अध्याय चौदावा
ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥381॥ याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें । आपणयासकट मातें । जाणावें गा ॥382॥ पार्था सोनयाची टिक । सोनयासी लागली देख । तैसें आपणपें आणिका । मानावें ना ॥383॥ तेजाचा तेजौनि निघाला । परी तेजींचि असे लागला । तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा ॥384॥ पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं । मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ॥385॥ हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु । तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि गा ॥386॥ ऐसेनि या समरसें । दृष्टि जैं उल्हासे । ते भक्ति पैं ऐसे । आम्ही म्हणों ॥387॥ आणि ज्ञानाचें चांगावें । इयेचि दृष्टि नांवें । योगाचेंही आघवें । सर्वस्व हें ॥388॥ सिंधू आणि जळधरा- । माजीं लागली अखंड धारा । तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते ॥389॥ कां कुहेसीं आकाशा । तोंडीं सांदा नाहीं तैसा । तो परमरसु तैसा । एकवटे गा ॥390॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : साहीं ऋतु येतां आकाशें, लिंपिजेचि ना जैसें
अर्थ
अशा प्रकारे मला जाणणे, ती अव्यभिचारी भक्ति असे म्हणतात. येथे (या विश्वात व माझ्यात) काही भेद पाहिला, तर तो व्यभिचार होतो. ॥381॥ या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्यासकट (आपणास माझ्यावेगळे न मानून ) मला जाणावे. ॥382॥ अर्जुना, सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसविली असते, पाहा, त्याप्रमाणे आपल्याला (माझ्याहून) वेगळे मानू नये. ॥383॥ किरण हे तेजोमय असते व तेजापासून उत्पन्न झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते, त्या किरणांसारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस. ॥384॥ पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे त्याप्रमाणे (तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी) पाहा. ॥385॥ समुद्रावरची लाट जरी लहान असली, तरी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराचे ठिकाणी दुसरा (ईश्वराहून वेगळा) खरोखर नाही. ॥386॥ बा अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टि विकसित होते त्याला आम्ही भक्ति असे म्हणतो. ॥387॥ हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे. ॥388॥ मेघ आणि समुद्र ह्यांच्यामधे जशी अखंड जलधारा लागलेली असते, अर्जुना, त्याप्रमाणे (त्या पुरुषाची) वृत्ती अखंड ब्रह्ममय असते, म्हणजे जेथून वृत्ति उत्पन्न होते, तेही ब्रह्म व वृत्तीही ब्रह्म, अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रहरूपच असते. ॥389॥ अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही (तर जसे आडातले आकाश हे महाआकाशाशी नेहेमी मिळालेलेच असते), त्याप्रमाणे अर्जुना, तो परमरसाशी (परब्रह्माशी) ऐक्याला पावतो. ॥390॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घृताचें थिजलेंपण, न मोडितां घृतचि जाण


