला आलं होतं या काळात, अगदी लोभस असं. दुसऱ्या लग्नाचे आईबाबांकडून येणारे इशारे आणि सूचना धुडकावून लावत त्याच्याच विश्वात रममाण झाले होते मी, स्वतःला विसरून.

उद्याचा मनमोकळा रविवार आवश्यक होता दोघांनाही आम्हाला, पण पाणी फिरलं होतं सगळ्याच मनोरथांवर…

सुस्कारा सोडला आणि त्याला हे कसं सांगावं हे या विवंचनेत गुरफटले. या रविवारच्या बदल्यात दुसरं काहीतरी द्यायलाच लागणार होतं त्याला. काय करावं, याचा विचार करत होते. सुचली एकदाची युक्ती आणि गेले साहेबांकडे. म्हणाले, “सर पुढच्या म्हणजे दुसऱ्या शनिवार रविवारला जोडून एक सुट्टी घ्यायचा विचार आहे, चालेल का? कामं संपतायत तोवर सगळी.”

दिलदार साहेब आमचे! म्हणाले, “अवश्य घ्या, पण जायच्या आधी तेवढे रिपोर्टस् संपवून जा.”

हेही वाचा – Indra Nooyi Book : सॅनिटरी पॅड, एक प्रवास….

क्या बात! पिसासारखी तरंगत केबिनमधून बाहेर पडले. उद्या रविवारी ऑफिसला यायचा मानसिक शीण मागे पडला आणि मन उत्फुल्ल झालं. पटापट Make My Trip app उघडलं आणि महाबळेश्वरच्या एका मस्त रिसॉर्टचं पॅकेज घेऊन टाकलं… दोन रात्री तीन दिवसांचं. होऊ दे खर्च! लाडक्या लेकासाठी काय पण!!

पुणे – महाबळेश्वर बसचं तिकीट पण काढून घेतलं लगोलग Red Bus वर. सगळं अगदी क्लिक क्लिक करत, फटाफट.

अगदी आनंदात, आवरून घरी जायला निघाले. लेकाचा चेहरा दिसत होता मला नजरेसमोर. उद्याच्या एका दिवसाच्या बदल्यात तीन दिवसांचा धमाका कळल्यावर आनंदलेला.

महाबळेश्वर मला नेहमीच आवडतं. तिथलं वातावरण, बाजार आणि एकूणच निसर्ग भावतो मला खूप. शनिवार, रविवार असते गर्दी… पण ठीक आहे, त्रास नाही करून घेतला मनाला की, सगळं सुरळीत होतं. मी गावापासून थोडं लांबचं हॉटेल घेतलं होतं, गर्दीपासून थोडीशी सुटका मिळवण्यासाठी.

Engineeringच्या पहिल्या वर्षाला असलेला लेक माझा. कॉलेज, प्रात्यक्षिकं, submissions यामध्ये अखंड बुडालेला. त्याला पण छान वाटेल हे surprise, अशी  खात्री होती अगदी माझी.  होता थोडासा आईवेडा तो अजूनही. त्याच्या वयाच्या खंडीभर मैत्रिणी होत्या त्याला, पण माझं स्थान अजूनही थोडंसं वर होतं त्यांच्या… हे आपलं माझं मत. बदलत जाणार होतं हे हळूहळू, म्हणूनच त्याच्या माझ्या नात्यातले हे लोभस क्षण समरसून जगण्याचा हा माझा अट्टाहास होता.

हेही वाचा – Sanitary pads : विल्हेवाटीची समस्या अन् सामाजिक प्रगल्भतेची गरज

घरी गेल्यावर, बराच वेळ दार वाजवूनही ते काही उघडलं नाही गेलं, मग मी माझ्याकडच्या किल्लीनं दार उघडलं, तर बच्चमजी भले थोरले हेडफोन्स कानाला लावून थिरकत होते, बेभान. मला बघताच Thumbs up चं चिन्ह दाखवलं मला आणि थिरकणं सुरूच राहिलं तसंच, अखंड.

तब्बल दहा मिनिटं वाट बघितली मी त्याचा नाच थांबण्याची, पण तो काही थांबेना. शेवटी मीच त्याच्या दंडाला धरून थांबवलं. ‘काय कटकट आहे,’ असे भाव झळकले त्याच्या चेहेऱ्यावर, काढले हेडफोन्स आणि खेकसला.. “काय आहे?” जणू त्याचा बापच बोलतोय असा भास झाला मला. वाण नाही पण..

“अरे ऐक ना.. उद्या मला ऑफिसला जायचंय. सगळ्यांनाच बोलावलंय, महत्त्वाचं काम आहे…”

त्याचा चेहरा कोरा! “जा की मग. मी बघेन जेवायचं काय करायचं ते. नको काळजी करूस…”

मला जसं वाटलं होतं तसं काहीच घडलं नव्हतं. मी आपली उगाचच, त्याला किती वाईट वाटेल बेत फिस्कटला म्हणून याचा विचार करत बसले होते, पण त्याच्या बोलण्यावरून एक कळलं, आई फक्त जेवणापुरती. बाकी तिचा उपयोग शून्य!

तरीही हार न खाता, चिकाटीनं मी त्याला म्हणाले, “अरे ऐक ना… पुढच्या शनिवार, रविवारला जोडून मी सुट्टी घेतलीय सोमवारी. आपल्या दोघांचं महाबळेश्वरचं बुकिंग केलंय दोन दिवसांचं. मस्त मजा करू आपण. उद्याच्या रविवारची भरपाई म्हणून!”

“काय गं आई! मला विचारायचं तरी, हे उपद्व्याप करताना. आम्ही ट्रेकला जाणार आहोत पुढच्या शनिवार-रविवारी. एक ग्रुप आहे आमचा, मस्त जमलेला. मला नाही जमणार महाबळेश्वर… त्यातूनही, आता तुझ्याबरोबर महाबळेश्वरला वगैरे गेलो तर सगळे हसतील मला, बोळ्याने दूध पितोय अजून म्हणून! लहान आहे का मी आता?”

टचकन् पाणी तरळलं माझ्या डोळ्यात. खरोखर, त्याला न विचारता परस्पर सगळं ठरवण्याचा अगोचरपणा केला होता मी, नक्कीच. त्याचं स्वतःचं एक विश्व असेल स्वतंत्र, याचा विचार आलाच नव्हता मनात माझ्या. लेक मोठा झालाय आता, ही जाणीवच नाही झाली मला. बोट धरून नाचणारा, बागडणारा, प्रत्येक गोष्टीत आईचा सल्ला घेणारा, अगदी दहावीच्या निकालानंतर, पहिल्यांदा मलाच वाकून नमस्कार करणारा आणि पेढा भरवणारा लेकच मला नजरेसमोर दिसत होता.

सुस्कारा सोडला… माझी सगळी मनोरथं धुळीला मिळाली होती. हतबल आणि अगतिक होऊन मी आवरायला गेले. उद्या हॉटेल आणि बसची आरक्षणं रद्द करावी लागणार होती. आर्थिक नुकसान तर होणार होतंच, त्यापेक्षा जास्त भावनिक नुकसान सोसावं लागणार होतं मला.

हातपाय तोंड धुवून, कपडे बदलून, चहाचा कप घेऊन मी बसले निवांत. बसलेला धक्का जरा बोथट झाला होता. मनाशी विचार केला, ‘हे आज ना उद्या होणार होतंच की, एवढं काय दु:ख वाटून घ्यायचं त्यात.’

तेवढ्यात लेकाच्या खोलीतून त्याच्या बोलण्याचा आवाज कानी पडला. “अरे, मला नाही जमणारेय पुढच्या शनिवारी ट्रेकला यायला. आईबरोबर बाहेर जायचंय जरा. तुम्ही जा सगळे, नाहीतर आपण त्याच्या पुढच्या शनिवारी जाऊ. सॉरी!”

मी बाहेर बसलेय आणि ऐकतेय, हे त्याच्या गावीही नव्हतं, पण त्याचे ते शब्द ऐकून फार बरं वाटलं मला. ते भाव चेहेऱ्यावर दिसू न देता, मी आपला चहा घेत राहिले, घोट घोट! जणू मी त्या गावचीच नाही.

चहा झाल्यावर मी माझा फोन उचलला आणि MMTला खोटा खोटा फोन लावला… “हो हो, रद्द करायचं आहे बुकिंग. किती, पंचवीस टक्के जातील ना, ठीक आहे. करा रद्द.”

आवाज मुद्दामच मोठा काढला होता मी, लेकाला ऐकू जावं म्हणून!

ते ऐकून तो धावतच त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि हातवारे करत मला थांबायला सांगू लागला. मी हळूच फोन बंद केला आणि बघितलं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने.

“आई, आमचा ट्रेक रद्द झालाय! आत्ताच मेसेज आलाय ग्रुपवर… आपण जाऊ महाबळेश्वरला. धमाल करू दोन दिवस!”

मी हसले दिलखुलास! यह हुई ना बात!

मला समजून घेण्याच्या त्याच्या त्या एकाच कृतीतून मूठभर मांस चढलं माझ्या अंगावर आणि मी भरून पावले. एक खूणगाठ मात्र बांधली मनाशी. लेक खरंच मोठा झालाय. यापुढे एकतर्फी निर्णय नको, तर परस्पर संमतीची गरज भासणार आहे. मोठाच धडा शिकले या प्रसंगातून मी आमच्या पुढच्या वाटचालीसाठी… पण त्याचा समंजसपणा मात्र सुखावून गेला मला, नक्कीच!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!