अजित गोगटे
पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांनी अनुकूल बातमी द्यावी, यासाठी त्यांना रोख रक्कम भरलेल्या कागदी लिफाफ्याच्या स्वरूपात राजरोस लाच देणे हे मुंबईच्या पत्रकारक्षेत्रात एकेकाळी कसे निंद्य मानले जात नसे, त्याविषयीचा अनुभव मी आज सांगणार आहे. ही घटना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे. त्यावेळी मी `दै. लोकसत्ता`मध्ये नोकरीला होतो.
त्या काळात कल्याणजवळील मोहने येथे (रेल्वे स्टेशन आंबिवली) ‘नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन’ (NRC) कंपनीचा मोठा कारखाना होता. दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांची तेथे कामगार संघटना होती. कामगारांच्या मागण्यांवरून कारखान्यात दीर्घकाळ धुसफूस सुरू होती. कंपनीने टाळेबंदी केली. अशा परिस्थितीत त्यावर्षीच्या स्वतातंत्र्यदिनी कामगारांनी, पोलिसांनी परवानगी नाकारूनही, बंद कारखान्याच्या गेटवर सभा घेतली. प्रक्षोभक भाषणांनी वातावरण तापले. दंगल झाली. ती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार कामगार ठार झाले. वृत्तपत्रांमधून पोलिसांसोबतच कंपनीच्या व्यवस्थापनावरही खूप टीका झाली. त्यानंतर काही दिवसांनी, मलिन झालेली प्रतिमा आपली बाजू मांडून सुधारण्यासाठी, कंपनीने मुंबईत त्यांच्या फोर्टमधील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली.
त्यावेळी मी बातमीदार म्हणून रोज हायकोर्टात जात असे. पत्रकार परिषदेचे ठिकाण तेथून जवळ असल्याने वृत्तांकनासाठी मी तेथे जावे, असे मला आमच्या वृत्तसंपादकांनी सांगितले. मी तेथे गेलो. पत्रकार परिषद होणाऱ्या दालनात जाताना कंपनीचे जनसंपर्क मी ते फोल्डर चाळून पहिले. त्यात कंपनीचे प्रसिद्धीपत्रक, वार्षिक अहवाल, काही फोटो अशा साहित्यांत सर्वात खाली ठेवलेला एक कागदी लिफाफा दिसला. उघडून पहिला, तर त्यात रोख 500 रुपये होते. माझ्या शेजारी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा प्रतिनिधी सतीश कामत बसला होता. फोल्डरमध्ये पैशाचा लिफाफा असल्याचे मी त्याच्याही निदर्शनास आणले. अशा प्रकारे पत्रकार परिषदेत रोख रक्कम देणे म्हणजे पत्रकारांना लाच देणे आहे, असे आमचे दोघांचेही मत पडले. आम्ही दोघांनी याचा निषेध करून पैशाचे लिफाफे टिळक यांच्याकडे परत केले.
पत्रकार परिषदेस त्यावेळचे आमचे उल्हासनगरचे वार्ताहर रमेश दुधाळकरही आले होते. त्यांचे तेथे येणे मला खटकले. ‘वृत्तसंपादकांनी मुद्दाम फोन करून यायला सांगितले म्हणून मी आलो’, असा त्यांनी खुलासा केला.
हेही वाचा – Unethical values of journalism : सरकारी घरे, पत्रकारांपुढील मोहक मायाजाल
संध्याकाळी ऑफिसमध्ये आलो आणि अन्य कामाखेरीज या पत्रकार परिषदेची बातमीही दिली. यादरम्यान, त्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी टिळक हे आमच्या ऑफीममध्ये येऊन वृत्तसंपादकांशी बोलत असल्याचे मला दिसले. दुपारची पत्रकार परिषद कशी झाली, ते टिळक त्यांना सांगत होते. ‘आम्ही दिलेली भेट नाकारून तुमच्या गोगटे साहेबांनी मात्र नाराज केले’, असे टिळक त्यांना सांगत असल्याचे मला ऐकू आले. वृत्तसंपादकांनी मला बोलावून त्याविषयी विचारले. मी आधी टिळकांना जे सांगितले होते, तेच त्यांनाही सांगितले. परंतु माझे म्हणणे त्यांना पटले नाही. त्यांनी त्यावर त्यांचा तर्क सांगून मला ते पैशाचे पाकीट घेण्याचा आग्रह केला. मी ते घेतले नाही. ‘मी त्याला नंतर समजावतो’, असे टिळकांना सांगत वृत्तसंपादकांनी टिळकांकडून ते पाकीट घेऊन स्वतःकडे ठेऊन घेतले.
दुधाळकरांना कल्याणहून एवढ्या लांब यायला लावल्याबद्दलही मी वृत्तसंपादकांकडे नाराजी व्यक्त केली. ‘त्यांनाही चार पैसे मिळावेत, यासाठी त्यांना यायला सांगितले’, असे कारण त्यांनी दिले. यावरून त्या पत्रकार परिषदेत रोख पैसे दिले जाणार आहेत, याची आमच्या वृत्तसंपादकांना आधीपासून माहिती होती, हे मला समजले. यामुळे वाटलेला अचंबा नंतर दूर झाला आणि त्याऐवजी धक्का बसला. कारण, अशी रोख रक्कम देण्याच्या सूचनेसह ती पत्रकार परिषद कशी आयोजित करावी, याचा सल्ला टिळक यांनी आमच्या वृत्तसंपादकांकडूनच घेतला होता.
हेही वाचा – Unethical values of journalism : शीतावरून भाताची परीक्षा
मी आणि कामत सोडून पत्रकार परिषदेसह आलेल्या इतर कोणत्याही पत्रकाराने अशा प्रकारे रोख पैसे दिले जाण्यास आक्षेप घेतला नव्हता. पाठोपाठ वृत्तसंपादकांचाही अनुभव आला. या कुप्रथेला पत्रकारांमध्ये सर्वसाधारण मान्यता असल्याचा निष्कर्ष त्यावेळी मी काढला.
(क्रमशः)