अध्याय पंधरावा
तैसे सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं । घेपिजती सर्पीं । गरुड जैसें ॥295॥ आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंस ॥296॥ जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि ॥297॥ तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥298॥ किंबहुना आत्मयाचां । निर्धारीं विवेकु जयांचा बुडाला वोघु गंगेचा । सिंधू जैसा ॥299॥ पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें । जैसें येथूनि पऱ्हां जाणें । आकाशा नाहीं ॥300॥ जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीजअंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥301॥ जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा ॥302॥ चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला । तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ॥303॥ हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें । तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ॥304॥ एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाख्यहुताशें । ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ॥305॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आणीकही एक तया, वोळखण असे धनंजया
अर्थ
सर्पाकडून गरुड जसा धरला जात नाही, त्याप्रमाणे सुखदु:खरूपी व पुण्यपापरूपी द्वंद्वाकडून जे वेढले जात नाहीत ॥295॥ आणि जे ज्ञानीपुरुषरूपी राजहंस अनात्मपदार्थमात्ररूपी पाणी टाकून, आत्मरूपी दूध सेवन करतात. ॥296॥ ज्याप्रमाणे सूर्य हा, आपलाच रस पृथ्वीवर वर्षून, पुन्हा तोच रस आपल्या किरणसमुदायांच्या द्वारे (आकर्षून) आपल्या बिंबाच्या ठिकाणीच आणतो ॥297॥ त्याप्रमाणे जो आत्मभाव, खर्या स्वरूपाच्या भ्रांतिमुळे देहादी अनेक अनात्मवस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे, तो आत्मभाव, ते सत्पुरुष (पुन्हा) आपल्या ज्ञानदृष्टीद्वारा नेहेमी आपल्या ठिकाणीच एकत्वाने पाहतात. ॥298॥ फार काय सांगावे! गंगेचा ओघ जसा समुद्रात तद्रूप होतो तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामधे तद्रूप होतो. ॥299॥ ज्याप्रमाणे (आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे) आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जाण्याचे कारण नाही, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्याकारणाने, ज्यांना इच्छा करण्याचे कारणच रहात नाही. ॥300॥ जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. ॥301॥ (समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती) ती मंदारपर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यानंतर, तो क्षीरसागर जसा शांत राहिला, त्याप्रमाणे ज्यांच्या अंत:करणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही. ॥302॥ जसा षोडश कलांनी युक्त चंद्र कोणत्याही अंगाने अपूर्ण दिसत नाही, त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्यांच्या ठिकाणी नसते. ॥303॥ त्या पुरुषाची गोष्ट निरुपम आहे! तेव्हा त्या पुरुषाचे मी किती वर्णन करू? ज्याप्रमाणे वायूच्या जोरापुढे रज:कणांचा टिकाव लागत नाही, त्याप्रमाणे ज्यांना विषयांचे नावदेखील आवडत नाही, ॥304॥ याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे (वर वर्णन केल्याप्रमाणे) केलेले आहेत ते त्या आत्मस्वरूपात जसे सोन्यात सोने मिळते, त्याप्रमाणे मिळतात. ॥305॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आगी लगलिया रुखीं, देखोनि सैरा पळती पक्षी


