मनोज जोशी
आज मी वेबसाइटच्या ‘अवांतर’ नावामागची कथा सांगणार आहे. संत तुकाराम यांच्या ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती…’ या ओळीप्रमाणे माझं आणि ‘अवांतर’चं नातं निर्माण झालं आहे… अगदी 1997-98 ते आजतागायत! दुर्गाबाई भागवत, या थोर विदुषी आणि आदरणीय व्यक्तीबद्दल काही बोलण्याची पात्रता माझी नाही. परंतु पाप-पुण्यावर विश्वास ठेवायचा झालाच, तर माझी काहीतरी पूर्वपुण्याई होती की, ज्यामुळे माझा त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या भेटीचा योग तर एक-दोनदा नव्हे तर, अनेकदा आला! म्हणजे साधारणपणे आठवड्यातून किमान चार दिवस तरी मी त्यांना भेटायला जात असे. 1997 ते 2000 अशी सलग चार वर्षे मी त्यांना भेटत होतो.
पत्रकारितेत त्यावेळी मी तसा नवखाच होतो आणि वाचन-सामान्य ज्ञानही यथातथाच. त्यात हिंदी पत्रकारितेतून मराठी पत्रकारितेत वळलेलो. त्यामुळे दुर्गाबाईंसारख्या विद्वान व्यक्तीसमोर तोंड उघडण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त त्या जी-जी माहिती मला देत होत्या, त्या-त्या गोष्टींनी मी अवाक् मात्र होत असे.
त्यावेळी मी ‘नवशक्ति’मध्ये होतो. 1997 साली महाराष्ट्र दिनानिमित्त विशेषांक प्रसिद्ध होणार होता. त्यासाठी वरिष्ठांनी मला ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांची मुलाखत घेण्यास सांगितले. पण त्यावेळी ते बाहेरगावी असल्याने मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. तसे मी वरिष्ठांना कळविल्यावर त्यांनी मला दुर्गाबाईंची मुलाखत घेण्यास सांगितले. अर्थात, त्यावेळी मोबाइल हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. मी भीत-भीतच लॅण्डलाइनवरून दुर्गाबाईंना फोन केला आणि मुलाखतीसाठी भेटायचे आहे, असे सांगितले. त्यांनी अतिशय प्रेमाने “हो, मुलाखत देते ना, कधी येतोस?”, असं विचारलं. ठरल्याप्रमाणे मी गेलो, पण घाबरत-घाबरतच. कारण, त्यांच्या सडेतोडपणाबद्दल ऐकून होतो. पण त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यातील साधेपणा मला जाणवत होता. त्यामुळे मनावरच दडपण खूपच कमी झालं. पण मुलाखतीने मात्र माझे तोंडचं पाणी पळवलं. मुलाखतीचं हेडिंग होतं – ‘भारतीय घटनेचे खरे शिल्पकार सर एन. बी. राव’!
हेही वाचा – मूर्तीकला असो की नाणी… मोरालाच प्राधान्य
त्या दिवशी ऑफिसच्या खाली पोलीस बंदोबस्त ठेवला होता. खप फारसा नसल्याने ‘नवशक्ति’च्या त्या मुलाखतीची दखल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वगळता कोणीही घेतली नाही. त्यांनी दुर्गाबाईंना हाच प्रश्न विचारला आणि ‘बॉम्बे टाइम्स’ या पुरवणीत हाच मुद्दा मांडला होता आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले. असो.
नंतर नंतर नियमितपणे त्यांना मी भेटत होतो. सुरुवातीला फोन करून ‘आज भेटायला येऊ का?’, असे विचारत असे. आमच्यात आजी-नातवाचं नातं निर्माण झालं आणि कालांतराने फोन न करता वरचेवर घरी जाऊ लागलो. त्यांचे भाचे मोहन भागवत आणि त्यांच्या पत्नी चारूताई यांच्याशीही चांगला परिचय झाला.
आधी ‘नवशक्ति’ आणि नंतर ‘लोकसत्ता’मध्ये काम केले. त्यामुळे कायम दुपारची शिफ्ट असायची आणि त्याआधी सकाळी दुर्गाबाईंची भेट घेत असे. पण 2000मध्ये मी ‘ईटीव्ही न्यूज मराठी’मध्ये रूजू झाल्यावर ड्युट्यांमुळे माझं दुर्गाबाईंकडे जाणं कमी झालं. त्यातच नंतर माझी हैदराबादला ट्रान्सफर झाली. 7 मे 2002 रोजी दुर्गाबाईंचं देहवसान झालं; मी हैदराबादला असल्यानं त्यांच्या अंतिम दर्शनाला देखील जाऊ शकलो नाही, याची सल आहे.
हेही वाचा – राजवैभवी मोर… तख्त-ए-ताऊस
‘नवशक्ति’मध्ये त्यांनी रविवारच्या पुरवणीत लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या कॉलमचं नाव काय ठेवायचं? यावर विचार सुरू झाला. पण दुर्गाबाईंनीच नाव सुचवलं, ‘अवांतर’! हे नाव ठेवल्याने एकाच विषयाला बांधल्यासारखे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गाबाई कायम मला ‘काहीना काही तरी लिहित रहा, चार ओळी का होईना, पण रोजच्या रोज लिही,’ असं सांगत असत. त्यानंतर काही वर्षांनी मी नियमितपणे लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी ब्लॉग सुरू केला… त्याचं नाव ‘अवांतर’!
…आणि आता त्याच नावाने वेबसाइट सुरू केली आहे, ती दुर्गाबाईंना समर्पित!