“काका, वसू आणि मी आईबाबा होणार आहोत. संध्याकाळीच डॉक्टरांनी ही गोड बातमी दिली. ती इतरांना कळवतांना पहिला मान तुमचा आहे. काका आमचा, आमच्या प्रेमाचा आणि आमच्यातील नात्याचा हा पुनर्जन्म आहे असं आम्ही दोघंही मनापासून मानतो आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आभार मी मुळीच मानणार नाही. एवढे दिवस तुम्ही फक्त आमचे काका होतात. आता आमच्या बाळाचे आजोबा देखील होणार आहात ही भावनाच खूप सुंदर आहे.”
रात्री आठच्या सुमारास अनिरुद्धचा आलेल्या या मेसेजने मला मनापासून आनंद झाला. आपल्या हातून झालेल्या एका कामाचा अखेर गोड शेवट झाला याचं मला समाधान मिळालं. मला त्या दोघांबरोबर साधारण दीड वर्षभरापूर्वी झालेली आमची पहिली भेट आठवली.
0000
त्यांच्या लग्नानंतर अवघ्या तीन चार महिन्यांत त्यांचे छोट्या छोट्या कारणांवरून खटके उडायला लागले. घरच्या ताणतणावांमुळे अनिरूद्ध ऑफिसमध्ये बोलेनासा झाला. त्याच्या वरिष्ठांच्या नजरेत ही गोष्ट आली. कोणाच्या तरी ओळखीतून त्याला माझ्या समुपदेशनाच्या कामाबद्दल समजलं आणि एक दिवस तो आणि वसू मला भेटायला आले.
हेही वाचा – पेरणी
परस्परांना वेळ देता न येणे हे त्यांच्या वादाचे मूळ माझ्या लक्षात आलं. खूप खेळीमेळीच्या वातावरणात आमच्यात संवाद होत होता. दोघांचीही बाजू ऐकून मी बोलायला सुरुवात केली-
“तुमच्या दोघांच्या बोलण्यातून अजूनही तुम्हाला एकमेकांविषयी वाटणारं प्रेम जागोजागी डोकावताना दिसलं मला. तुमचा प्रेमविवाह. दोघांनाही दोघांच्या नोकरीबद्दल आधीपासून माहिती होती. ‘आपण करू ॲडजस्ट’ अशी एकमेकांची समजूत काढून तुमची ओळख तुम्ही वाढवत नेऊन अखेर त्याचं लग्नात रूपांतर झाले. नव्याची नवलाई संपली आणि वास्तवाचे भान हळूहळू तुम्हाला यायला लागलं. दोघं एकत्र अशी फार कमी दिवस घरात रहायला लागलात. एकजण काम संपवून संध्याकाळी घरी आला तर दुसऱ्याला रात्री घराबाहेर पडायला लागायचं.”
“एक गोष्ट मी आजच्या पिढीत बघितली ती ही की, प्रत्येक गोष्ट झटपट झालेली हवी असते. सहनशीलता, सोशिकपणा, मन विचलित होऊ न देता, शांतपणे जगणं या गोष्टी तुमच्या अंगी दिसत नाहीत. लग्न म्हणजे सहजीवन असतं. जिथे तुझं माझं असं वेगळं काही नसतं. जे असतं ते आपलं असतं. परस्पर विश्वास, आदर आणि प्रेम ही त्रिसूत्री आहे, सुखी आणि समाधानी संसाराचा पाया आहे. तुम्हां दोघांच्याही क्षेत्रात शांतपणे काम करायची संधी फार अभावानेच मिळते कारण तुम्हाला काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादा पाळायच्या असतात. तुमच्या वेळेत पूर्ण झालेल्या कामावर इतर कामे सर्वार्थाने अवलंबून असतात. वेळेचं गणित जर चुकलं, तर त्याचा आर्थिक फटका आधी कंपनीला आणि नंतर तुम्हाला बसू शकतो. तुमच्या बुद्धीची, कौशल्याची आणि न थकता काम पूर्ण करण्याची रोजच परीक्षा असते. तरी देखील घरात दोघांना मिळेल तो वेळ जास्तीत जास्त आनंदात घालवायचा प्रयत्न करा. आज घरबसल्या करमणुकीची साधनं रिमोटच्या बटणावर उपलब्ध आहेत. कमी वेळ असला तरी गाडी काढून बाहेर फिरायला जात जा, ज्यूस सेंटर किंवा आइस्क्रीम पार्लरमध्ये जा. नाहीतर घरातच गप्पा मारत बसा… नवीन वस्तू खरेदीवर चर्चा करा. एखाद्या रविवारी चुकून घरी असलात तर संध्याकाळी आलटून पालटून दोघांच्याही आईवडिलांना भेटून या किंवा तुमच्या सामाईक मित्रांना घरी जेवायला बोलवा.” पुढेही मी कितीतरी वेळ बोलत होतो आणि हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा, त्यासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सुचवत होतो.
दोघांनाही ते पटत होते, ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते.
हेही वाचा – कन्यादान… एक ऋणानुबंध
“एक गोष्ट कायम लक्षांत ठेवा. संसाराचा प्रवास दोघांनाही एकत्रच करायचा असतो. एक दमला कधी तर दुसऱ्याने पुढाकार घेऊन जास्त ताकदीने आणि मेहनतीच्या जोरावर तो पुढे न्यायचा असतो. आजारपण, अपघात यासारखे गतिरोधक अचानकपणे समोर येतात. त्याप्रसंगी डोकं शांत ठेवून आणि मनावर ताबा ठेवून अडचणींवर मात करायची असते डगमगून न जाता. कसोटीचे क्षण जरूर येतात, तेव्हा तुमच्या जिद्दीची आणि मेहनतीची परीक्षा असते. सुरवातीला थोडा त्रास जरूर होतो पण एकदा का आपल्याला परिस्थितीचं आकलन झालं की मग त्यातून मार्ग निघत जातो. नात्यांच्या या तिजोरीत कायम सुख आणि आनंद भरायचा असतो. या तिजोरीची चावी म्हणजेच तुमचं सहजीवन असतं.”
जवळपास चार तास आमच्यात गप्पा झाल्या. मी माझ्या परीने त्यांना रस्ता दाखवला होता. आनंदाने ते दोघे घरी गेले. अधूनमधून एकत्रितपणे त्यांनी कुठे कुठे वेळ घालवला तिथले फोटो मला ते पाठवत होते. एकदा चक्क मलाच त्यांच्या घरी जेवायला बोलावले त्यांनी. त्या दिवशीची त्यांची देहबोली बघून एकंदरीत गाडी रूळावर येऊन सुसाट वेगाने धावत असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. तिथून निघताना दोघांनीही पाया पडून माझा आशीर्वाद देखील घेतला होता.
0000
आणि आता थोड्यावेळापूर्वी आलेला अनिरूद्धचा हा मेसेज.
देवाजवळ साखर ठेवून मी भगवंताकडे त्या दोघांच्याही नवीन भूमिकेसाठी आणि येणाऱ्या बाळाच्या सुखरूप आगमनासाठी मनोभावे प्रार्थना केली.


