अध्याय तेरावा
हाती हाला फुलीं । पासवणा जेवीं न घाली । तैसा नोहोटे दुर्वाक्यशेलीं । सेलिला सांता ॥496॥ क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं । कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ॥497॥ तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतींही ॥498॥ पैं स्थैर्य ऐशी भाष । बोलिजे जे सविशेष । ते हे दशा गा देख । देखणेया ॥499॥ हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे । तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥500॥ आणि इसाळु जैसा घरा । कां दंदिया हातयरा । न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥501॥ एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका । मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥502॥ अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी । नेदी उभें ठाकों द्वारीं । इंद्रियांचां ॥503॥ म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल । तरि जीवा टेंकैल । म्हणोनि बिहे ॥504॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : विकल्प जेणें जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे
अर्थ
हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही ॥496॥ क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही ॥497॥ त्याप्रमाणे शोकमोहादि ऊर्मींच्या लाटा आल्या-गेल्या तरी त्याच्या चित्तस्थिरतेमध्ये गडबड उडत नाही. फार काय सांगावे! कल्पान्तसमय जरी आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो. ॥498॥ हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते, ती हीच अवस्था होय असे समज. ॥499॥ हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे. ॥500॥ आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा (आपले धन असलेल्या) घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही, अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही ॥501॥ एकुलत्या एका मुलाला जशी आई कधी विसंबत नाही; अथवा जशी मधमाशी मधाविषयी लोभी असते ॥502॥ अर्जुना, याप्रमाणे जो आपल्या अंत:करणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंत:करणाला उभे राहू देत नाही ॥503॥ तो म्हणतो की, माझे अंत:करण जर इंद्रियांच्या द्वारात गेल्याचे, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले, तर तो कामरूपी बागुलबोवा त्या अंत:करणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाक्यातून सुटणे कठीण! तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीण, ही अंत:करणाला इंद्रियांच्या स्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील. मग जीवावरच येऊन बेतेल, म्हणून तो पुरुष भितो. ॥504॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे


