मनोज जोशी
कधी-कधी आयुष्यात अशी एखादी अनपेक्षित घटना घडते की, त्याची नंतर आठवण जरी आली तरी, मन दडपून जाते… आणि मग हसू देखील येते. अशीच 1993 सालची एक घटना येथे शेअर करतो.
1982मध्ये गिरगाव सोडून अंधेरीला रहायला आल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पार्ले कॉलेजमध्ये (आताचे साठ्ये कॉलेज) झाले. एफवायला एका मुलाने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तो माझ्याच वर्गात आला. तो आणि मी एकाच बेंचवर बसत होतो. आमची चांगली मैत्री जमली. नंतर-नंतर आमची जोडी कॉलेजमध्ये फेमस झाली. मी एकटा दिसल्यावर, त्या मित्राची चौकशी माझ्याकडं व्हायची अन् तो एकटा दिसला तर, माझी चौकशी त्याच्याकडं व्हायची.
एफवाय झालं, एसवायच्या फायनल एक्झाममध्ये त्याला कॉपी करताना पकडलं आणि कॉलेजने नापास केलं. त्यामुळे टीवायला आमची जोडी तुटली. मी टीवाय झाल्यानंतर एमएला अॅडमिशन घेतली. मी एमएच्या लेक्चर्ससाठी कलिना युनिव्हर्सिटीत जात होतो. त्यामुळे आम्हा दोन मित्रांचा संपर्कही कमी झाला होता. पण कॉलेज मात्र ‘पार्ले कॉलेज’च राहिले. त्यामुळे लायब्ररीतून पुस्तक आणण्याच्या निमित्ताने किंवा अन्य कारणांमुळे अधून-मधून कॉलेजच्या फेऱ्या सुरूच होत्या. कॉलेजला गेल्यावर या मित्राला भेटणे व्हायचेच. असाच एकदा कॉलेजला गेलो असताना त्याने एका मुलीची ओळख करून दिली. त्या दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. आता ‘दोघं राजी’असल्यावर कोण काय करणार?
कालांतरानं त्या दोघांचे टीवाय झाले. एकदा अचानक तो घरी आला… अर्थात घरचे त्याला ओळखत होते. गप्पाटप्पा, चहापाणी झाल्यावर त्याला सोडायच्या निमित्ताने मी बसस्टॉपवर गेलो. तेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी साडेचार वाजता पार्ल्याला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या स्टॉपवर यायला सांगितले.
हेही वाचा – नजर नजर की बात हैं!
ठरल्याप्रमाणं मी बरोब्बर साडेचार वाजता पोहोचलो… तो आला, पाठोपाठ तीसुद्धा आली. आणखी काही मित्र-मैत्रिणी आल्या. त्यातील ती आणि तो यांच्याव्यतिरिक्त आणखी एकजण वगळता, सर्वच माझ्यासाठी अनोळखी होते. त्याने त्या मित्र-मैत्रिणींची ओळख करून दिली. त्यातले दोघेजण त्याच्या सोसायटीतच राहणारे आणि जीवाला जीव देणारे मित्र होते. तिच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या. तिथेच सुरुवातीला गप्पांचा फड रंगला, नंतर हॉटेलमध्ये चहापाणी झाल्यावर आम्ही निघालो. जाण्यापूर्वी दोन दिवसांनी पुन्हा भेटायचे ठरले… आणि नंतर वरचेवर भेटणे सुरू झाले. तसे माझे एमए पूर्ण होऊन एक वर्ष झाले होते, तरी मी बेरोजगारच होतो; त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ होता.
या भेटीगाठींदरम्यान समजले की, माझ्या मित्राची ‘ती’ डीसीपी म्हणजेच पोलीस उपआयुक्ताची मुलगी आहे. तिचा भाऊ पोलीस असून मामाही कॉन्स्टेबल आहे… हिंदी सिनेमाप्रमाणे दोघांच्या घरातून त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. म्हणूनच तिच्या घरच्यांनी तिचे लग्न जमविण्याची घाई केली होती. माझा मित्र एका खासगी कंपनीत कामाला होता. कंपनीचे नाव मोठे असले तरी, जॉब टेम्पररीच होता. एक दिवस तिचा भाऊ तसेच मामा त्या कंपनीत गेले आणि त्याला बाहेर बोलावून तिच्यापासून दूर राहण्याचा ‘सल्ला’ दिला. मग काय संध्याकाळी ग्रुप भेटल्यावर हीच चर्चा सुरू झाली. अखेर या दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला.
ठरलेल्या दिवशी आणि वेळी दादरच्या ‘माहेर’ हॉलमध्ये आम्ही जमलो. वैदिक पद्धतीनं दोघांचं लग्न झाले. हॉलमधून बाहेर पडल्यानंतर कोल्डड्रिंक घेऊन आम्ही परतलो. ती तिच्या घरी गेली. तो त्याच्या घरी गेला. वडील निवृत्त झाल्यावर मित्राचे कुटुंब दहिसरला रहायला गेले होते. पण तो या प्रेमाखातर अंधेरीला एका भाड्याच्या खोलीत राहात होता.
हेही वाचा – नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो आणि त्याने बाऊंसरच टाकला. तो म्हणाला – ‘आमचं लग्न झालं, यात मला समाधान आहे. आता तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं तरी हरकत नाही. ती माझी आहे, हे कायम माझ्या मनात राहील.’ आम्ही सर्व उडालोच. मी तिला बाजूला घेऊन गेलो आणि विचारले – ‘तुझं घरी सर्वात जास्त कुणाशी चांगलं पटतं?’ ती म्हणाली – ‘बाबांशी.’ मी म्हणालो – ‘छान! मग, त्याचे (माझ्या मित्राचे) काही ऐकू नकोस, बाबांना विश्वासात घे आणि सर्व काही सांगून टाक. ते पोलीस अधिकारी आहेत. त्यांना सर्व कायद्याचे बारकावे माहीत आहेत. ते समजून घेतील.’ त्याच्या आणखी एका मित्राने हाच सल्ला तिला दिला होता. तेवढ्यात माझा मित्र तिथे आला आणि त्याने तिला विचारले, ‘हा काय सांगतोय?’ तिनं सांगितल्यावर, ‘याचं ऐकू नकोस, असं काहीही करू नकोस,’ असे त्याने तिला बजावले. मीही वैतागलो आणि बाजूलाच राहून त्याचा वेडेपणा पाहायचे ठरवले. गंमत म्हणजे, माझ्यासारखाच सल्ला देणारा त्याचा मित्र देखील गुपचूप राहू लागला!)
रात्री माझ्या सोसायटीमध्ये मित्रांबरोबर गप्पा मारताना, हा किस्सा सांगितला. माझ्या मित्राचे लग्नाबद्दलचे ‘विचार’ ऐकल्यावर सर्वच हसायला लागले आणि नंतर सोसायटीतला तो कंपू संध्याकाळी माझी वाट पाहू लागला. मी येताच मला बसायला जागा वगैरे दिली जायची… म्हणायचे, ‘तेरे पागल दोस्त का नया किस्सा सुना…’ कारण आम्ही साधारणपणे एक दिवसआड भेटत होतो.
एक दिवस फोन आला, ‘लवकर अंधेरी स्टेशनला ये.’ (त्यावेळी मोबाइल फोन नव्हते). मी स्टेशनला पोहोचलो, हळूहळू सर्वचजण आले. तीसुद्धा आली होती. ती म्हणाली, ‘घरच्यांनी मला बाहेर जायची बंदी केली आहे. तरीही मैत्रिणीकडे काम आहे, असं सांगून पळून आलेय.’ एकाने तिला विचारले, ‘तुझ्या मनात आता काय आहे?’ ती म्हणाली, ‘मी घरी जाणार नाही. यानं माझ्याशी लग्न केलंय, तर हाच मला आता घेऊन जाईल. जाईन तर, याच्या बरोबरच जाईन.’ तिचे हे बोलणे ऐकून माझ्या मित्राला घामच फुटला. पण त्याच्या कॉलनीतील मित्र खमके होते. त्यांनी ठरवले की, या दोघांना माथेरानला पाठवायचे. संध्याकाळचे सुमारे सहा वाजले होते. आम्ही आठ जण होतो… दोन टॅक्सी केल्या आणि ठाण्याला आलो. तिथे त्या दोघांना पैसे, तिकिटे काढून दिली आणि नेरळच्या ट्रेनमध्ये बसवून आम्ही परतलो.
हेही वाचा – मन ‘वडा’य ‘वडा’य…
घरी सर्वजण माझी वाट पाहात होते. एकत्र जेवायला बसल्यावर सर्व किस्सा सांगितला… छाती धडधडत होती… काहीतरी घडणार, याची खात्री होती. झालंही तसंच! मध्यरात्री दोनच्या सुमारास फोन वाजला. (घरी लॅण्डलाइन फोन येऊन अवघे तीन महिनेच झाले होते.) मी बेडरुममधून धावत बाहेर आलो, बाबा कुणाशी तरी फोनवर बोलत होते. नंतर त्यांनी माझ्याकडे फोन दिला. पलीकडे मित्राची आई होती. तिने सांगितले, ‘माझ्या मुलाला पोलीस पकडून घेऊन गेले. तुझेही नाव ते घेत होते. ते आता तुझ्याकडे येतील, तुझ्या सोसायटीत आणि आईबाबांसमोर तमाशा होईल. तू थेट विलेपार्ले पोलीस स्टेशनला ये.’ मी फोन ठेवला, कोणाशी काहीही न बोलता तडक आत बेडरूममध्ये गेलो आणि तयार होऊन बाहेर आलो, बाबांनी विचारले, ‘कुठं चालंलास?’ मी काय ते सांगितले. ते म्हणाले, ‘अजिबात जायचं नाही. पोलीस आल्यावर पाहू काय करायचं ते. तू जाऊन झोप.’ मी झोपायला गेलो खरा, पण झोप कसली येते. एखादी बाइक जरी आली तरी, ‘पोलीस आले,’ असेच वाटायचे. पहाटे-पहाटे झोप लागली.
त्या एका फोनने माझ्यासकट घरातले सर्व तणावाखाली आले. रात्रीच मी आमच्या एका ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन केला. तो व्हीआयपी सिक्युरिटीचा इन्चार्ज होता. ‘ते दोघेही सज्ञान आहेत, तर मग घाबरू नकोस. जे पोलीस तुला घेऊन जातील, त्यांच्याविरुद्ध तू तक्रार नोंदव, पुढं मी बघतो,’ असे तो म्हणाला. हे सर्व ठीक आहे, पण त्या पोलिसांनी आमचे ऐकायला तर हवे ना! थेट ‘थर्ड’ लावली तर काय? रात्री तर बहुतेक पोलीस ‘फुल्ल चार्ज’ असतात!
सकाळी बाबांनी मला उठवले, म्हणाले, ‘चल, लवकर फ्रेश हो आपल्याला जायचंय.’ मी काही विचारले नाही. उठलो फ्रेश होऊन तयार झालो आणि काही कपडे सोबत घेऊन त्यांच्याबरोबर निघालो. कुठे चाललो होतो, ते मला माहीत नव्हते. बाबा मला गोरेगावला आजोळी घेऊन आले होते. आजीच्या हवाली करून ते मला म्हणाले, ‘काही दिवस इथंच थांब. सर्व शांत झालं की, तुला घेऊन जाईन.’ त्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन मला स्पष्टपणे जाणवत होते…
मी जवळपास 12-15 दिवस आजोळी होतो. रोज घरातील कोणी ना कोणी तरी, पब्लिक बुथवरून घरी फोन करून काय परिस्थिती आहे, हे जाणून घेत असे… रोज कुठल्या तरी मित्र वा मैत्रिणीला पोलीस घेऊन गेल्याचे समजायचे.
हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह
त्यातलीच एक मैत्रीण गोरेगावला शेजारच्या बिल्डिंगमध्ये एका ऑफिसमध्ये नोकरीला होती. मी एक दिवस त्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिची चौकशी केली. तेव्हा सांगण्यात आले की, ‘कसली तरी परीक्षा आहे म्हणून ती आठ-दहा दिवस रजेवर आहे.’ मला काय ते समजले. तिची कोणतीही परीक्षा नव्हती, हे मला माहीत होते. कालांतराने समजले की, चौकशीसाठी पोलिसांनी तिला दोन वेळा बोलावले होते! अशा प्रकारे ताण दिवसेंदिवस वाढतच चालला होता… माझ्यावरचा आणि घरच्यांवरचाही!
एक दिवस बाबा गोरेगावला आले आणि मला पुन्हा अंधेरीला घेऊन गेले. रस्त्यात सर्व काही निवळल्याचे सांगितले. त्या दोघांना दिंडोशीला त्यांच्या काकांकडे पोलिसांनी पकडल्याचे समजले. घरी आलो. साधारणपणे तासाभराने फोन वाजला, त्याच मित्राचा फोन होता… म्हणाला, ‘अरे, सर्व काही ठीक झालं. तिचे बाबा म्हणाले, पळून कशाला गेलात, मला सांगितलं असतं तर मी तुमचं लग्न लावून दिलं असतं.’ मी संतापून, बाजूला बाबा असल्याचे भानही न ठेवता, त्याला अक्षरश: शिव्या घातल्या… म्हणालो, ‘अरे, मी तुला हेच सांगत होतो, पण त्यावेळी तू ऐकलं नाहीस. तुझ्यामुळं सर्वांना मनस्ताप सहन करावा लागला. आता यापुढे मला पुन्हा कॉन्टॅक करू नकोस.’
काही दिवसांनी मला कळले की, मी वगळता इतर सर्वांना पोलिसांनी एक-दोनदा पकडून नेले होते. कोणतीही नोंद न करता त्यांना केवळ पोलीस ठाण्यात बसवून काही वेळाने सोडले जात होते. मी त्याच्याशी पूर्णपणे मैत्री तोडली. कारण 12-15 दिवसांचा तो ताण केवळ मी एकट्यानं नव्हे तर, माझ्या घरच्यांनी देखील सहन केला होता… तोही अकारण!
या घटनेनंतर साधारणपणे दोन वर्षांनी एक धक्कादायक गोष्ट मला समजली. त्या दोघांचा वर्षभरातच घटस्फोट झाला!