आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे गूळ, तीळ, साखर घ्यायला गर्दी झाली होती. आपा मास्तरनी पावं किलो साखरेचे तिळगूळ मागितले. दुकानातला आगाऊ नोकर मास्तरना म्हणाला,
“असा काय मास्तर, सासवेसुनेक मिळान फक्त पाव किलो तिळगूळ?”
दुकानदाराने हे ऐकले आणि तो ओरडला, “तुकाराम…”
तुकारामने जीभ चावली आणि त्याने मास्तरांना हात जोडले. मास्तरांनी त्याला हात दाखवला… आणि ते मालकाकडे गेले. मालक म्हणाला, “राग मानू नकात गुरुजी… तो जरा जादा आसा.”
मास्तर म्हणाले, “तेची तरी काय चूक! एवढी तरूण सून घरात दिसता म्हणून तेना विचारल्यानं.”
मास्तर घरी निघाले. हळदीकुंकूचे दिवस आले की, ते बेचैन व्हायचे. सहा वर्षांपूर्वी मुलगा उमेशचे लग्न झाले. रजनी घरात आली. उमेश बँकेत नोकरीला, आपल्या गावापासून दहा किलोमीटरवरील दुसऱ्या गावात बँकेची शाखा होती. उमेशचे लग्न झाले त्यावर्षी आपा मास्तरनी दोन किलो तिळगूळ घेतलेले, दहा डझन वाणं घेतलेली… कारण सासू-सून दोघींचे हळदीकुंकू होते. चार वाड्यांना आमंत्रण दिलेले, झाडून साऱ्या सवाष्ण आलेल्या! भरपूर गुलाबांची फुले, वेण्या आणि वाण दिलेले. पण त्याच पावसाळ्यात बँकेतून घरी येताना उमेशची मोटरसायकल घळीत कोसळली आणि… आक्रोश… दुख… फक्त दुःख.
गेली पाच वर्षे हे दुःख मनात ठेवून मास्तरांची बायको शांताकाकू एकट्याने हळदीकुंकू करत होत्या. आता कुणाला बोलवायची हौस नाही, पण आजूबाजूची सवाष्णा येत, त्याना कुंकू लावून तिळगूळ देत, एवढेच. घरात तरणी विधवा सून असताना कसले हळदीकुंकू?
आपा मास्तर घरी आले. त्यांनी तिळगूळ बायकोच्या हातात दिले आणि ते आंघोळीला गेले. त्यांनी रजनीच्या खोलीत नजर टाकली… ती काहीतरी शिवत होती. त्यांना वाईट वाटले. एवढा मोठा हा सण स्त्रियांचा पण अवघी तीस वर्षांची रजनी…
सायंकाळी आजूबाजूच्या बायका घरी आल्या, रजनी घरात होती. शांताकाकू आलेल्याना कुंकू लावत होत्या, तिळगूळ देत होत्या, नमस्कार करत होत्या. सर्वाना रजनी आत आहे, हे माहीत होते तरी, “रजनी दिसणा नाय…” असे खोचक प्रश्न विचारत होत्या.
हेही वाचा – …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’
आतमध्ये रजनी या खोचक बोलण्याने विव्हल होत होती, आपल्या नशिबाला दोष देत होती, जेमतेम आठ महिन्यांचे सौभाग्य… आपला काय दोष होता?
सासरे सतत सांगत असतात, दुसरे लग्न कर… मी मुलगा पहातो.. पण उमेश गेल्यानंतर त्यांना माझ्याशिवाय कोण आहे? आपण आपल्या संसारात अडकलो तर, हे दोन म्हातारे जीव… आपा आणि आई… रोज सायंकाळी उमेशची आठवण काढून डोळे पुसत असतात. आपण घरात आहोत म्हणून घरात निदान जाग आहे.. कोणीतरी बोलायला आहे.. आईंना दम्याचा अटॅक आला तर, त्यांच्या छातीला गरम पाण्याचा शेक द्यायला मी आहे… मीच लग्न करून गेले तर…?
मास्तर आज जास्त बैचैन होते.. परत परत त्त्यांचे लक्ष घराकडे येणाऱ्या वाटेकडे जात होते.. रोज याच रस्त्याने उमेशची मोटरसायकल यायची, मग ते पुढे जायचे आणि त्याच्या हातातून डबा घ्यायचे. त्यांना वाटू लागले, काहीतरी आश्यर्य होईल आणि उमेशच्या गाडीचा आवाज येईल.
आज हळदीकुंकूला आलेल्या एका बाईने मुद्दाम विचारलेले, “रजनी आत काय करता?” त्यांच्या मनाला लागले. त्याना वाटत होते, असल्या बाईला फाडकन उत्तर द्यावे… पण त्यांनी स्वतःला आवरले…
काही तरी करायला हवे, आपल्या समाजात नवरा गेला की, बायकोला जणू वाळीतच टाकतात. खूप पूर्वी नवऱ्याबरोबर स्त्रीला सती म्हणून स्वतःला जाळून घ्यावे लागायचं… ते हळूहळू बंद झालं, पण पती गेल्यावर स्त्रीला जमेल तेवढे विद्रुप केले जायचे…. तिचे केस कापले जायचे आणि तिला आलवणात ठेवायचे. आता काही प्रमाणात प्रगती आहे, पण अजून स्त्री हळदीकुंकू करू शकत नाही… ती विधवा म्हणे… काय करावे?
मास्तर बैचैन झाले होते. त्यांना रजनीचे दुःख पाहावत नव्हते. काही तरी करायला हवे… आपण आपल्या घरात, गावात करू शकतो… मग हळूहळू ते वाढेल! आगरकरांनी, सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी एक शाळा काढली… मग हळूहळू सर्व ठिकाणी शाळा निघाल्या. सुरुवातीला त्यांच्यावर शेण फेकले गेले, दगड मारले गेले, पण स्त्रियांच्या शाळा सुरू झाल्याच शेवटी!
आपा मास्तर झोपायला गेले, पण त्यांना झोप येईना… सतत रजनीचा चेहेरा डोळ्यांसमोर येत राहिला. साठ-सत्तर वर्षांच्या बायका, त्त्यांचा नवरा हयात आहे म्हणूंन हळदीकुंकू करतात आणि तरण्याताठ्या मुली, त्यांचा नवरा हयात नाही म्हणून…
काही तरी करायला हवे…. मग आपांनी निर्णय घेतला आणि ते झोपी गेले.
सकाळी उठून आपा मास्तर बाजारात गेले. त्यानी तिळगूळ घेतलेच, शिवाय गुलाबांची फुले, अबोलीच्या वेण्या खरेदी केल्या. घरी येऊन शांताकाकूच्या हातात पिशवी दिली. काकू पाहातच राहिली.
“कोणाक ही फुला? अजून कोणाचा हळदीकुंकू रवला?”
“संध्याकाळी अजून थोडी बायका येतली, तू बोलऊक नाय तेंका… ती इली काय तू तेंका कुंकू लाव.”
काकू गप्प राहिली. मग मास्तरांनी गावातील ज्योती, उषा, वनिता, सरोज यांना फोन लावला आणि आज दुपारनंतर आपल्या घरी बोलावले. या चारजणी आश्चर्य करू लागल्या की, आपा मास्तरनी घरी का बोलावले?!
दुपारनंतर पहिल्यांदा वनिता मास्तरांच्या घरी आली, पाठोपाठ सरोज, मग उषा आणि ज्योती. या चौघीना पाहून रजनीपण आश्चर्यचकित झाली…
“अगं काय गं, आज सर्वजणी एकदम?”
“मास्तरनी फोन केल्लो, तेनीच येऊक सांगितला.”
“पण माका काय बोल्ले नाय बाबा…” असं रजनी म्हणत असताना मास्तर आणि काकू खोलीत आली. काकूच्या हातात हळदीकुंकूचं ताट होतं.
“ही बघ माझी सून धरून पाचजणा… हेन्का कोणी हळदीकुंकू लाऊक नाय. आता तू हेन्का कुंकू आणि दी फुला आणि वेणी…”
पाचही जणी किंचाळल्या, कारण त्या पाचजणी दुर्दैवाने तरुण विधवा होत्या.
मास्तर म्हणाले, “होय, आज काकू तुमका कुंकू लावतली, कारण तो तुमचो हक्क आसा, सर्व भारतीय स्त्रिया कुंकू लावतात, मग तुमी आणि तुमच्यासारखी कित्या नाय?”
“पण समाज?” वनिता ओरडून म्हणाली.
“समाज असोच आसता… समाज म्हणजे पुरुषमंडळी आणि तेंका साथ देणारी जुने परंपरा जपणारा स्त्रीवर्ग… मी मास्तर, वर्गात इतिहास शिकवय, ज्योतीचो नवरो विनायक आणि सरोजचो नवरो समाधान माझेच विदयार्थी… आपल्या देशात सतीची सक्ती होती बायकांवर, म्हणजे नवरो वर गेलो की, बायको सती तेच्याबरोबर… म्हणजे जिवंत जाळून घेणा… पुरुषांनी तेचो अनुभव घेऊक नाय… पण लॉर्ड बेंटिंगने कायदो करुन सती बंदी केली… म्हणजे जुनी परंपरा बदलली.”
“स्त्रियांका फक्त चूल आणि मुलं अशी व्यवस्था होती आपल्या देशात, पण सावित्रीबाई, आगरकर असे समाजसुधारक जन्माक इले, तेंच्या अंगावर लोकांनी शेण मारल्यानी, दगड मारल्यानी, घरा जाळल्यानी… पण ते ठाम रवले! ह्या मी वर्गात शिकवलंय. तुमी पाचजणा तरुण, माझ्या मुलीसारखी… तुमचो नवरो तरुणपणी गेलो… माझो मुलगो गेलो आणि रजनी…” मास्तरना रडू कोसळले. सगळ्याजणी रडू लागल्या. मास्तरनी स्वतःला सावरले आणि ते बोलू लागले,
“कोणीतरी जुने वाईट परंपरा मोडूकच व्हा्ये.. तुमी सगळी तीस-बत्तीस वयातील तरुण मुली… या दिवसांत सगळे बायका एकमेकांक कुंकू लावतात, फुलं देतत… .आणि तुम्ही मुली? तुमचो काय दोष? तुमचो नवरो तुमका सोडून गेलो म्हणून? या ज्योतीचो नवरो युद्धात गेलो… देशासाठी शहीद झालो ना तो… आणि तेच्या बायकोक कोण कुंकू लावणत नाय.. ही वनिता.. वर्गात सुंदर कविता म्हणी –
झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर
किती गोड कविता म्हणे वनिता… तिचा नवरा गेला आणि ती विधवा झाली.. तिला पण कुंकू लावायचे नाही?”
“पण मास्तर आमचे घरवाले काय म्हणतीत? माजे सासरे, दीर…” उषा धीर करून म्हणाली.
“सांग तुज्या सासऱ्याक, माझो मित्रच तो… सांग तुझ्या दीराक, तो माजो विद्यार्थी… सांग आपा मास्तरानं आणि काकूनं सांगल्याना… काकूनं माका कुंकू लावलेन.”
रजनीसह सर्वजणी गप्प झाल्या. मास्तरांनी काकूंना खूण केली, काकूंनी पहिल्यांदा आपली सून रजनीला आणि मग बाकी सर्वाना कुंकू लावले… तिळगूळ हातात दिले… फुलं दिली… अबोलीची वेणी दिली…
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
सगळ्या मुसमूसत होत्या… काय कळायच्या आत सरोज आणि ज्योतीने काकूंना मिठी मारली आणि त्यांच्या खांद्यावर डोके ठेऊन त्या रडू लागल्या. रजनी, उषा झटकन उठल्या आणि त्यानी मास्तरांच्या पायावर डोके ठेवले आणि अश्रूंचा अभिषेक केला.
तेथील आरशात त्या आपले रूप पाहू लागल्या… उषाला आठवले, आपला नवरा अटॅकने अचानक गेला, त्यावेळी कोणीतरी आपले कुंकू पुसले… त्याच कपाळावर आज हळदकुंकू लागले… मास्तर सर्वांच्या चेहेऱ्यावरील समाधान पाहात होते. मास्तर बोलू लागले,
“आज काकूने कुंकू लावले, यावर समाधान मानू नका… दुसऱ्या लग्नाचा विचार करा… त्यात काही वावगं नाही. स्त्री आणि पुरुषाला दोघांनाही जोडीदाराची गरज असतेच… शारीरिक असते आणि मानसिक पण असते. माझ्या सुनेचे रजनीचे लग्न चांगला जोडीदार बघून मी लावणार आहे, तिने कितीही नकार दिला तरी! आम्ही दोघे तिला किती दिवस पुरणार?”
“बाबा, नको…” रजनी ओरडून म्हणाली.
“नको नाय, मी तुझ्यासाठी चांगला नवरा बघणार आणि कन्यादान करणार… ते पुण्य मिळू दे आम्हाला… आणि उषा, ज्योती, सरोज तुमच्या सासऱ्यांशी मी बोलतो, माझा शब्दाबाहेर जाणार नाहीत ते! कोणी विरोध केला तर, हा आपा मास्तर तुमच्यापाठी आहे, लक्षात ठेवा… पुढील वर्षी हळदीकुंकू तुमच्या नवीन घरी!”
सगळ्या मुसमूसत होत्या. पदराने डोळे पुसत होत्या.
“…आणि लक्षात ठेवा, पुढील वर्षी मी हयात नसलो तरी, काकूला हळदीकुंकवाला बोलवा.”
त्या चारजणी घरी निघाल्या. जाताना मास्तरांच्या आणि काकूच्या पायावर डोके ठेवत होत्या, रजनीला मिठी मारत होत्या. मास्तरांचे पाय त्या अश्रूंनी भिजत होते.


