रश्मी परांजपे
मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात.
बालगटातील मुलांकडून सुरुवातीला शिशुगटातील विज्ञान अभ्यासाची उजळणी करून घ्यावी. बालगटातील विज्ञान शिक्षण पुढील मुद्द्यांच्या आधारे करण्यात येते :
- रूंद जीना
- मिश्र रंग
- खरखरीत – गुळगुळीत
- झाडाचा परिचय
- प्राण्याचा परिचय
- पंचेंद्रियांतून शिक्षण
आता आपण वरील मुद्दे लक्षात घेऊन बालगटात विज्ञान शिक्षण कसे दिले जाते याबाबत जाणून घेऊ.
रूंद जीना – खेळातून शिक्षण
गुलाबी मनोरा आणि लांब जीना या शैक्षणिक साहित्याचा परिचय दृढ झाल्यावर रूंद जीना लावायला शिकवतात.
समान लांबीचे पण 1 ते 10 सें.मी. रूंद असे 10 लाकडी ठोकळे घेतले जातात. नंतर 1, 2, 3 ते 10 सें.मी. अशा रुंदीचे ठोकळे जोडून लावायला शिकवतात. यातूनच रूंद जीना तयार होतो. मुलांकडून लांब आणि रूंद जीना लावून घेताना त्यांना लांबी आणि रुंदी या संकल्पना समजावून सांगितल्या जातात.
मिश्र रंग परिचय
लाल, निळा, पिवळा हे मूळ रंग शिकवल्यानंतर दोन रंगांच्या मिश्रणातून तयार होणारे पुढील मिश्र रंग शिकवले जातात.
- लाल + निळा = जांभळा
- लाल + पिवळा = केशरी
- निळा + पिवळा = हिरवा
यासाठी जिलेटीन पेपर, रंगीत पाणी याचा उपयोग करुन प्रात्यक्षिके घेण्यात येतात.
स्पर्श परिचय
मुलांना खरखरीत आणि गुळगुळीत असे स्पर्शज्ञान झाल्यावर गुळगुळीत, कमी खरखरीत, जास्त खरखरीत असा अनुभव विविध वस्तूंच्या स्पर्शातून दिला जातो.
झाडाचा परिचय
झाडाचे सर्व अवयव म्हणजे मूळ, खोड, फांदी, पान, कळी, फूल अथवा फळ यांचा परिचय चित्रांच्या माध्यमातून करून देण्यात येतो.
पावसाळ्यात बिया अथवा छोटी रोपे लावून झाडाचे अवयव प्रत्यक्ष दाखवता येतात. जास्वंदीची कळी आणि नंतर कळीचे फूल दाखवता येते. तसेच परिसरातील अथवा बागेतील झाडांवरील फळे प्रत्यक्ष दाखवता येतात.
प्राण्याचा परिचय
प्राणी आणि पक्षी यांची मोठी चित्रे असलेले तक्ते घेऊन त्यांची नावे तसेच त्यांचे पंख, चोच यासारखे विशिष्ट अवयव मुलांना दाखवता येतात. तसेच मुलांची प्राणीसंग्रहालयाची सहल आयोजित करून प्रत्यक्ष प्राणी आणि पक्षी दाखवले जातात. मात्र अशा सहलीबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते.
पंचेद्रियांतून शिक्षण
- नाक – मुलांना नाकाने वास घेऊन वेगवेगळे वास घेण्याचा अनुभव देता येतो. उदाहरणार्थ डब्यातील भाजीचा वास, चहा / कॉफीचा वास, सुंठीचा वास इत्यादी.
- डोळे – मुलांना परिसरातील गोष्टी बघायला लावून काय-काय बघितले, हे विचारून स्मरणशक्तीचा खेळ घेता येतो.
- कान – मुलांना कानाने लहान-मोठा, जवळचा-लांबचा आवाज यातील फरक अनुभवण्यास सांगावे.
- जीभ – मागील लेखात सांगितल्यानुसार मुलांना विविध पदार्थ आणि त्यांच्या चवी अनुभवायला द्यावे. तसेच बालगटातील विज्ञान शिक्षणात आवळ्याची तुरट चव याचा आवर्जून समावेश करावा. अशाने मुलांना आहारातील षडरसांचा परिचय होईल.
- त्वचा – पिशवीत एकेका वस्तूच्या दोन अशा जोड्या ठेवून मुलांना पिशवीत हात घालून वस्तू सांगाव्यात आणि त्याप्रमाणे बोटांच्या स्पर्शाने वस्तू ओळखून जोड्या बाहेर काढण्यास शिकवावे. उदाहरणार्थ खडू, पेन्सिल, खोडरबर, लहान चेंडू, लहान ठोकळे, लहान पट्टया इत्यादी.
अशा विविध पद्धतींतून मुलांचे पंचेद्रिय शिक्षण दृढ होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, बालगटातील विज्ञान शिक्षण मुलांच्या प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षणाचा पाया मजबूत करते.
पुढील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


