Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’
    ललित

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करMarch 25, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, यमुनाकाकी कहाणी, युमनाकाकी दोन सुना, यमुनाकाकींचे वृद्धाश्रमात जाणे, यमुनाकाकीची मुलगी सुमन, सुमनचा इन्स्पेक्टर नवरा, यमुनाकाकीला अर्धांगवायूचा झटका
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज रविवार म्हणून मी घरी होतो, दुपारी थोडी झोप काढावी, असा विचार होता. एवढ्यात वाडीतली यमुनाकाकी दारात हजर झाली.

    “अण्णानू आसात, काय झोपलात?”

    “ये बाये ये, नाय झोपाक, काय म्हणत?” मी म्हणालो.

    “आण्णानू, माझा नशीब फुटक्या…”

    “काय झाला?”

    “दोनी सुनो माका विचारणत नाय, माजा नशीब फुटक्या…”

    “आता नवीन सून इलिया मा घरात!”

    “पयला बरा म्हणाक व्हया, हय दुसरा त्यांच्यापारीस चढ…”

    “काय केल्यानी?” मी विचारले.

    “सकाळी चाय केल्यानं, माका विचारल्यानं नाय… मी चुलीवरसून चाय घेवंक गेलंय तर माजो हात धरल्यानं… सांगता अजून त्याच्या घोवचो चाय होऊचो आसा, तुमी व्हयो तर परत चाय ठेवा…”

    “मग तू ठेवलस काय परत चाय तुझ्यासाठी?”

    “मी कित्या ठेव? आणि रानात कोण जातला? ह्या काय रानात जाणा नाय, संबंध दिवस बाबुक घेऊन आसता.”

    एवढ्यात माझ्या लक्षात आले, यमुनाकाकीच्या धाकट्या मुलाला, मोहनला दोन महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता.

    “मग थोरलीकडे जायचा चाय घेऊक?” मी गमतीने म्हणालो.

    “ती महाराणी, आठ वाजल्याशिवाय उठाची नाय, तिच्या महालात जाईत कॊण?”

    यमुनाकाकीची मोठी सून आणि मुलगा घराच्या मागच्या बाजूला वेगळे राहात होते, हें मला माहीत होते.

    “मग आता तू काय म्हणा होतं?”

    “अण्णानू, तिकडे पंदुरात म्हाताऱ्या माणसासाठी काय तरी बांधल्यनी, असा माका कोणीतरी सांगितला.”

    “तेका वृद्धाश्रम म्हणतंत, पण कोणाक आधार नाय तेंका थय ठेवातात, तुझे दोन झील आसात, सुनो असत, तीन नातू आसात आणि चेडू मुंबईक आसा, तुका कशाक होयो वृद्धाश्रम?”

    मुलीचे नाव घेताच यमुनाकाकीच्या डोळ्यातून पाणी आले.

    “होय तर, माजा चेडू म्हणजे माज्या काळजाचो तुकडो आसा आणि जावई म्हणजे लाखात एक. मोठो इन्स्पेक्टर आसा पण गर्व कसलोतो नाय. इलो काय माका बामाची बाटली आणतलो, खजूर आणतलो…”

    यमुनाकाकीचा जावई एका बिल्डिंगचा वॉचमन होता, पण लग्न ठरवताना मध्यस्थाने तिला वॉचमनच्या कपड्यातील फोटो दाखवला आणि यमुनाकाकीला ते खरे वाटले. यमुनाकाकीची मुलगी मुंबईला गेली आणि एवढीशी खोली त्यात सहा माणसे आणि कमाई कमी पाहून पस्तावली, पण गावीच लग्न झाल्याने काय करू शकत नव्हती. आईला वाईट वाटेल म्हणून ती नवरा पोलीस असल्याच्या गमजा सांगत राहिली.

    यमुनाकाकी खूप काही बडबडत शेवटी गेली, ती गेल्यानंतर माझी बायको खोलीच्या बाहेर आली…

    “गेली काय? अशीच बडबड करत असते, दोघींबरोबर हिचे पटत नाही, तशा दोन्ही सुना चांगल्या आहेत. मोठी तशी मायाळू आहे, पण अजून सर्व बागायतीचा व्यवहार काकीच्या हातात, तिचे म्हणणे आता हळूहळ रमेशच्या म्हणजे मोठ्या मुलाच्या हातात द्या, कारण सर्व खर्च तो करतो… लाइट बिल, घरातील सामान, आजारपण, सण… पण ही ऐकेल तर ना? हिचे म्हणणे मग माझ्या हातात पैसे नको? मी कुणाकडे पैसे मागणार नाही, आणि तसे विश्रामकाकांच्या मरणानंतर ती मोठीला नजरेसमोर येऊ देत नाही.”

    हेही वाचा – प्रिय आज्जो… वडीलधाऱ्यांच्या प्रेमाला भुकेल्या रत्ना अन् विभा!

    माझ्या डोळ्यांसमोर आठ वर्षांपूर्वीची घटना आली… मेंमध्ये काकीच्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले, त्यांच्या घरातील लग्न म्हणजे आम्हा दोघांना बोलणी करताना उपस्थित रहावे लागे. विश्रामकाकांनी मुलीच्या वडिलांना दोन्ही घरचा खर्च करायला सांगितलं. शिवाय, पाच तोळे सोने, नवऱ्याचे कपडे वगैरे…

    लग्न लागले आणि मग दोन महिन्यांनी लक्षात आले, दागिने नकली होते! विश्रामकाकांना धक्का बसला, त्या तिरमिरीत ते सुनेच्या माहेरी भांडायला गेले आणि ब्लड प्रेशर वाढून खाली पडले. मग हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेवले, पण त्यांना आधार्गवायुचा झटका आला आणि त्या परिस्थितीत त्यांच्यात सुधारणा झाली नाही आणि सहा महिन्यांनी ते वारले.

    हा राग यमुनाकाकूंनी मनात ठेवला आणि सुनेशी बोलणे बंद केले.

    विश्रामकाकांनंतर सर्व जमीन, काजूचा डोंगर यमुनाकाकी आणि तीन मुलांच्या नावावर लागला. मोठ्या सुनेचे म्हणणे होते, जमिनीच्या वाटण्या करून द्या, कारण तिचा नवरा रमेश शेती करत होता, काजूच्या दिवसात रानात जाऊन काजू तोडून आणत होता.

    धाकटा मुलगा मोहन इलेक्ट्रिसिटी बोर्डात टेम्पररी लाइनमन होता, त्यामुळे तो त्याच्या सुट्टीच्या दिवशी फक्त कामाला मिळत होता. म्हणून तिचा जळफळाट होत होता. मोठीचं पूर्वी यमुनाकाकीबरोबर रोज भांडण व्हायचं. तिच्या मुलावरून, पेज करण्यावरून, लाकडं आणण्यावरून… असं भांडण झालं की, एकमेकांना शिव्या… मग कोणीतरी मला बोलवायला येई आणि मी गेल्यावर दोघी मला एकमेकांच्या तक्रारी सांगत.

    गेल्या वर्षी यमुनाकाकीच्या धाकट्या मुलाचं लग्न झाल. ठरवायला मी आणि माझी बायको होतोच! धाकटी सून घरात आल्याबरोबर मोठीचं आणि धाकट्या सुनबाईचं पटेना, रोज गुरांचे शेण कोणी काढायचे? हे ठरेना… शेवटी दोघीही गोठ्यात जाईनाशा झाल्या आणि शेवटी मोठा मुलगा रमेश शेण काढू लागला. रोजच्या भांडणाला कंटाळून मोठा रमेश घराच्या मागच्या भागात राहू लागला, त्याचा वेगळा संसार!

    यमुनाकाकीची कन्या में महिन्यात माहेरी यायची, मग यमुनाकाकींना भांडण करायला जोर यायचा. त्यात त्त्यांची कन्या सुमन भर घालायची. एकदा यमुनाकाकी आणि सुमन आमच्या घरी आली… मी रविवारी घरी असतो, हें माहीत असल्याने मुद्दाम मला भेटायला आल्या.

    मी – अगो सुमन, तू केव्हा इलंस?

    सुमन – अण्णानू, बुधवारी आले.

    मी – भावोजी काय म्हणतात? त्यांची नोकरीं..

    मला माहीत होते, सुमनचा नवरा वॉचमन आहें… पण ती सर्वाना इन्स्पेक्टर आहें म्हणून सांगत असे.

    सुमन – बरे हायेत, आता अंधेरी पोलीस स्टेशनला आहेत ना, खूप जबाबदारी असते! झोप पण मिळत न्हाय…

    यमुनाकाकी कौतुकाने लेकीकडे पाहत होती.

    मी – मग किती दिवस राहणार यंदा…

    सुमन – बघू… धा दिवस… राहायला कुठे भेटते? ही पोलीस स्टेशनची नोकरीं म्हणजे लय काम…

    मी – खरा आसा.

    सुमन – अण्णानू, हय दोघी भावजयीच्या भांडणाने मला कंटाळा आलाय, आयेला लय त्रास देतात या…

    मी – मग घेऊन जा तुझ्याकडे!

    तशी ती चपापली, तिची एक खोली आणि सहा माणसे मला माहीत होतं, म्हणून मी मुद्दाम बोललो.

    सुमन – आयेला नेले असते, पन यांची बदली व्हणार हाय, मराठवाड्यात पुढील महिन्यात! म्हणून मी गप्प बसते, आनि तिकडची हवा आयला मानव्यायची नाय.

    यमुनाकाकी – व्हय गे बाये, माका इतक्या लांब जमाचा नाय, त्या परास माका आश्रमात ठेवा म्हाताऱ्याच्या. थय मी रवान.

    मी – ठीक आसा, मी त्या आश्रमात जाऊन चौकशी करतंय.

    मी हें सांगितल्यावर त्या गेल्या. मी संध्याकाळी तिच्या दोन्ही मुलांना बोलावून घेतलं. मी निरोप दिल्यावर रमेश आणि मोहन मला भेटायला आले. त्यांना मी यमुनाकाकी वृद्धाश्रमात जायची तयारी करत आहे, असे सांगितले, तसे ते माझ्याशी बोलायला लागले.

    रमेश – अण्णानू, आमच्या आयेचा कोणाशी पटाचा नाय, ती काळ बदललो ह्याच लक्षात घेणा नाय, आपण फाटेक उठता म्हणून सुनानी पन फाटेक उठक व्हया, गोठ्यात जाऊन शेण काढुक व्हया, पन माझी बायको चार माणसांचा आटोपून रात्री अकरा वाजता झोपाक जाता, हय ती लक्षात घेणा नाय. सतत बडबड करत रवला तर खयची सून टिकाची नाय.

    मोहन – माझी बायको शेतात, रानात जाता… पन हिका तिचा काम पसंद पडणा नाय थायसरच गाळी घालीत रवता. म्हणून ती जाणं नाय…

    मी वृद्धाश्रमाची चौकशी केली आणि दर महिन्याला दहा हजार रुपये भरावे लागतील, असे यमुनाकाकींना सांगितले. त्यावर माझी लेक सुमन ते पैसे भरेल, असा विश्वास यमुनाकाकीने दिला.

    एका रविवारी मग मी आणि तिचे दोन्ही मुलगे यमुना काकींना घेऊन गेलो, सुरुवातीचे डिपॉझिट मोहनने भरले.

    यमुनाकाकी वृद्धाश्रमात गेली, पण त्यामुळे त्या घरात एकदम शांतता आली. मोठी लवकर उठून गोठ्यात जाऊ लागली, शेण काढून ते शेतात टाकू लागली. घरात चहा, भाकरी करून नवऱ्याला आणि मुलांना तसेच जावेच्या मुलाला पण देऊ लागली. तसेच, दिवसभर जावेच्या मुलावर लक्ष ठेवू लागली.

    धाकटी बागेत जाऊन सुपाऱ्या गोळा करू लागली. झापे शोधून पाण्यात ठेवू लागली, झाडाखालचा पतारा गोळा करून तो शेतात नेऊन जाळून जमीन भाजू लागली. मोठी आपल्याकडची माशाची आमटी धाकट्या दीराला देऊ लागली आणि धाकटीने कोंबडी मारली की, मोठीकडे पाठवू लागली.

    इकडे वृद्धाश्रमात गेलेली यमुनाकाकी पस्तावली. तिला रोज मासे हवे असायचे. एक दिवस नसतील तर, ती सुनेला बडबडायची, या वृद्धाश्रमात चुकून कधीतरी मासे आणि तिच्या ताटात एखादी लहान फोड पडायची. यमुनाकाकीला दर तासाने चहा हवा असायचा, इथे दिवसातून दोन वेळा चहा आणि तो पण कमी साखरेचा! तिला दशवतारी नाटकें आणि जत्रेला जायची सवय, इथे काहीच नाही…

    शिवाय, सुमनने वृद्धाश्रमाच्या खर्चापोटी दर महिन्याला दहा हजार पाठवते, असे म्हंटले होते पण दोन महिने झाले तरी तिने पैसे पाठविले नाहीत. शेवटी तिच्या मोठ्या मुलाने पैसे भरले. मुलाकडे पैसे मागावे लागतात म्हणून आणि वृद्धाश्रमातील वातावरण तिला मानवणारे नव्हते म्हणून, ती कंटाळली आणि एक दिवस वृद्धाश्रमातून मला फोन आला, आणि आपल्याला परत घरी घेऊन चला, असे यमुनाकाकी सांगू लागली.

    शेवटी मी रविवारी वृद्धाश्रमातून घरी आणले. जे काही बिल राहिले होते, ते मी भरले. यमुनाकाकी हडकली होती, चेहेऱ्यावरची रया गेली होती…

    घरी गेल्याबरोबर मोठ्या सुनेने घातलेली पेज जेवली आणि तिने नातवांना जवळ घेतले, आता सुना आणि आजूबाजूच्या बायका खुदूखुदू हसत होत्या, कशी खोड मोडली, असे म्हणत चेष्टा करत होत्या.

    आठ-दहा दिवस गेले आणि यमुनाकाकीच्या घरातून भांडणाचा आणि भांडी आपटल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. माझी बायको चेष्टेने म्हणाली, “चला, यमुनाकाकीच्या अंगात सुनेबरोबर भांडायची ताकद आली बहुतेक!”

    दोन महिन्यांनी काजू मोसम सुरू झाला आणि मुलं नको नको म्हणत असताना सुद्धा यमुनाकाकी काजू काढायला जाऊ लागली, काजूसाठी काही झाडांवर उंच चढावे लागे, पूर्वीपासून तिला त्याची सवय होती… पण आता एका झाडावरून ती पडली आणि खाली खडकावर आपटली. तिने मोठया मोठ्याने बोंब मारायला सुरुवात केली, त्या बोंबा ऐकून गुरं चरण्यासाठी रानात गेलेल्या मुलांनी तिला उचलून घरी आणले.

    दोन्ही मुलांना हें कळताच ते धावत आले आणि त्यांनी कुडाळमध्ये डॉक्टर पंडित यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, दोन्ही सुनाबरोबर होत्याच. डॉक्टरांनी एक्स-रे काढून पाहिले, दोन्ही पायांची हाडे तुटली होती, त्यांनी तातडीने ऑपरेशन करून प्लेट्स घातल्या…

    आता यमुनाकाकी परवलंबी झाली, पण दोन्ही मुले, सुना सतत बरोबर होत्याच. दिवसभर एक सून राहायची, रात्री दुसरी. मी आणि माझी पत्नी तिला भेटायला गेलो, तेव्हा यमुनाकाकी मला म्हणाली,

    “सुमनाक फोन केलोवा, ता आणि जावई येतले, मग माका कोण्णाची मदत नको…” सुनेकडे पाहात तिने तोंड वाकडे केले. मी तिला गप्प राहा अशी सूचना करतच होतो, पण तिची तोफ सुरूच होती.

    त्याच रात्री यमुनाकाकीला अर्धांगवायूचा झटका आला आणि तिचे तोंड, अर्धे शरीर वाकडे झाले. डॉक्टर पंडित यांनी डॉक्टर राणे यांना बोलावले आणि एकाच वेळी पायावर आणि अर्धे वाकड्या झालेल्या शरीरावर उपचार सुरू झाले.

    हेही वाचा – रत्नाच्या प्रिय आज्जोंनी घेतला महत्त्वाचा निर्णय…

    दोन्ही मुले आणि दोन्ही सुनांनी रात्रंदिवस तिची सुश्रुषा केली. अंगावरील कपडे बदलले, वेळेत औषधे दिली, थोडे बरे वाटल्यावर स्पेशल गाडी करून कारवालला वैद्यकडे नेले. सुनांनी तिला मालिश केले, कोवळ्या उन्हात बसवले, जेवण भरवले, कपडे धुतले…

    पण येणार येणार म्हणून रोज फोन करणारी कन्या सुमन आणि जावई अजून आली नाहीत, आता आंब्याचा सीझन सुरू झाला की, आंबे खायला येतील कदाचित!

    मी दोन दिवसाआड यमुनाकाकीला भेटायला जातो, तेंव्हा दोन्ही सुनांकडे पाहून त्यांना रडायला येते आणि हळूहळू हात वर करत त्या दोघींना नमस्कार करतात…

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026 ललित

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026 ललित

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    By रेवती निलेश पांडेMarch 25, 2026

    दोन महिन्यांपूर्वी एकटीने रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. प्रवास बराच लांबचा होता. मला ‘साइड अप्पर’…

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 247
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 361
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 512
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn