माधवी जोशी माहुलकर
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी…
बा. सी. मर्ढेकरांची ही अजरामर कविता आपल्याला खूप काही शिकवून जाते. इयत्ता सातवी, आठवीत असताना ही कविता अभ्यासाला होती, पण तेव्हा त्यातील मर्म समजण्याची आमची कुवत नव्हती; पण आता वयाच्या पन्नाशीत जीवनाचे विविध अनुभव घेतल्यानंतर खरा ‘गणपत वाणी’ समजायला लागला. मर्ढेकरांचा गणपत वाणी हा एक विशिष्ट व्यक्तीसमूहाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, जो एका विशेष चौकटीमधेच आपले जीवन जगत असतो आणि त्याबाहेर जाऊन फारसे कष्ट न करता सुखासीन आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त स्वप्नरंजन करण्यातच जातं. आजही असे अनेक ‘गणपत वाणी’ आपल्या अवतीभवती आपल्याला दिसतात.
गणपत वाण्याचं दुकानही असंच वडिलोपार्जित होतं, जे त्याच्या आधीच्या पिढीने केलं, तेच काम याने केलं! पण ते दुकान विकसित करण्याचा प्रयत्न काही केला नाहीं. समाजामध्ये आजही असे अनेक लोक आहेत, जे “आयजीच्या जीवावर बायजी उदार” असं जीवन जगतायत. मी तर उपरोधाने असं म्हणेन की, अशी जमातच बांडगुळांची असते. एखादे मोठे हिरवे, डेरेदार झाड असतं आणि त्या झाडाचा जीवनरस शोषून ही बांडगुळं आपले पोषण करत असतात. त्या झाडाच्या छायेखाली स्वतःला मोठे करत असतात, पण आपला विकास साधण्यासाठी नेटाने काही प्रयत्न करताना दिसत नाहीत. काही वेळा समाजातही आपल्याला असे चित्र दिसतं. एखाद्या हुशार आणि कर्तृत्ववान व्यक्तीच्या आधाराने त्या घरातील आळशी आणि बिनकामाचे लोक दिवस ढकलत असतात.
आजचा दिवस निभावला गेला… उद्याचं उद्या पाहू, अशा बेफिकिरी वृत्तीची ही माणसं असतात. अंगामध्ये मुलखाचा आळशीपणा असतो आणि काही काम करण्याची इच्छाच यांना नसते. वडिलोपार्जीत संपत्ती कधी ना कधी संपणार, हे यांच्या लक्षात कसं येत नाही? बरं, असे लोक शौकही मोठमोठे बाळगून असतात! अंगामध्ये फुकटची शिरजोरी असते. खोटंनाटं बोलून आपले ईप्सित साधण्याची कला यांना अवगत असते. अशा व्यक्तीदेखील ‘गणपत वाण्या’चे भाऊ शोभावे, अशाच असतात. यांना कितीही दान दिले तरी, यांचा आ कायम वासलेलाच असतो.
हेही वाचा – …अन् सुमतीचा ‘गजरा’ हळूहळू कोमेजू लागला!
बहुतेक शंभरापैकी 25 टक्के घरात तरी असे एखादे पात्र असतंच. गद्धे पंचविशीत तारुण्याची, ऐन उमेदीची वर्ष वाया घालवल्याने आळशीपणा नसानसात भिनलेला असतो आणि दुसऱ्यावर विसंबून राहण्याची जीवनशैली अंगवळणी पडल्यामुळे मनामध्ये आत्मविश्वास नसतो, त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद नसते. मग काय यांचाही ‘गणपत वाणी’ व्हायला फारसा वेळ लागत नाही… फक्त स्वप्नरंजनात आयुष्य घालवल्याने हे लोक आपला विकास करूच शकत नाहीत. मनाने ही लोक इतकी कोडगी झालेली असतात की, यांना कोणी कितीही बोलले तरी, यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, ‘आयत्या पिठावर नागोबा’ अशीच काहीशी यांची परिस्थिती असते. दुसऱ्यांच्या जीवाला हे लोक घोर लावतील, पण स्वतः बिनधास्त जगतील… यांना ना ब्लड प्रेशरचा त्रास होतो, ना शुगर किंवा हार्टचा! हे खुशालचेंडू आपले जीवन मस्त व्यतीत करतात.
गणपत वाण्यासारखेच दुसरे एक पात्र आहे ‘मुंगेरीलाल’! हा मुंगेरीलाल असाच गणपत वाण्याचा सोबती. हा स्वतःच्या आयुष्यात जे काही करू शकत नसे, त्याची स्वप्न पाहाण्यात आपला वेळ व्यतीत करत असे; पण प्रत्यक्षात मात्र अक्कलनाम शून्य! एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊन नवीन गोष्टीचा कधी ध्यास न धरणारी ही जमात, आयुष्यभर खुरडत, रडतराऊसारखे पराधीन राहून फक्त मोठमोठी स्वप्न पाहतील, पण त्यांचा पाठपुरावा काही करणार नाहीत.
सामान्य माणसांचे हाल असेच असावेत नाही का? चाकोरीबद्ध जीवन जगण्याची सवय लागलेल्या सामान्य माणसाला या विटक्या जिण्याची इतकी सवय झालेली असते की, हा बापडा नशिबाला दोष देत, तसेच जीवन जगत राहतो. स्वतःमधल्या क्षमतेचा उपयोग कधीच करत नाही… किंबहुना त्या क्षमतेची जाणीवच त्याला नसावी. हाडाची काडे करत झिजून मरून जाईल, पण चाकोरीबाहेर जाणार नाही! यांचे मग पिढ्यान पिढ्या असेच चालत राहते. ही बाब स्पष्ट करताना मर्ढेकर म्हणतात,
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली...
किती समर्पक वर्णन आहे नाही?
मर्ढेकरांनी गणपत वाण्याची प्रतिमा या सामान्य माणसाला पाहूनच साकारली असावी, त्यांनी फक्त सामान्य माणूस विचारात घेत एक साधा किराणा दुकानदार या कवितेमधून रंगवला. सामान्य माणूस म्हटला की, त्यामध्ये जसे नोकरदार, व्यावसायिक लोक येणार तसे, (मी वर सांगितल्याप्रमाणे) ऐतखाऊ, स्वप्नरंजन करणारे, फुकटची शेखी मिरवणारे, चालढकल करणारे, फारसे स्वतःला न बदलणारे असेही लोक येणार! फक्त आणि फक्त स्वप्नरंजन करणार, पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार नाहीत किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करणार नाहीत. कोलूच्या बैलासारखे गोल गोल फिरत फक्त स्वतःची हाडाची काडे करणार आणि एक दिवस झिजून मरणार… हे चक्र असंच चालणार…. फारसा बदल शक्य नाही.
हेही वाचा – …अन् उरल्या गजऱ्याच्या रुपाने सुमतीताईंच्या स्मृती!
म्हणून तर बा. सी. मर्ढेकरांची ही कविता आजच्या युगातही तंतोतंत लागू पडते. एक एक शब्द अर्थपूर्ण आहे. या कवितेचा अभ्यास करतांना यापेक्षा अजून वेगळा अर्थही लावला जाऊ शकतो…. मी फक्त यामध्ये जरा वेगळ्या पात्रांचा उल्लेख केला आहे एवढेच! जे मी अनुभवलं, जे मला माझ्या अवतीभवती दिसलं, ते मी या कवितेचा आधार घेऊन शब्दांत मांडलं. परत एकदा ही कविता वाचनात यावी म्हणून जशीच्या तशी खाली देत आहे.
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.
गिऱ्हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या…
गणपत वाणी बिडी बापडा
पितापिताना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!
- बा. सी. मर्ढेकर


