नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
हनी ट्रॅप (Honey trap)… जरा वेगळा आणि चर्चेसाठी तसा धाडसी विषय. काही बोल्ड किंवा कडक शब्द वापरले गेले, तर आज मला माफ करा.
मी एक मराठी सीरियल करत होते. पाच-सहा तरुण मुली होत्या, त्या सीरियलमध्ये. तिथे जो सगळ्यात मोठा जबाबदार माणूस होता, खूप उत्कृष्ट काम करणारा ‘एक्स’ म्हणूयात त्याला. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे सगळ्या मुली सेटवर आल्या की, ‘दादा’ म्हणून त्याला मिठी मारायच्या. तोही तेवढ्याच प्रेमाने त्या मुलींना ‘Good morning’ म्हणायचा. नवीनच लग्न झालं होतं त्याचं. नेमकं काही काळासाठी आमचं नाइट शूट लावावं लागत होतं. प्रत्येक जण आपापल्या कामात असायचे. हा ‘एक्स’ त्याचं काम उरकून एका कोपऱ्यात सगळ्यांपासून लांब फोनवर रंगलेला असायचा. आम्ही त्याला चिडवत असू. तोही हसून प्रत्युत्तर द्यायचा.
दिवस छान चालले होते. एक दिवस अचानक त्याचा मला फोन आला. “माई, मला जरा 25 हजार रुपये द्याल का? दोन-तीन महिन्यांत परत करेन.” मी म्हटलं, “छे रे. एवढी मोठी रक्कम नाही जमणार. दोन-तीन हजार असते तर विचार केला असता.” तो “ठीकाय,” म्हणाला आणि विषय तिथेच संपला. पण तो ‘एक्स’ मात्र दिवसेंदिवस दडपणाखाली वावरत होता. मला कारण कळत नव्हतं, पण त्याचं वाईट वाटत होतं.
हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!
एकदा अचानक त्याने आत्महत्येचा वगैरे प्रयत्न केला… अशा गोष्टी कानावर आल्या आणि तेव्हाच हनी ट्रॅपबद्दलची माहिती कानावर यायला लागला. अशा प्रकरणात बऱ्याच तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या आणि आता या ‘एक्स’बद्दल कानावर आलं. मुलगा वाचला. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला बिचारा. कसा आणि काय? अडकला खरा. त्यातून सुटण्यासाठी त्याच्याकडे 80 हजार रुपयांची मागणी केली गेली. ओह, म्हणजे त्यासाठी त्याने माझ्याकडे 25 हजार रुपये मागितले होते आणि मी त्याची मदत नाही करू शकले. त्याने 80 हजार रुपये जमा करून त्या लोकांना दिले आणि स्वतःची सुटका करून घेतली.
हेही वाचा – बाजूने बर्फाच्या लाद्या गेल्यासारखा थंडावा जाणवला!
नवीन लग्न झालं होतं आणि आमच्याकडे नाइट शूट सुरू होते, तेव्हा तो जे फोनवर बोलायचा ते स्वतःच्या बायकोशी नसून तो हनी ट्रॅप होता. एक दिवस कोणालाही कळलंच नाही की, फोनवर बोलता बोलता तो त्याच्या रूममध्ये निघून गेला होता. तिथेच सगळा घोळ झाला. त्याच्या फोनवर असलेल्या मुलीने त्याला कपडे काढायला लावले. त्या अवस्थेमधले फोटो आणि व्हिडीओ काढले आणि तो ट्रॅपमध्ये अडकला. पैशांची मागणी झाली. फोटो आणि व्हिडीओ बायकोला दाखवू, सोशल मीडियावर पोस्ट करू अशा धमक्या द्यायला सुरुवात झाली. 80 हजारांत सुटका झाली त्याची. पण बिचारा खूप खालावला.
मग मेकअप रूममध्ये मी हळूच विषय काढला की, “या ‘एक्स’ने असे का केलं असेल?” मी विषय काढला आणि प्रत्येकजण बोलायला लागला. आश्चर्य म्हणजे, प्रत्येकाला काय घडलंय ते सविस्तर माहीत होती, पण कोणीही कधीही या विषयावर चर्चा केली नाही. गॉसिप केलं नाही. खरंतर, आमच्या टीमचं कौतुक वाटलं मला.
आम्ही त्याच्या बायकोशी बोललो. त्याच्याशी बोललो, समजावलं. त्याला त्या मॅटरमधून बाहेर काढलं. आज तो त्याचं काम, कुटुंब सगळं व्यवस्थित सुरू आहे. एक गंमत म्हणजे, एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर सुद्धा सेटवरच्या मुली शूटला आल्यावर नेहमीप्रमाणेच त्या ‘एक्स’ला मिठी मारून ‘Good morning दादा’ म्हणतच होत्या.


