|| श्री स्वामी समर्थ ||
पंचतत्त्वांशी आपली सर्वांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची वेगळी ओळख करून न देता सरळ विषय मांडते. आपल्या ऋषी मुनींनी निसर्ग कुंडली अतिशय अभ्यासपूर्वक मांडली आहे. त्यातील पंचतत्त्वे अभ्यासण्यासारखी आहे. सूक्ष्म अभ्यास केला तर लक्षात येते की अग्नीच्या समोर वायूतत्त्व आले आहे. अग्नीसाठी प्राणवायू लागतो आणि म्हणूनच अग्नीसमोर वायू आहे. पण हा वायू प्रमाणबद्ध असला पाहिजे, अतिरिक्त असून उपयोगी नाही अन्यथा अग्नी भडकू शकतो .
जल तत्त्वासमोर पृथ्वीतत्त्व आहे. कोरडी माती कसलाच आकार घेवू शकणार नाही. मातीचे भांडे बनवायचे तर जल हवेच, इतकी साधी सोपी रचना आहे. तसेच जल धरून ठेवायला सुद्धा पृथ्वी तत्त्व लागते. म्हणूनच त्यांच्या राशी एकमेकांसमोर. केंद्रातील सर्व स्थाने अति महत्वाची आणि आपल्या आयुष्याचा तोच आधार आहे तिथे चारही तत्त्वे असतात, अशी तर्कशुद्ध रचना आपल्या कुंडलीची आहे.
कुंडलीचा सखोल अभ्यास त्यातील अनेक गोष्टीतील तर्क उलगडून दाखवतो. केंद्रातील स्थानांमध्ये चर तत्त्व आहे. जन्माला आल्यावर तिथेच थांबून न राहता शरीर, बुद्धी, मन या सगळ्यांत वाढ अपेक्षित आहे. चतुर्थ भाव म्हणजे सुखस्थान, प्राथमिक शिक्षण, वास्तू या सर्वात वाढ किंवा अधिक चांगला बदल झाला पाहिजे. सप्तम भावात अर्धांगिनी, नवीन नाते उमलू पाहणारे हे स्थान. नवीन नाते, अनेक अपेक्षा घेऊन बहरणारे हे स्थान. त्यामुळे सर्वांगीण प्रगती इथे अपेक्षित आहे. सरतेशेवटी दशम भाव. कायम तोच पगार असेल तर कसे निभावणार नाही का? हुद्दा, दर्जा, सामाजिक पत उंचावण्यासाठी अर्थार्जनाचा आलेख सुद्धा उंचावला पाहिजे. थोडक्यात या चारही स्थानांत असलेली कार्ये ही दिवसागणिक बदलत जाणारी, यशाची निर्मिती करून आयुष्याचा आलेख उंचावणारी आहेत. म्हणून इथे चर तत्त्वाच्या राशी ज्या माणसाला सतत कार्यरत ठेवतात, पुढे पुढे नेत राहतात, त्यांचे अधिष्ठान आलेले आहे.
आयुष्याच्या जवळजवळ मध्यापर्यंत येणारी स्थाने आणि त्यांच्या राशी बघा. आयुष्याचा उपभोग घेणारा शुक्र आणि आर्थिक नियोजन करणारा बुध यांच्या राशी तिथे आहेत. संसार सुखाचा होण्यासाठी लागणारा शुक्राचा आविष्कार तारुण्यात झालेला दिसतो. त्याआधी शिक्षण आणि पोटासाठी अर्थार्जन बुध देत आहे. मुलीचा बाप आपल्या लेकीचे पोट हा मुलगा कसे भरणार ते पाहणारच की. जीवनात पन्नाशीनंतर असतो तो वानप्रस्थाश्रम. त्यामुळे 9, 10, 11, 12 या क्रमांकांच्या राशी विरक्ती आणणाऱ्या आणि मोक्षाकडे वाटचाल करायला लावणाऱ्या दोन महत्वाच्या ग्रहांच्या आहेत आणि ते म्हणजे गुरु आणि शनी.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू
आपण आयुष्याच्या संध्याकाळीच काही गोष्टी सोडून देऊ शकतो, अर्थात तेही अध्यात्माचा पाया जीवनात भक्कम असेल तरच, अन्यथा आपण सगळेच कवटाळून बसतो. एखादी साडी विरली तरी ती कुणाला तरी आठवण म्हणून देऊन टाकण्याची वृत्ती आपली नसते. आठवणही राहू द्या. त्यापेक्षा कुणीतरी ती चार वेळा नेसेल तरी असा विचारही आपण करत नाही. असो. वय झाले की माणसाने प्रपंचातून लक्ष काढून प्रभूच्या चरणी मन, चित्त गुंतवावे हेच या कुंडलीच्या मांडणीतून सिद्ध होते.
लग्न भावात वृश्चिक ही राशी नसून चर तत्त्वांची मेष राशी आहे. लहान बाळ जन्म झाल्यावर तसेच, तेवढेच राहते का? तर नाही. सुरूवातीला हातापायांची ओळख, मग त्याच हातापायांची सायकल चालवणे, हाच त्याचा व्यायाम. मग ते पालथे पडायला शिकते आणि हळूहळू एकएक गोष्टी शिकत, मोठे होत जाते, कारण हाच आयुष्याचा नियम आहे. एका जागी न थांबता सतत पुढे जात राहिले पाहिजे.
चतुर्थात येणारी कर्क राशी तिथे आपले सुखस्थान आणि माता. आई म्हणजेच घर हे आपले समीकरण आहे. आईशिवाय घर असूच शकत नाही हे सर्वश्रुत आहे. आईचा मायेचा हात आपल्या लेकरांवरून आणि घरावरून फिरल्याशिवाय घराला घरपण नाही हे त्रिवार सत्य आहे. त्याप्रमाणे प्रत्येक ग्रह आणि स्थानाची महती इथे आहे आणि त्याच्यामागे तर्क हा आहेच जसे लग्न हे रूप दर्शवते आणि रूप अग्नी, प्रकाश आणतो. म्हणून तिथे मंगळाची अग्नी तत्त्वाची मेष राशी आहे.
द्वितीय भाव हा कुटुंबाचा आहे अर्थात कुटुंब संस्था टिकवायची असते, कुटुंबातील एकमेकांना धरून ठेवूनच संसाराची गाडी पुढे न्यावी लागते, म्हणून तिथे पृथ्वी तत्त्वाची स्थिर, गोडवा जपणारी वृषभ राशी आहे. शुक्र हा सुद्धा जल तत्त्वाचा आहे. इथे मनाचा चंद्र उच्च होतो. संसारात मन नसेल तर सर्व फोल आहे.
बुध, शुक्र, शनी हे त्यांच्या लग्नाला शुभ होतात, तसेच रवी, चंद्र, मंगळ, गुरु हे त्यांच्या लग्नाला शुभत्व देतात. काही स्थानांचे स्वामी एकमेकांचे मित्र देखील असतात.
बुध हा पृथ्वी तत्व दर्शवतो आणि त्याच्याकडे गंध आहे. गंध आणि श्वास आपण नाकाने घेतो. तिथे दोन नाकपुड्या आहेत कारण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे, जसे आपण प्राणायामात करतो. बुध हा द्विस्वभावी राशीचा आहे. म्हणून तिथे श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया होते. बुधाकडे गंध आहे आणि बुधाकडे त्वचाही आहे. त्वचेला छिद्रे असतात, ज्यामधून घाम बाहेर फेकला जातो. जर घामाचा उग्र वास असेल तर कुठेतरी शनीसुद्धा बिघडलेला असतो. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे म्हणून आपल्या देहाला सुंदरता आणि आकार, उकार आहे.
हेही वाचा – पत्रिकेतील ग्रहदशा: समज, गैरसमज
पोटात आलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यासाठी षष्ठ भावात सुद्धा पृथ्वी तत्त्वाच्या बुधाची कन्या राशी आहे. शरीराला आवश्यक घटक जवळ ठेवून इतर बाहेर टाकून देणे ही क्रिया इथे अपेक्षित असल्यामुळे इथे कन्या ही द्विस्वभावी राशी आहे.
कुठल्याही पत्रिकेतील फलादेश पाहणे तेव्हाच शक्य होते, जेव्हा या मूलभूत गोष्टी आपल्याला नीट समजतील. आपला देहसुद्धा पंच तत्त्वांचा बनलेला असून, एक दिवस पंचतत्त्वातच विलीन होणार आहे, हे लक्षात ठेवून पत्रिकेचा अभ्यास होणे गरजेचे आहे.


