काव काव .. काव काव
चिऊताई चिऊताई, दार उघड!
चिऊताई चिऊताई, दार उघड!
युगानयुगं कावळेदादा चिऊताईचं दार ठोठावत असतो.
चिऊताई इवलुशी, नाजुकशी, भित्रट, कोवळी, मुठीएवढी दिसत असली ना, तरी मोठी हुशार असते.
ती कावळेदादासाठी मुळ्ळीच दार उघडत नाही.
आपल्या घरट्यात बसल्या बसल्या ती एक एक कारणं सांगते-
“थांब माझ्या बाळाला आंघोळ घालतेय!’
“थांब माझ्या बाळाला तीट लावतेय!”
चिमणोजीपंत नसतातच हं कुठे,
एकट्या चिऊताईच खिंड लढवत असतात.
कावळेदादा दार ठोठावून… ठोठावून दमून जातात.
पण कारणं सांगून चिऊताई काही दमत नाहीत.
000000
कावळेदादा पण जिद्दीचे असतात.
पुन्हा ते दार ठोकतात.
नॉक..नॉक…नॉक नॉक
चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊताई मुळातच हुशार,
आता तर ती आणखीनच चतुर झालेली असते.
ती दाराच्या पीप होलमधून बाहेर बघते,
दाराच्या समोर कावळेदादाला बघून सरळ आत निघून जाते.
दादच देत नाही. काही कारणं पण सांगत नाही.
000000
हेही वाचा – … तर लाइक कराच!
कावळेदादा चिकाटी सोडत नाहीत.
काळ पुढे सरकलेला असतो.
ते डोअर बेल वाजवतात.
डिंग डॉंग.. डिंग डॉंग
चिऊताई चिऊताई दार उघड.
पण आता चिऊताई मुळी घरातच नसतात.
त्या नोकरी करत असतात. दारासमोर सेफ्टी दार आलेलं असतं.
सगळीकडे सीसी कॅमेरे बसवलेले असतात.
बाळाला सांभाळायला मावशीबाई आलेल्या असतात.
त्यांना बजावून, बजावून सगळं शिकवून…घोटून घेतलेलं असतं.
त्या सेफ्टी चेन लावून, दार किलकिल करून टेचात सांगतात,
“मेमसाब घरपे नहीं है…बाद में आओ!”
पण कावळेदादा तर अर्क असतात.
त्यांना बरोब्बर माहिती असतं, चिऊताईला कसं गाठायचं.
ते नेमक्याजागी जातात, इथेपण श्रीयुत चिमणे नसतातच.
000000
कावळेदादा पिंग करतात,
चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिऊताई आता खूप स्मार्ट झालेली असते.
ती कावळेदादाकडे ढुंकूनही बघत नाही.
कावळेदादाने डोकं आपटून घेतलं तरी ती शांतपणे आपलं काम करत राहणार.
आता स्वसंरक्षणासाठी तिच्या हातात खूप आयुधं आली आहेत. जी दिसत नाहीत, पण वापरता मात्र येतात,
अन्फ्रेंड करणं, ब्लॉक करणं, रिपोर्ट करणं!
ती निर्धास्त असते.
आपलं आयुष्य कावळेदादाला न घाबरता धुंद जगत असते.
हेही वाचा – लग्नाळू लेक, पालक आणि सुजाण संवाद
000000
कावळेदादा प्रयत्न सोडतच नाहीत. ह्या नाही तर त्या चिऊताईचं दार ते ठोठावतच असतात.
एखाद्या चिऊताईच्या घरात शिरकाव करून घ्यायला ते यशस्वी झाले तर खुशाल समजा कावळेदादा खूप खूप हुशार, चलाख, प्रभावशाली आहेत
किंवा
चिऊताई युगानयुगाचा अनुभव असूनही त्यातून काहीच शिकल्या नाहीत,
किंवा
चिऊताई कावळेदादाच्या गोड बोलण्याला भुलल्या आणि फसल्या,
किंवा
चिऊताई जरा मंदच आहेत,
किंवा
चिऊताईला पण सुखरुप राहून कावळेदादाला भुलवायचं आहे.
किंवा
चिऊताई कावळेदादाला आत्ता घरात घेणार आहेत… पण मग त्यांची लक्तरं काढून चव्हाट्यावर धुणार आहेत…….स्क्रीन शॉट काढून!
तेव्हा….सावध, कावळेदादा सावध!


