मंदार अनंत पाटील
साधारण 2006च्या सुमारास उच्च शिक्षणाकरीता लंडनला जायचा योग आला आणि साधारण 2007पर्यंत शिक्षण, नोकरी आणि यूकेमधील जीवन यामुळे फारसा वेळ मिळाला नाही, परत प्राणी सांभाळायला. पण 2008च्या सुमारास लंडनमध्ये बॅटरसी डॉग होम नावाची सेवाभावी संस्थेबाबत माहिती समजली. ही संस्था अनाथ आणी दुर्लक्षित प्राणी-पक्षी यांना सहारा देते आणि पुनर्वसन करते. तिथली उत्तम व्यवस्था, प्रत्येक प्राणी-पक्षीकरिता नेमलेले स्वयंसेवक, अतिशय कमालीची स्वच्छता आणि कामाचे नियोजन पाहता, आपणही काही हातभार लावावा, असे वाटले. मासिक डोनेशन भरून सुरुवात केली. मनाला एका मुक्या जिवाला मदत केल्याचे समाधान मिळत होते. नंतर यथावकाश 2019मध्ये प्रथमच पक्षी आणले गेले आणि हे माझे परदेशातले पहिले सखेसोबती झाले.
एकदा असेच पक्ष्यांचा खाऊ आणायला ‘पेट’च्या दुकानात गेलो असताना माझी नजर टेरापिनवर (म्हणजे गोडया पाण्यातील कासवे) पडली. अगदी अंगठ्या एवढी पाच-सहा छोटी कासवे एका फारच लहान टँकमध्ये दाटिवाटीने ठेवली होती. साधारण £16.00ला दोन कासवे अशी किंमत होती. मी इंटरनेटवरून या कासवांना लागणारा टँक, अल्ट्राव्हायोलेट लाइट, त्यांची निगा कशी राखायची यांचे सखोल ज्ञान जमा केले. नंतर दोन पिल्लं घरी आणली. पण त्यामधील एक लगेचच दगावले. पण दुसरे मात्र फारच छान राहिले आणि 11 वर्षांचे होऊन 4 ऑगस्ट 2020ला देवाघरी गेले. त्याचे नाव पल्लवीने रँबो ठेवले होते. तो होता खरा पाण्यात राहणारा जीव पण त्याने अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य जमिनीवर आणि माझ्या पलंगाखालीच काढले.
अतिशय हुशार पण तितकाच झोपा काढणारा होता रँबो. जेवणाची वेळ अगदी बरोबर ठाऊक असायची पठ्ठ्याला… बरोबर डोकं वर करून पाय मारत बसायचा टँकमध्ये… हॅम म्हणजे डुकराचे मांस तर अतिशय प्रिय होते आणि त्याचा तो नेहमीचा खाऊ… यावर तर तो ताव मारत असे. थंडीच्या मोसमात रँबो हायबरनेशनमध्ये जात असे… म्हणजे साधारण तीन-चार महिने अन्न न खाता आपले शरीर कवचात खेचून एकाच जागी पहुडत असे. त्याला मी दर दोन दिवसांनी पाण्यात धुऊन काढायचो. कारण, त्याचे कवच खराब व्हायचे आणि तो रेपटाइल म्हणजे सरपटणारे प्राणी या जमातीमधला असल्याने वाढ होताना जुने कवच गळुन पडत असे. प्राणीमित्र म्हणून रँबोने मला नक्कीच एक वेगळा अनुभव दिला होता…
क्रमश: