भाग – 51
“शर्वाय जिथं, तिथं ही. चिकटलेली असते, जणू काही त्याच्या सावलीपेक्षाही जवळची!”
माधव आता मुद्दामच उगाचच मोठ्याने बोलत होता, कारण त्याच्यासोबत तिथे अन्वीही उभी होती. अन्वी काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसत होतं. आराध्या शांतपणे उभी राहिली. एक क्षण, दोन क्षण…
मग ती हळूच वळली. तिच्या डोळ्यांमधून आग बरसत होती.
ती थेट माधवकडे पाहत म्हणाली —
“माझं प्रेम, माझं नातं आणि माझा स्वाभिमान… हे तीनही माझं आहे माधवकाका. ज्या नात्यांत पारदर्शकता असते, ती चिकटलेलं दिसत नाही ना तशी ती त्या लोकांना वाटत… आपण जिथे हेतू लपवतो, तिथे सावल्या चिकटलेल्या वाटतात. शर्वाय माझे बॉस आहेत, त्याच्यासोबत असणं ही माझ्या कामाची जबाबदारी आहे. तुम्ही मात्र माझ्यावर चिखलफेक करताय? का तर मी माझ्या बॉसशी प्रामाणिक आहे म्हणून? तुम्ही नाही आहात का?”
माधवचा चेहरा क्षणभर गडद झाला. अन्वी थोडीशी अस्वस्थ झाली.
आराध्या पुढे झाली, “शब्दांनी जखमा करायच्या असतील तर लक्षात ठेवा – मी शब्दांनीच उत्तर देऊ शकते… मी जहागीरदार इंडस्ट्रिजची एम्प्लॉयी आहे… तुमची नाही.”
ती तिथून निघून गेली.
आराध्याचं अस बोलणं पाहून अजून कोणी तरी होतं जे खूश झालं होतं… आणि आराध्याला चिअर करत होतं…
अन्वी काही बोलली नाही. पण तिच्या मनात पहिल्यांदाच आराध्याविषयी एक वेगळी भावना उमटली…
आराध्या बदलली होती…
हो, तिला जाणीव झाली आहे स्वतःची…चुकीच्या विरोधात उभं राहण्याची आणि खोट्याला दूर सारायची…
आराध्या खिडकीजवळ उभी होती. समोरच्या अंगणात माधव आणि अन्वी बोलत होते. सुरुवातीला ती गप्प होती. पण जसजसं त्यांच्या बोलण्यातलं सवंग हसू, अनपेक्षित मोकळेपणा दिसायला लागला आणि अन्वीच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या नकळत सहजतेच्या छटा तिनं पाहिल्या — तसतसं तिचं मन गोंधळून जायला लागलं
माधव… जो आतापर्यंत घरात नेहमीच मोजून मापून बोलायचा, समोरच्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन शब्दांची मांडणी करत असायचा — आज मात्र अन्वीसमोर अवाजवी सहजतेनं वागत होता.
“तुला इथलं सगळं दाखवतो…या वाड्यात काही खूप खास कोपरे आहेत,” माधव अन्वीच्या अगदी जवळ येत म्हणाला होता.
आराध्याचं कपाळ ठणकलं…
शर्वाय आणि दत्ताचा सतत सावध राहण्याचा सल्ला तिला आठवला.
“माधव हसून बोलतो पण त्याच्या मनात काय आहे ते ओळखणं कठीण….”
आराध्याच्या मनात आता एक नवी शंका निर्माण झाली: “अन्वीला आपण विश्वासात घेतलं पाहिजे का? की ही दोघं मिळून काही मोठा डाव रचत आहेत?”
आराध्याचं अंतःकरण तिला सावध करत होतं.
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…
आता आराध्या निर्धारानं स्वतःशीच म्हणाली – “जे वाटतंय ते खरं असेल तर… यावेळी पुरावा हातात हवाच.”
ती वळली, आणि अगदी सावध पावलांनी खाली उतरली…
कारण या खेळीमध्ये भावना नव्हे, तर शहाणपण हवं होतं.
आणि म्हणूनच तिने माधवला प्रत्युत्तर केलं होतं… आणि हेच शर्वाय त्याच्या स्क्रीनवर पाहून खूश झाला ….
“शाब्बास माझी वाघीण… मस्त उत्तर दिलस…त्या ठिणगी नं तुझ्यात जन्म घेतलाय…. आता हळूहळू कळेल कोण कसं चेकमेंट होतं… ”
आराध्याच्या नजरेतली ती आग पाहून शर्वाय खूश झाला होता … तर माधवला ही येणाऱ्या संकटाची चाहूल वाटली….
खरं तर शर्वाय घरातून कोणत्या कामाकरिता निघालाच नव्हता… फक्त त्याला या अन्वीला भेटायचं नव्हतं. अन्वी आराध्याशी जे काही वागत होती त्याबदल त्याला चीड होतीच.
पण इंटरव्ह्यूच्या नावाखाली अन्वी आराध्यासोबत जे काही घडवू पहात होती ते तर भयंकर होते. विनाकारण ती आराध्याचा इतका तिरस्कार करत आली होती.
करायला गेलं तर तो खूप काही करू शकला असता, तो पण तो शर्वाय होता. कोणाचं वाईट करणं त्याच्या वृत्तीत नव्हतं. उद्या नुसत्या ओळखीवर ही अन्वी त्याच्या गळ्यात पडू शकली असती, म्हणूनच हे सगळं टाळण्यासाठी तो बाहेर पडला.
शर्वाय आपली गाडी घेऊन निघाला. शहराबाहेर एक भली मोठी कॅरा व्हॅन उभीच होती. तिथे जवळच असणाऱ्या गर्द झाडीमध्ये त्याने आपली कार पार्क केली…
थोडा वेळ इथं-तिथं पाहून, त्याने सावधपणे झुडुपातून वाट काढली. एकाग्रतेने तो पुढे जात होता. समोर असलेल्या कॅरा व्हॅनचा दरवाजा एक हिसक्याने उघडतं, त्याने आत प्रवेश केला.
आतलं दृश्य विस्मित करणारं होतं…
व्हॅन मध्ये सहा मोठे स्क्रीन होते – प्रत्येकावर वाड्यातल्या विविध भागांचं थेट चित्रण सुरू होतं…
पहिल्या स्क्रीनवर — आराध्या देव खोलीत आजीशी काहीतरी बोलत होती.
दुसऱ्या स्क्रीनवर — शर्वायच्याच ऑफिसमधील कॅबिन दिसत होती.
तिसऱ्यावर — आनंदी आणि निशा काहीतरी बोलताना दिसतात.
चौथ्या स्क्रीनवर — माधव अन्वीसोबत हसत खेळत बोलतोय
पाचवा स्क्रीन — शर्वायचा मजला
सहावा स्क्रीन — त्याचे बाबा दिवाकर आणि सुमित्रा आजी काही बोलताना दिसत आहेत.
अशा तऱ्हेने शर्वाय वाड्याबाहेर राहून वाड्यावर नजर ठेवून होता…
वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये… अन्वी, आराध्या, आनंदी, निशा आणि माधव एकत्र गप्पा मारत होते. पण निशाला एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे शर्वाय कुठेच दिसत नाही.
निशा थोडी चिंतीत होऊन आनंदीकडे वळली आणि हळू आवाजात म्हणाली, “आनंदी, आम्हाला येऊन बराच वेळ होऊन गेला. शर्वाय बराच वेळ झाला तरी दिसले नाहीत. आज भेटण्याचं ठरलं होतं ना?
आनंदी थोडं गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, “हो, शर्वाय खरं तर थांबला होता, म्हणून तर भेट ठरवली. पण तुम्ही यायच्या अगोदर त्याला कॉल आला आणि तडकाफडकी तो वाड्याबाहेर पडला….
तिने लगेच फोन उचलला आणि कॉल लावला — “The number you are trying to reach is currently unreachable…” क्षणभर शांतता पसरली.
तितक्यात आराध्या त्यांच्या मागे येऊन उभी राहिली आणि त्या दोघींचे बोलणे ऐकले.
आराध्या: “काय झालं? कोणाचा कॉल लागेना?”
निशा: “शर्वाय दिसत नाहीत आम्ही आल्यापासून. फोनही लागेना… सगळं ठीक आहे ना?”
आराध्याचं हसणं क्षणात थांबलं. तिच्या चेहऱ्यावर अचानक काळजीचे भाव उमटले.
आराध्या मनातच बोलत होती…. “शर्वाय, तुम्हाला यांना भेटायचं नव्हतं म्हणूनच वाड्याबाहेर पडलात ना? पण आता काय आणि किती वेळ तुम्ही असे बाहेर राहणार आहात? खरंच काही काळजीचं कारण नसावं…”
त्याचवेळेस, कॅरा व्हॅनमध्ये शर्वाय अजूनही स्क्रीन्सकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर सतत काहीतरी उमटतं होतं
त्याने फोन साइलेंट मोड करून टेबलावर ठेवून दिला होता — त्यावर आराध्याचा मेसेज झळकला..
” आई तुम्हाला कॉल करत आहेत… कॉल लागत नाही… ”
शर्वाय अजूनही त्या स्क्रीन्ससमोर बसलेला होता. आराध्याचा मेसेज वाचून त्याचे डोळे चमकले…
त्याने पटकन फोन उचलला आणि आनंदीला कॉल लावला…. पलिकडून आनंदीने कॉल उचलला….
आनंदी काळजीच्या सुरात बोलली, “शर्वाय! तू आहेस तरी कुठे? मी तुला सतत कॉल करत होते.” तिचा आवाज थरथरत होता, “आज तू काही नीट न सांगता असा कसा गेलास !”
शर्वाय थोडा शांतपणे पण विचार करतच बोलला, “आई अति महत्वाचं काम होतं, मलाच नीट समजलं नव्हतं, मग मी घरी काय कसं सांगणार?
शर्वाय एक दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाला, “माझं नेटवर्क बंद होतं, आणि मी पण थोडा कामात होतो. आई, सॉरी असं न सांगताच निघावं लागलं …”
शर्वाय तिथून बोलत होता आणि इथे वाड्यात तेच शब्द आनंदी मोठ्याने उच्चारत होती….
आनंदी गंभीर होऊन….”शर्वाय… क्षितिज-9 प्रोजेक्ट आपल्याकडून गेला…? आणि त्याहून भयंकर म्हणजे – आपल्या कंपनीच्या प्रायव्हेट पेपर्सची कॉपी बाहेर लीक झाली आहे. हे केवळ कॉर्पोरेट लॉस नाही, हे कोणीतरी जाणूनबुजून घडवलंय असं वाटतंय.” ती अक्षरशः हादरलीच…
हेही वाचा – आजींनी आराध्यावर सोपविली नवीन जबाबदारी
हे सगळं बोलणं जोरात सुरू असल्याने सगळ्यांना सहज ऐकू जातं होतं…. तिथे बसलेल्या एकाचं शरीर हे बोलणं ऐकून थंडच पडलं….
आनंदीने जसा फोन ठेवला तसा माधव अगदी काळजीपोटी तिच्याकडे धावला….
“आनंदी, काय म्हणत होता शर्वाय? प्रोजेक्ट गेला आणि पेपर्सची कॉपी लीक झालीये?… अरे बापरे … ”
” मला वाटतंय मी निघायला हवं … काय झालंय ते जोपर्य़ंत कळत नाही तोवर माझं मन थाऱ्यावर नसेल…. चल मी आवरतो…” म्हणून तो आपल्या खोलीकडे धावला.
निशा आणि अन्वीला शोधत आनंदी पाठच्या अंगणात गेली… जिथे आजी त्यांना आपल्या वाड्याच्या रीती परंपरांची माहिती देत होत्या.
“सॉरी… निशाताई, शर्वायची भेट होईल असं वाटत नाही, ऑफिसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे,” आनंदी निशाकडे पाहून म्हणाली.
“अरे बापरे …. हो का? मग आम्ही पण निघतो. अजून थांबण्यात काही अर्थ नाही,” निशाने उठतच उत्तर दिलं
त्याही जणू ही उत्तम संधी मिळाली असं जाणवून निघाल्या…


