Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, October 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एका नदीची गोष्ट…
    फिल्मी

    एका नदीची गोष्ट…

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीOctober 4, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, एक नदीर गल्पो, मिथुन चक्रवर्ती, मिथुनदाचा अभिनय, वडील मुलीचे नाते, दरकेश्वर अनू, नदीचे नाव, दरकेश्वर अंजना, नदीचे नाव अंजना, नदीचे नामकरण, दिग्दर्शक समीर चंदा, संगीतकार नचिकेता चक्रवर्ती, छायांकन राजन कोठारी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    बंगाली चित्रपटसृष्टी ही एक निराळेच जग आहे. सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक, तपन सिन्हा, ऋतुपर्णो घोष, अपर्णा सेन, श्रीजीत मुखर्जी, बुद्धदेव दासगुप्त यासारख्या मनस्वी दिग्दर्शकांनी भारतीय सिनेसृष्टीला अगदी भरभरून दिलेले आहे. या यादीत अजून एक नाव जोडायचे आहे मला. दिग्दर्शक म्हणून त्यांचा एकच चित्रपट आला, तोही बंगाली भाषेत. पण एक कला दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडबरोबरच तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतरही भाषांमधून त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. ते म्हणजे श्रीयुत समीर चंदा! त्यांनी बॉलीवूडमधील अनेक भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांचे सेट डिझाइन केलेले आहेत, ज्यासाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेला आहे. रंग दे बसंती (2006), ओमकारा (2006), गुरू (2007), दिल से… (1998), क्रिश (2006), रावण (2010) याचबरोबर इरुवर, झुबेदा, अक्स, दशावतारम, गझिनी, दिल्ली -6 असे अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शक म्हणून काम केलेला हा अवलिया. पण हा लेख त्यांच्याविषयीचा नाहीये. तो आहे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकमेव चित्रपटावर…

    त्यांनी दिग्दर्शक म्हणून केलेला एकमेव चित्रपट ‘एक नदीर गल्पो’ अर्थात ‘एका नदीची गोष्ट’. माझं या चित्रपटाकडे लक्ष जाण्याचं कारण अर्थातच मिथुनदा होतं… आणि इथेही मिथुनदा निराश करत नाहीत. रादर या माणसाचे एक सर्वस्वी भिन्न, संवेदनशील, गंभीर रूप या चित्रपटात पाहायला मिळते.

    बंगाली चित्रपटसृष्टीत असे बरेच चित्रपट आहेत की, ज्यांचा फारसा गाजावाजा झालेला नाहीये, मोठे व्यावसायिक यश मिळालेले नाहीये, पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतून बसलेले आहेत. मिथुन चक्रवर्ती अभिनीत ‘एक नदीर गल्पो’ हा त्यापैकीच एक अफाट चित्रपट आहे.

    हा चित्रपट पाहताना आपला त्रयस्थपणा कधी गळून पडतो हे समजताच नाही. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी आपणही त्या असहाय तरीही जिद्दीला पेटलेल्या बापाच्या मनातल्या अथांग दुःखाच्या प्रवासात सहभागी होतो. नाव जरी ‘एका नदीची कथा’ असले तरी हा चित्रपट म्हणजे (निव्वळ) नदीची कथा नाही, ती केवळ एका गावाचीही कथा नाही, तो एका बापाच्या आपल्या लेकीबद्दलच्या स्मृतींचा कोलाज आहे, तिच्या विरहाच्या स्मृतींची कथा आहे. अशा स्मृतींची, ज्या काळालाही पुसून टाकता येत नाहीत. रादर काळालाही त्या स्मृती पुसून टाकता येऊ नये म्हणून एका बापाने केलेली धडपड, त्याचा अट्टाहास हेच या चित्रपटाचे मूळ बीज आहे.

    प्रसिद्ध कला-दिग्दर्शक समीर चंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांच्या कथासृष्टीतून जन्माला आला. समीर चंदा यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत कला-दिग्दर्शक म्हणून आदराने घेतले जाते. अनेक उत्कृष्ट हिंदी चित्रपटांच्या दृश्यरचनेमागे त्यांची प्रतिभा होती. मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला हा एकमेव चित्रपट ठरला. त्यामुळे या चित्रपटाकडे पाहताना एखाद्या अनुभवी चित्रकाराने आपल्या आयुष्यातील सर्व संवेदना एकाच कॅनव्हासवर ओतल्याची भावना निर्माण होते.

    हेही वाचा – ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    चित्रपटाची कथा वरवर पाहता अत्यंत साधी आहे. दरकेश्वर नावाचा एक पोस्टमास्तर. छोटंसं गाव. त्याचं सर्वसाधारण माणसाप्रमाणे चाललेलं साधं आयुष्य, आणि त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असलेली त्याची लाडकी मुलगी अनू. वडील आणि मुलगी यांच्यातील नातं चित्रपटात ज्या सहजतेने उभं राहातं, ते पाहताना आपल्याला अभिनय पाहात असल्याची जाणीवही होत नाही. अनूसाठी तिचे वडील म्हणजे संपूर्ण विश्व असतात. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत दरकेश्वर असतो आणि दरकेश्वरच्या प्रत्येक श्वासात अनू. पण आयुष्याला अशा नात्यांची फारशी पर्वा नसते. एका दुर्दैवी अपघातात अनू कलघाई नदीत बुडून मृत्यू पावते.

    या एका प्रसंगानंतर चित्रपटाचा स्वरच बदलून जातो. आतापर्यंत पडद्यावर दिसणारे सगळे रंग जणू फिके पडायला लागतात. कानावर येणारे आवाज कमी होत जातात. संवाद कमी होतात. आणि लेक गमावलेल्या एका वडिलांच्या मनातली भयंकर पोकळी पडद्यावर आकार घेऊ लागते.

    मुलीच्या मृत्यूनंतर दरकेश्वर एकच ध्यास घेतो. ज्या नदीने त्याची मुलगी हिरावून घेतली, त्या नदीचे नाव बदलून आपल्या लेकीच्या स्मृतीत ‘अंजना’ ठेवावे, अशी त्याची मागणी असते. सामान्य माणसाला ही मागणी विचित्र वाटू शकते. नदीचे नाव बदलून काय होणार? पण चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसे लक्षात येते की, दरकेश्वर नदीचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये. तो विस्मृतीविरुद्ध लढतोय. त्याला भीती आहे की,, एक दिवस लोक त्याच्या मुलीला विसरतील… नदी मात्र कायम वाहत राहील.

    म्हणून तो नदीलाच मुलीचे नाव देऊ इच्छितो. जेणेकरून प्रत्येक वेळी, जेव्हा-जेव्हा, त्या नदीचे नाव घेतले जाईल, तेव्हा त्याच्या मुलीची आठवणही जागवली जाईल, जिवंत राहील.

    या संपूर्ण चित्रपटाचा आत्मा मिथुनदांच्या अभिनयात सामावलेला आहे. हे सगळं कथानक त्यांनी एकहाती पेललेलं आहे. मिथुनबद्दल बोलताना बहुतेक लोकांच्या डोळ्यांसमोर डिस्को डान्सर, कराटे खेळणारा एक (भौतिकशास्त्राला गुंडाळून खुंटीवर टांगणारा) फायटर हीरो किंवा लोकप्रिय स्टार उभा राहतो. पण बंगाली चित्रपटांनी वेळोवेळी त्यांच्या आतल्या विलक्षण अभिनेत्याला बाहेर आणले आहे. मृगया, ताहादेर कथा, स्वामी विवेकानंद, नोबेल चोर, त्रयी (त्रोयी), आमी सुभाष बोलची यासारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला तो संवेदनशील अभिनेता एक नदीर गल्पोमध्ये आपल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला दिसतो.

    दरकेश्वर हे पात्र अत्यंत अवघड आहे. कारण त्याच्या तोंडी फार मोठे संवाद नाहीत… ते मिथुनदांच्या इतर नायकासारखे शत्रूशी लढत नाही. ते प्रेक्षकांची सहानुभूती मागत नाही. हे असे पात्र आहे की, जे फक्त आपले दुःख जगत राहते आणि कसलाही मेलोड्रामा न करता! कुठेही भडकपणा येऊ न देता दुःखाचा पट निव्वळ अभिनयातून उभा करणे अभिनयकलेतील सर्वात कठीण गोष्ट मानली जाते.

    मिथुनदांनी दरकेश्वरच्या भूमिकेत जे साध्य केले आहे, ते विलक्षण आहे. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेली पोकळी पाहताना, तिचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. दरकेश्वराच्या डोळ्यांत सतत एक शोध सुरू आहे. जणू गर्दीतही ते आपल्या मुलीला शोधत आहेत. अनेक दृश्यांमध्ये ते शांत बसलेले असतात, काही बोलत नाहीत, पण त्या शांततेतले, त्या मौनातले हजारो शब्द आपल्याही नकळत आपल्या मनावर, संवेदनावर चाल करून येतात तेव्हा भावना सुन्न होतात.

    मिथुनदांचा या भूमिकेतील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांच्या डोळ्यांत जाणवत राहणारं ते तुटलेपण आणि विशेषतः, अभिनयात दाखवलेला संयम… अनेक कलाकार अशा प्रसंगांमध्ये मोठमोठ्याने रडतात, आक्रोश करतात, भावना उघडपणे व्यक्त करताना दिसतात. मिथुनदाने मात्र उलट मार्ग निवडलाय यात. दरकेश्वराचे दुःख आतल्या आत जळत राहते, मनाला जाळत राहते. त्याचे दुःख सहसा व्यक्त होत नाही, पण तरीही प्रत्येक क्षणी अगदी प्रकर्षाने जाणवत राहते. म्हणूनच तुमच्या – माझ्यासारखा प्रेक्षक त्यांच्या वेदनेशी जोडला जातो.

    एका प्रसंगात दरकेश्वर सरकारी कार्यालयांच्या उंबरठ्यावर भटकताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि निराशा यांच्यात सतत होणारा संघर्ष मिथुन यांनी इतक्या सूक्ष्मतेने दाखवला आहे की, त्या क्षणी अभिनय आणि वास्तव यांच्यातील सीमारेषाच मिटून जाते.

    दरकेश्वर हळूहळू एका सामान्य माणसापासून प्रतीकात रूपांतरित होतो. तो त्या प्रत्येक आई – वडिलांचा प्रतिनिधी बनतो, ज्यांनी आपले मूल गमावले आहे… तो त्या प्रत्येक माणसाचा प्रतिनिधी बनतो, ज्याने आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट गमावली आहे… आणि म्हणूनच त्याचा संघर्ष वैयक्तिक राहत नाही, तो सार्वत्रिक बनून जातो.

    चित्रपटातील नदी हे देखील एक महत्त्वाचे पात्र आहे. ती केवळ एक भौगोलिक वास्तव नाही… ती काळाचे प्रतीक आहे, जीवनाचे प्रतीक आहे,, मृत्यूचे प्रतीक आहे. ती सतत वाहते. तिचा प्रवाह कधी थांबत नाही. माणसं येतात, जातात, मरतात, विसरली जातात. पण नदी वाहत राहते.

    याच कारणामुळे दरकेश्वरचा संघर्ष अधिक हृदयद्रावक वाटतो. तो प्रत्यक्षात नदीशी लढत नाहीये, तो शासनाशी, यंत्रणेशी देखील लढत नाहीये.तो काळाशी लढत असतो… तो स्वतःच्या विस्मृतीशी, रादर विस्मृतीच्या भीतीशी लढत असतो. नियतीशी लढत असतो!

    चित्रपटाचे छायांकन राजन कोठारी यांचे आहे. याचे छायांकन हे या चित्रपटाच्या सर्वांत प्रभावी आणि लक्षात राहणाऱ्या पैलूंपैकी एक आहे. कॅमेऱ्याने केवळ कथा टिपलेली नाही, तर तो स्वतः एक स्वतंत्र कथाकथनकार बनून प्रेक्षकांना त्या जगात घेऊन जातो. ग्रामीण बंगालचे विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लँडस्केप, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, संथपणे वाहणारी नदी, तिचे अथांग पात्र, चिखलाने भरलेले ओले रस्ते, पावसाने भिजलेली काळी माती, धुक्याच्या पांढऱ्या चादरीत हरवून गेलेल्या सकाळी आणि हळूहळू काळोखात विरघळणाऱ्या उदास संध्याकाळी यांचे चित्रण इतके जिवंत आणि संवेदनशील आहे की, प्रेक्षक केवळ ते पाहत नाही, तर ते अनुभवू लागतो.

    विशेष म्हणजे, निसर्ग येथे केवळ पार्श्वभूमी म्हणून उभा राहत नाही. नदी, पाऊस, वारा, धुके आणि मोकळे आकाश हे सर्व कथानकातील पात्रांइतकेच महत्त्वाचे घटक बनतात. नदीच्या पाण्यात उमटणारी पात्रांची प्रतिबिंबे, शांत पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या, पावसाच्या सरींनी निर्माण होणारी विषण्णता आणि मावळत्या सूर्याच्या प्रकाशात दिसणारी एकाकीपणाची भावना… या सगळ्या गोष्टी पात्रांच्या अंतर्मनातील भावनांचे प्रतीक बनून पडद्यावर उलगडतात. अनेक दृश्ये अशी आहेत की, ती एखाद्या संवेदनशील चित्रकाराच्या कॅनव्हासवरून थेट पडद्यावर उतरल्यासारखी वाटतात. प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्य आहे, पण ते केवळ डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य नाही; त्या सौंदर्यामध्ये जीवनाची वेदना, काळाची झीज आणि मानवी भावनांची सूक्ष्म स्पंदने दडलेली आहेत.

    नचिकेता चक्रवर्ती यांचे संगीतही चित्रपटाच्या या काव्यात्म भावविश्वात अत्यंत सहजपणे आणि सुसंवादीपणे मिसळते. हे संगीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा किंवा दृश्यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ते कथानकाच्या श्वासात मिसळून जाते. ज्या क्षणी पात्रांच्या मनात न सांगितलेल्या भावना उसळत असतात, ज्या वेळी त्यांच्या नजरेतून शब्दांपेक्षा अधिक काही व्यक्त होत असते, त्यावेळी नचिकेतांच्या सुरावटी त्या भावनांना एक अतिरिक्त खोली आणि अर्थ प्रदान करतात.

    हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!

    संगीतातील साधेपणा हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. काही सुरेल धून, विरळ वाद्यसंगत आणि प्रसंगानुरूप येणाऱ्या स्वरांची हळवी साथ यामुळे चित्रपटातील भावनिक क्षण अधिक प्रभावी बनतात. कधी ते विरहाची जाणीव अधिक तीव्र करते, कधी आशेचा एखादा मंद किरण उजळवते, तर कधी पात्रांच्या मनातील एकाकीपणा आणि असुरक्षितता अधिक ठळकपणे जाणवून देते. त्यामुळे संगीत आणि छायांकन यांचा सुंदर मेळ साधला जातो आणि चित्रपटाला एक विलक्षण काव्यात्मक, हृदयस्पर्शी आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा अनुभव प्राप्त होतो.

    या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळाले. समीक्षकांनी त्याच्या दृश्यभाषेचे, कथनशैलीचे आणि विशेषतः मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. व्यावसायिकदृष्ट्या मात्र चित्रपटाला मोठे यश मिळाले नाही. त्याचे एक कारण त्याचा संथ, चिंतनशील स्वभाव होते. माझ्या मते हा चित्रपट मनोरंजनासाठी नाही; तो अनुभवण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.

    आज ‘एक नदीर गल्पो’कडे मागे वळून पाहताना जाणवते की, हा चित्रपट केवळ एका वडिलांच्या दुःखाची कथा नाही. तो एका पित्याच्या चिरंतन प्रेमाची कथा आहे. स्मृतीची कथा आहे… आणि माणूस आपल्या प्रिय व्यक्तींना विस्मृतीपासून वाचवण्यासाठी कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो, याची ही कथा आहे.

    माझ्या मते मिथुनदांनी साकारलेला दरकेश्वर ही केवळ त्यांच्या कारकिर्दीतील एक उत्कृष्ट भूमिका, श्रेष्ठ अभिनयच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक वेदनादायी आणि मानवी वाटणाऱ्या व्यक्तिरेखांपैकी एक आहे. चित्रपट संपल्यानंतरही त्याचे दुःख, त्याची नदी आणि त्याची मुलगी प्रेक्षकाच्या मनात बराच काळ जिवंत राहतात आणि कदाचित हाच कोणत्याही महान कलाकृतीचा खरा विजय असतो.

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026 फिल्मी

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026 फिल्मी

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    By विशाल कुलकर्णीSeptember 20, 2026

    अकरावी-बारावीत असताना स्व. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा ‘रंग और नूर की बारात किसे…

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 04 ते 10 ऑक्टोबर 2026

    October 4, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट

    October 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 458
    • अवांतर 215
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 613
    • फिल्मी 70
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 970
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.