अध्याय पंधरावा
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥201॥ तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ॥202॥ म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥203॥ परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें । ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा ॥204॥ आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिकनामें विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळतां । भरलिया ब्रह्मीं ॥205॥ मनुष्यालागौनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥206॥ पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ॥207॥ एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥208॥ आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें । आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा ॥209॥
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिनं च संप्रतिष्ठा । अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥3॥
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी । जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ॥210॥ कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥211॥ हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं । माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥212॥ ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥213॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : उकलतेनि उन्मेखें, प्रज्ञाकुशलतेंची तिखें
अर्थ
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते, ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते. ॥201॥ त्याप्रमाणे जेथून या संसारवृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणार्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात. ॥202॥ म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे ॥203॥ परंतु हे असू दे. याप्रमाणे हे अर्जुना, ब्रह्मादिक डहाळ्या या संसारवृक्षाचे वरचे मूळ जी माया, तिच्या तुलनेला येत नाहीत. ॥204॥ आणखी काहीं ज्या सनकादिक नावांनी वरच्या (निवृत्तिमार्गाच्या) प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसारवृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. ॥205॥ याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक, ही जी (संसारवृक्षाची) शेवटची पालवी तेथपर्यंत, या संसारवृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते, हे समज. ॥206॥ अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत, त्यांना मनुष्यत्वच मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत, असे आम्ही म्हटले. ॥207॥ याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसारवृक्ष तुला सांगितला. ॥208॥ आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली. आता हा संसारवृक्ष कशा प्रकाराने उपटला जातो ते ऐक. ॥209॥
परंतु त्याचे जसे वर वर्णन केले आहे तसें त्याचे खरे स्वरूप आहे, तसें येथे (विचार करता) आढळून येत नाही, याला अंत नाही, आदि नाही व स्थितीही नाही. अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थ वृक्षाला बळकट अशा असंगरूपी (वैराग्यजन्य ज्ञानरूपी) शस्त्राने छेदून ॥3॥
परंतु अर्जुना, तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की, या एवढ्या झाडाला उपटील असे एवढे (साधन) काही आहे काय? ॥210॥ कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ तर (कोठे) वर निराकार ब्रह्मामधे आहे. ॥211॥ हा संसारवृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादि स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसर्या मनुष्यरूपी मुळांनी मध्ये विस्तारतो. ॥212॥ असा हा संसारवृक्ष बळकट व अमर्याद आहे, तर आता याचा शेवट (उपटून टाकणे) कोण करील? असा शुद्ध विचार तू कदाचित मनात आणशील, तर आणू नकोस. ॥213॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माजीं वेदांचा पाला दाट, तो करी सुविद्येचा झडझडाट


