दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 10 जुलै 2025, वार : गुरुवार
भारतीय सौर : 19 आषाढ शके 1947, तिथि : पौर्णिमा 26:06, नक्षत्र : पूर्वाषाढा 29:55
योग : एद्रा 21:37, करण : विष्टी 13:55
सूर्य : मिथुन, चंद्र : धनु, सूर्योदय : 06:07, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
गुरू पौर्णिमा; व्यास पूजन; संन्यासी जन चातुर्मास आरंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – सर्जनशीलता आणि उत्साह यामुळे स्थिती अनुकूल होईल. निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या वृत्तीमुळे यशप्राप्ती होईल, फक्त संयम बाळगा. अचानक पैसा आल्याने प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील.
वृषभ – आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल; मात्र उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. अवाजवी खर्च पाहून आई-वडील चिंतीत होतील आणि त्यामुळे रागाचे शिकार ही व्हावे लागू शकते. भविष्यासाठी चांगले प्लॅन बनवू शकता.
मिथुन – वाईट सवयीमुळे बिकट प्रसंग ओढवू शकतो. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. अफवा आणि निरर्थक चर्चा यापासून दूर राहा. व्यवहाराशी निगडीत एखाद्या मुद्यावर जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क – क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झालात तर, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्या आणि कामात उत्साह तसेच शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर, फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींना वेळ देण्याची गरज असल्याचे जाणवेल.
सिंह – अलिकडे घडलेल्या घटनांमुळे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे शारीरिक आणि अध्यात्मिक फायदा होईल. आर्थिक गुंतवणूक चांगला परतावा कसा मिळवून देतील, याचा विचार कष्टाचे पैसे गुंतवताना करा. विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर भागीदाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
कन्या – चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मनाची तयारी राहील. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी सारासार विचार करूनच निर्णय घ्या. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना होणार नाही, याकडे लक्ष द्या. मागील काळात अपूर्ण सोडलेले काम आज पूर्ण करावे लागेल.
हेही वाचा – शाळेचा पहिला दिवस
तुळ – अनावश्यक तणाव आणि चिंता यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. प्रभावी तसेच महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, ही चांगली संधी ठरेल.
वृश्चिक – गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होत असले तरी आजचा दिवस मात्र चांगला आहे. अडचणींचा बाऊ करण्याची सवय सोडा, अन्यथा त्याचा फटका बसू शकतो. आज चांगल्यापैकी धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
धनु – संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. बाहेरील कामकाज दमछाक करणारे तसेच ताणतणावाचे असेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून अर्थप्राप्ती होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांकडून महत्त्वाची आमंत्रणे मिळतील.
मकर – विचार न करता कुणालाही अर्थसहाय्य करू नका. येत्या काळात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जुन्या मित्रांशी भेटीगाठी होऊ शकतात. मनातील प्रश्न बाजूला सारा आणि कुटुंब तसेच मित्रमंडळींशी सुसंवाद वाढविण्यावर भर द्या.
कुंभ – दिवस अत्यंत व्यग्र राहील. सहजपणे भांडवल उभे कराल, उधारी परत मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती उल्लेखनीय ठरेल. मात्र, उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.
मीन – तात्पुरत्या गोष्टींच्या मागे धावू नका, सत्य परिस्थितीचा विचार करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते फायद्याचे असेल. काही असंतुष्ट सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, तर काम सहजपणे होऊ शकेल. आई -वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
हेही वाचा – आमच्या मराठी शाळा
दिनविशेष
साहित्यिक जी. ए. कुलकर्णी
टीम अवांतर
माणसा माणसांमधील भावबंधाचे आणि त्यांना अगतिक, नगण्य बनवणाऱ्या नियतीच्या असीम शक्तीचे दर्शन ज्यांच्या कथांमधून वारंवार होते, अशा प्रसिद्ध कथाकार जी.ए. कुलकर्णी यांचा आज जन्मदिवस. 10 जुलै 1923 रोजी बेळगाव येथे त्यांचा जन्म झाला. पुढे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते धारवाडला अनेक वर्षे होते. 1959 साली त्यांचा ‘निळासावळा’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘काजळमाया’, ‘रमलखुणा’, ‘सांजशकुन’, ‘पिंगळावेळ’, ‘कुसुमगुंजा’, ‘आकाशफुले’, ‘सोनपावले’ हे कथासंग्रह वाचकप्रिय झाले. त्यापैकी ‘निळासावळा’ आणि ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. तर 1973 साली मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून साहित्य अकादमीकडून ‘काजळमाया’ या संग्रहाला पुरस्कार मिळाला. कथालेखन हा साहित्यप्रकार त्यांना कायम आव्हान देणारा वाटत राहिला. मानवी आयुष्यात जन्म-मृत्यू, नियतीचे सामर्थ्य, मानवाची जीवनेच्छा आणि या सर्वांमधून सतत जाणवणारे जीविताचे गूढ यांचे भेदक विश्लेषण जीएंच्या कथांमध्ये दिसते. 1945नंतर मराठी नवकथेने एक नवे वळण घेतले, असे अभ्यासक मानतात. त्याचा विकसित टप्पा म्हणजे जीएंच्या कथा असं म्हणता येईल. त्यांचा पत्रप्रपंचही अफाट होता. प्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे आणि जीए यांच्यात झालेल्या पत्रलेखनाचे दोन खंडही प्रसिद्ध झाले असून त्याचेही साहित्यविश्वात मोलाचे योगदान आहे. अशा या मनस्वी कथाकाराचे 11 डिसेंबर 1987 रोजी निधन झाले.