मेष : कामाचा ताण कमी
- दिवाळीच्या निमित्ताने या आठवड्यात मनासारखी खरेदी करू शकाल. नोकरदारांना पगारवाढ, बोनस मिळेल. कुटुंबीयांसाठी खर्च करू शकाल. कामाचा ताण कमी होईल. ऑफिसमधील वातावरण छान खेळीमेळीचे असेल. व्यवसायात नवीन बदल घडतील. या सकारात्मक बदलांचा नफ्याच्या दृष्टीने फायदा करून घ्या. व्यवसायात जर एखादा भागीदार असेल तर त्याचे बोलणे ऐकून, समजून घ्या. महिलांसाठी दिवाळीचा हा आठवडा आनंदाची पर्वणी असेल, कारण घरी नातवंडे, जवळचे नातेवाईक येतील. विद्यार्थ्यांना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील, त्यांच्यासोबत मजा करू शकाल.
वृषभ : दिवाळी आनंदात साजरी कराल
- दीपावलीच्या या आठवड्यापासून नवीन उपक्रम सुरू करू शकाल. नोकरदारांना आर्थिक लाभ आणि इतर सवलती मिळतील. त्यांच्या अधिकारात वाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांचे भागीदार आणि इतर कर्मचारी दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी घेतील, त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी घेऊन काम पूर्ण करावे लागेल. महिलांना परदेशी जाण्याचा योग आहे. दिवाळी आनंदात साजरी करू शकाल. विद्यार्थ्यांना पॉकेटमनी वाढून मिळेल, त्यातून ते लहान भावंडांसाठी खरेदी करू शकतील.
मिथुन : कामापुरते बोला
- या आठवड्यात स्थिरता येईल. नोकरदारांनी आपले काम स्वतः करावे, इतरांवर अवलंबून राहू नये. कोणाला फुकटचे सल्ले द्यायला जाऊ नका. जास्त बोलू नका, कामापुरतेच बोला. व्यावसायिकांनी स्पर्धकांपासून सावध रहावे. व्यावसायिक गुपिते कोणाजवळ बोलू नका. दिवाळीच्या निमित्ताने नवीन संकल्पना राबवू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी महिला वर्गाचा जास्त खर्च होईल. वस्तूंची खरेदी करण्याआधी किंमत तपासून, ठरवून मगच पुढे जा. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
कर्क : कामाचे नियोजन करा
- मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदार जातकांवरील कामाचा ताण कमी होईल. त्यासाठी कामाचे नियोजन उपयोगी पडेल. वरिष्ठ आणि सहकारी यांची मदत मिळेल. व्यावसायिकांचा भागीदारीतील व्यवसाय तेजीत येईल. त्यामुळे मनाप्रमाणे खर्च करू शकाल. दिवाळीच्या निमित्ताने हाताखालील स्टाफला बोनस द्याल, त्यांना खूश ठेवाल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पथ्यपाणी सांभाळावे, व्यायाम करावा. विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबीयांबरोबर पिकनिकला जाऊ शकतील. भावा-बहिणींच्या भेटी होतील.
सिंह : नवीन संधी मिळतील
- या आठवड्यात नवीन गोष्टींना सुरुवात करू शकाल. जे जातक नवीन जॉब शोधत असतील त्यांना नवीन संधी मिळतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यामुळे नवीन गुंतवणूक करू शकाल. महत्त्वाच्या कामाला वेळ द्यावा लागेल. व्यावसायिकांना नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन जोडधंदा सुरू करता येईल. त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही लगेच मिळेल. महिलांच्या कामाचे घरी कौतुक होईल, सोबतच नवीन जबाबदारी अंगावर पडेल. विद्यार्थ्यांना एखादा पार्ट-टाइम जॉब मिळू शकतो. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
हेही वाचा – पत्रिकेतील ग्रहदशा: समज, गैरसमज
कन्या : नवीन संकल्पना अमलात आणाल
- या आठवड्याच्या सुरुवातीलाच कामाचे नियोजन करा, म्हणजे पुढील दिवस सोपे जातील. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कितीही पटापट आणि शिस्तीत कामे केली तरी ऐनवेळी धावपळ होईल. वरिष्ठ मात्र खूश राहतील. व्यावसायिकांना नवीन संकल्पना अमलात आणता येतील. जाहिराती तसेच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळेल. दिवाळीमुळे महिलांचा घरकामात खूप वेळ जाईल. मात्र त्यांनी एखादा छंद जोपासावा. शिवाय नवीन आवडीचे काम त्या करू शकतील. विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवता येईल, त्यामुळे ते आनंदी असतील.
तुळ : चिडचिड होण्याची शक्यता
- या आठवड्यात नवीन संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी अंगावर पडेल, त्यामुळे नोकरदारांनी कामाचा कंटाळा करून चालणार नाही. नवीन आव्हाने संधी म्हणून स्वीकारा आणि ती पूर्ण करा. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. व्यावसायिकांसमोर नवीन अडचणी येतील. मात्र शांत राहून त्यावर उपाय शोधा आणि पुढे जा. जुनी येणी वसूल होतील. मात्र त्याच त्याच लोकांना नव्याने पैसे उधार देऊ नका. महिलांना घर आणि ऑफिस सांभाळताना कसरत करावी लागेल, त्यामुळे त्यांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल.
वृश्चिक : आनंदी आणि उत्साही आठवडा
- दीपावलीच्या निमित्ताने हा आठवडा खूप आनंदात आणि उत्साहात जाईल. नोकरदारांवर कामाचा फार ताण नसेल. त्यांच्याकडील सगळी कामे सुरळीत आणि वेगाने पूर्ण करू शकतील. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकाल. व्यावसायिकांना मोठे यश मिळेल. मोठे करार होतील. उलाढाल वाढून नफा वाढेल. महिलांचे आरोग्य उत्तम राहील. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना वाहन खरेदीचा योग आहे.
धनु : इतरांवर अवलंबून राहू नका
- या आठवड्यात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नोकरदार जातकांनी स्वतःची कामे स्वतः करावीत, इतरांवर अवलंबून राहू नये. तब्येतीची देखील काळजी घ्या. व्यावसायिकांनी या आठवड्यात नवीन करार करू नयेत. भागीदार किंवा इतर स्टाफवर फार अवलंबून राहू नका. स्वतः जातीने लक्ष देऊन कामे पूर्ण होतात की नाही, ते बघा. मदतनीस ऐन कामाच्या वेळी दांडी मारेल, त्यामुळे महिलांचे काम वाढवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत करा, अभ्यास करा. प्रोजेक्ट करताना ते स्वतःच करा.
मकर : नफ्यात वाढ होईल
- या आठवड्यात कामात यश मिळेल. नोकरदारांवरील कामाचा ताण वाढेल. सुट्टीच्या दिवशीसुद्धा काम करायला लागू शकते. स्वतःचे काम बाजूला ठेवून जुनियर स्टाफला शिकवण्यात जास्त वेळ आणि एनर्जी खर्च होईल. व्यावसायिकांची व्यवसायातील उलाढाल वाढेल. कामाचा व्याप वाढल्याने धावपळ होईल. नफाही वाढेल. मात्र त्यामुळे वायफळ खर्च करू नका. महिलांनी देखील खर्चावर नियंत्रण ठेवावा. कोणालाही पैसे उसने देऊ नका. विद्यार्थी जुन्या मित्रांना भेटायला जाऊ शकतील. तिथे त्यांना भेटवस्तू मिळेल.
कुंभ : कामात बदल होईल
- या आठवड्यात दगदग होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या कामात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन कामाशी जुळवून घेताना थोडी धावपळ होईल. व्यावसायिकांना हितशत्रू त्रास देतील. काही कामे परत परत करावी लागण्याची शक्यता आहे. या आठवड्यात उत्पादनांच्या जाहिरातीवर भर द्यावा लागेल. दीपावलीच्या निमित्ताने घरात ज्येष्ठ आणि लहान मंडळी जमतील. त्यामुळे महिलांसाठी आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील, त्यांचे अनुभव ऐकायला मिळतील.
हेही वाचा – आर्थिक प्रगतीसाठी वास्तुशास्त्र
मीन : आरोग्याची काळजी घ्या
- या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरदारांवर कामाचा ताण राहील. टार्गेट पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल. मात्र शांत चित्ताने काम करा, अन्यथा चुका होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची उलाढाल वाढेल. नवीन ऑर्डर मिळतील. पण ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कच्चा माल जास्त भावाने घ्यावा लागेल. कामाचे तसेच पैशांचे नियोजन देखील करावे लागेल. घरात काम आणि पाहुणे यामुळे महिलांची दगदग होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना छंदातून एखादा छोटा व्यवसाय करता येईल.
ईमेल – prajaktakathe3970@gmail.com



१ प्रतिक्रिया
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन 💐💐💐💐
आपणास आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना ही दिवाळी खूप आनंदाची, समाधानाची, समृध्दीची, भरभराटीची जावो. या मन: पूर्वक शुभेच्छा 💐💐💐