दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 मार्च 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 20 फाल्गुन शके 1947; तिथि : अष्टमी 28:19; नक्षत्र : ज्येष्ठा 21:59
- योग : वज्र 09:11; करण : बालव 15:07
- सूर्य : कुंभ; चंद्र : वृश्चिक 21:59; सूर्योदय : 06:52; सूर्यास्त : 18:46
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारतीय क्रिकेटर विजय हजारे
टीम अवांतर
भारताला पहिली टेस्ट मॅच ज्यांनी जिंकवून दिली होती, त्या भारतीय क्रिकेटर विजय सॅम्युएल हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी सांगली येथे झाला. देवासचे महाराजा विक्रम सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू क्लॅरी ग्रिमेट यांना भारतात बोलावले होते. त्यावेळी मध्यमगती गोलंदाजी किंवा थोडीफार लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या विजय हजारे यांच्यावर ग्रिमेट यांची नजर पडली. त्यांना हजारे यांची फलंदाजी अधिक आवडल्याने त्यांनी हजारे यांना फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ग्रिमेट यांचा सल्ला मानून हजारे यांनी फलंदाजीवर मेहनत करण्यास सुरुवात केली. क्रिकेटर म्हणून वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांना पहिल्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 1938 मध्ये राजपुताना संघासोबत त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. 1939-40 च्या हंगामात 316 धावांची खेळी करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
1946 साली भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असताना, हजारे यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. त्या दौऱ्यात विजय हजारे यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. 49.77 च्या सरासरीने 1 हजार 344 धावा आणि 56 बळी अशी त्यांची कामगिरी होती.
हेही वाचा – अबोली, मी अन् ती…!
क्लास क्रिकेटमध्ये ट्रीपल सेंच्युरी करणारे पहिले फलंदाजही तेच होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंदही आहे. विजय हजारे यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 7 शतक ठोकले होते आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 60 शतके झळकावली होती. विशेष म्हणजे, त्यांनी 595 विकेट्सही घेण्याची उल्लेखनीय कामगिरीही केली होती.
विजय हजारे यांना वर्ष 1960 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटर होते. त्यांचं जबरदस्त क्रिकेट करिअर पाहून वर्ष 2002मध्ये त्यांच्या नावे म्हणजेच विजय हजारे ट्रॉफी सुरू करण्यात आली. विजय हजारे ट्रॉफीत भारताच्या अनेक राज्यांचे संघ एकमेकांविरोधात खेळतात. स्टार खेळाडूही त्यांच्या संघासाठी खेळतात. अशा या महान क्रिकेटपटूचे 18 मार्च 2004 रोजी आतड्याच्या कॅन्सरमुळे बडोदा येथे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – एकाग्रता वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. दिवस अविस्मरणीय असेल. कठोर परिश्रमांमुळे करिअरच्या नवीन संधी मिळतील. भावंडांसोबत एक आनंददायी भेट सगळी टेन्शन्स दूर करणारी असेल. सहकाऱ्यांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. कोणतीही डिजिटल जोखीम किंवा शॉर्टकट पद्धतीने केलेली गुंतवणूक टाळा. टीमवर्कमुळे फायदा होण्याची शक्यता आहे.
वृषभ – आज भावनिकदृष्ट्या दोलायमान स्थितीत असाल. कायदेशीर बाबीत अडकणार याची काळजी घ्या. एखाद्याला दिलेले पैसे तडजोडीद्वारे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात स्थिरता राहील. व्यावसायिक वर्तुळाचा विस्तार होईल. संवाद कौशल्य आणि सादरीकरण यामुळे तुमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढेल. आर्थिक फायदा शक्यता आहे. जुन्या गुंतवणूक योजना आता नफा मिळवू लागतील.
मिथुन – कामे पूर्ण करताना इतरांना मदत करावी लागेल. वादग्रस्त मुद्द्यांपासून लांबच रहा. अतिउत्साही होण्याचे टाळा. करिअरसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. संशोधन आणि नियोजनातील सर्व अडथळे दूर होतील. मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. मात्र मोठे व्यवहार करताना कागदपत्रांवर विशेष लक्ष द्या. नवीन गॅझेट्सवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
कर्क – पडद्यामागील कठोर परिश्रम आणि व्यापक संशोधनावर प्रगती अवलंबून असेल. सहकाऱ्यांच्या कृत्रिम आणि वरवरच्या विधानांमागे काहीतरी वेगळा अर्थ असू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा. कुटुंबाशी असणारे भावनिक संबंध उत्साह वाढवायला आणि ताण कमी करण्यास मदत करतील. शक्य असेल तर प्रवास पुढे ढकला. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित अचानक आर्थिक लाभ किंवा वाद सोडवले जाऊ शकतात.
सिंह – उच्च शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकेल. स्पर्धांमध्ये तुमची कामगिरी उत्तम असेल. प्रवास करण्याचे बेत असतील तर ते पुढे ढकलणे योग्य ठरेल. भागीदारी आणि टीमवर्क हे तुमच्या यशाचे गमक आहेत. व्यावसायिक जगात तुमच्या सल्ल्याला अधिक महत्त्व दिले जाईल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अहंकाराने कोणताही निर्णय घेणे टाळा.
कन्या – व्यवसाय करारांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. शक्य असल्यास, दीर्घकालीन करारांवर स्वाक्षरी करणे काही दिवसांसाठी पुढे ढकला. व्यावसायिक प्रवास आनंददायी राहील. आजचा दिवस तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा देईल. व्यवसायातील तुमची कार्यक्षमता आणि तपशील समजून घेण्याची ताकद इतरांपेक्षा अधिक फायदेशीर ठरेल. नवीन बचत योजना यशस्वी होतील.
हेही वाचा – Bookshelf : ‘इरावती कर्वे…’ कुतूहलाची जागा घेतली अतीव आदराने!
तुळ – कामातील चांगल्या कामगिरीसाठी वरिष्ठांचा तुमच्यावर दबाव असेल. मार्केटिंगमध्ये गुंतलेल्यांना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणे सोपे नसेल. सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आंतरराष्ट्रीय संबंध किंवा उच्च शिक्षणात गुंतलेल्यांना मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजारातील मोठे धोके टाळावेत.
वृश्चिक – तुमच्या योजना गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. गुप्त रणनीती आणि डेटा विश्लेषणामुळे तुमच्या कारकिर्दीत लक्षणीय प्रगती होईल. मानसिक शांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. संशोधन आणि तांत्रिक कामात गुंतलेल्यांसाठी यशाची नवीन दारे उघडेल. कोणतीही घाईघाईची गुंतवणूक टाळा.
धनु – व्यवसायासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल. मात्र दीर्घकालीन कर्ज घेणे टाळा, अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या अपेक्षांवर तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. व्यावसायिक भागीदारी मजबूत होईल. सहकारी सहकार्य करतील. उत्पन्नात वाढ होण्याची चांगली चिन्हे आहेत.
मकर – सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करावी लागेल. तुमची कार्यक्षमता आणि शिस्त तुमच्या कारकिर्दीला बळकटी देईल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती मिळेल किंवा नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. बचत आणि घरगुती गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित कराल.
कुंभ – बहुप्रतिक्षित व्यावसायिक करारांवरील वाटाघाटी पुन्हा सुरू होऊ शकतात. भावनिक नातेसंबंधांमध्ये आज विश्वासाचा अभाव जाणवेल. संततीच्या कामगिरीने तुम्ही आनंदी असाल. सर्जनशील आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जातकांना मोठे यश मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे नवीन आर्थिक संधी आकर्षित होतील.
मीन – वरिष्ठांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च केल्याने खिशावर ताण येईल. परिणामी काटकसर करावी लागेल. सखोल संशोधन आणि दीर्घकालीन नियोजनाद्वारे करिअरमध्ये प्रगती होत आहे. घराशी संबंधित व्यवसाय किंवा मालमत्तेच्या जातकांना बाबतीत मोठे यश मिळवून देईल. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या.


