शैलजा भा. गोखले
सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. मंगळागौरीच्या जेवणाचा बेतही एकदम खास असतो. यात भाजणीचे वडे, मटकीची उसळ, मूगडाळ खिचडी किंवा साधं वरण भात आणि नंतर मसालेभात, गाजराची कोशिंबीर, दही, हिरवी चटणी असा सर्वसाधारण मेन्यू असतो. त्यापैकी भाजणीच्या वड्यांची पाककृती आपण बघणार आहोत.
साहित्य
तांदूळ – 1 किलो (जाडा, रेशनचा तांदूळही चालेल)
ज्वारी – पाव किलो
अख्खे काळे उडीद – पाव किलो
अख्खे चणे – पाव किलो
गहू – 100 ग्रॅम
हिरवा वाटाणा – 100 ग्रॅम
साबुदाणा – 1 वाटी (इथे वाटी याचा अर्थ आमटीची घरात असणारी वाटी)
जिरं – 100 ग्रॅम
धणे – 50 ग्रॅम
कोथिंबीर, लाल तिखट, पांढरे तीळ, मीठ, खाद्यतेल
पुरवठा संख्या – यात साधारणपणे 2 किलो भाजणी तयार होते.
तयारीस लागणारा वेळ :
- भाजणीचे साहित्य किंचित गरम करून घेण्यासाठी 3 मिनिटे
- भाजणी भिजवून मुरण्यासाठी 15 मिनिटे
एकूण वेळ : अंदाजे 18 मिनिटे
(साहित्य दळून आणण्यासाठी लागणारा वेळ यात धरलेला नाही)
शिजवण्याचा वेळ : गॅसच्या धगीनुसार वडे तळण्यासाठी लागणारा कालावधी
एकूण वेळ : 20 ते 25 मिनिटे
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
कृती
- वर दिलेले सर्व साहित्य निवडून किंचित गरम होईल इतपतच कढईत भाजून घ्या. (धान्य किंचित गरम करण्यामागचा हेतू हाच की, पावसाळ्यात कुठे दमटपणा असेल तर तो निघून जावा आणि भाजणी जास्त काळ टिकावी. अन्यथा, कोणतेही धान्य धुवून वाळवून घेण्याची गरज नाही.)
- सर्व साहित्य पूर्ण गार झाले की, गिरणीतून जरा जाडसर असे दळून आणा.
- वडे करायच्या वेळी तुम्हाला हवे तेवढे पीठ बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, पांढरे तीळ आणि आवडत असल्यास थोडासा ओवा चुरडून घाला. भरपूर कोथिंबीर धुवून बारीक चिरून यात घाला.
- हे सगळं भाजणीच्या पिठात नीट मिक्स करून वरून मोहन म्हणून रूम टेम्प्रेचरवर असणारे तेल घाला. पीठाचा मुटका वळेल एवढेच तेल यात घालायचे आहे. मुटका म्हणजे तेल घालून झाल्यावर मुठीने पिठाचा गोळा केला तर तो गोळाच रहातो, पीठ हातातून खाली सांडत नाही.
- यानंतर कोमट पाण्याने भाजणी भिजवून घ्या. थालिपीठासाठी जशी भिजवली जाते त्यापेक्षा थोडा घट्ट असा गोळा तयार करून 15 मिनिटे त्याला रेस्ट द्या.
- 15 मिनिटांनी मिश्रण छान मुरल्यावर एकीकडे कढईत तेल तापायला ठेवा. दुसरीकडे प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा शीटवर लहान गोळे थापून त्याला वड्याचा आकार द्या. मध्यभागी भोक पाडून गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या.
- सर्व्ह करताना दही आणि हिरव्या चटणीसोबत भाजणीचे गरमागरम वडे द्या.
(विशेष सूचना : केवळ मंगळागौरीच्या वेळीच नाही तर दुपारच्या खाण्यासाठी देखील हे वडे करता येतील.)
हेही वाचा – काय फक्त हाऊसवाइफ?