अध्याय तेरावा
वत्सावरूनि धेनूचें । स्नेह राना न वचे । नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥486॥ कां लोभिया दूर जाये । परि जीव ठेवाचि ठाये । तैसा देहो चाळितां नव्हे । चळु चित्ता ॥487॥ जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवे । भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा ॥488॥ पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाहीं जेवीं तरुवरां । येणें जाणें ॥489॥ तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं । भूतोर्मी एकी । चळिजेना ॥490॥ वाहुटळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रवउमाळें । न लोटे जो ॥491॥ दैन्यदुःखीं न तपे । भवशोकीं न कंपे । देहमृत्यु न वासिपे । पातलेनि ॥492॥ आर्तिआशापडिभरें । वयव्याधीगजरें । उजू असतां पाठिमोरें । नव्हे चित्त ॥493॥ निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी । परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची ॥494॥ आकाश हें वोसरो । पृथ्वी वरि विरो । परी नेणे मोहरों । हृदयवृत्ती ॥495॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी
अर्थ
गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही, सती जाणार्या स्त्रीचे भोग (म्हणजे वस्रालंकारादि उपचार) ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगांकडे येत नाही. ॥486॥ अथवा लोभी पुरुष दूर जातो, परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी रहातो. त्याप्रमाणे त्या स्थिरचित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला, तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते. ॥487॥ इकडून तिकडे फिरणार्या मेघांबरोबर जसे आकाश धावत नाही, अथवा गति असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही, ॥488॥ अर्जुना, वाटसरूंच्या येण्या-जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणेयेणे नाही, ॥489॥ त्याप्रमाणे चलनवलन करणार्या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणार्या क्षुधादि सहा ऊर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही. ॥490॥ वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हालत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही. ॥491॥ दारिद्र्यापासून होणार्या त्रासामुळे दु:खी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यु आला असता भयाने याची गाळण उडत नाही. ॥492॥ कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांच्या भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते, ते पुन्हा बहिर्मुख होत नाही. ॥493॥ निंदा व अपमान यांचे तडाखे बसले, अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले, तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही. ॥494॥ आकाश नाहीसे होवो, शिवाय पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते. ॥495॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : विकल्प जेणें जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे


