आठ-दहा दिवसांपासून लेकाची आणि सुनेची होणारी चिडचिड बघत होते. दोघेही चांगल्या कंपनीत कामाला होते. चांगल्या पोस्टमुळे चांगला पगार, पण त्याबरोबरच येणारा कामाचा ताण, यामुळे त्यांची चिडचिड ही नेहमीचीच झाली होती. प्रोजेक्ट्स, डेडलाइन्स, टीमवर्क आणि इतर अनेक गोष्टी, या दोघांमुळे आम्हाला पण रोजच्याच झाल्या होत्या. पण तरी यावेळेस मात्र ते जरा जास्तच जाणवत होते…
आज सकाळी तर त्या चिडचिडीचा कडेलोट झाला, असे म्हणायला हरकत नाही. ‘आता जॉबच सोडणार’ यावर बोलणे सुरू होते दोघांचे. झाले! आता हा काय पर्याय आहे का? तरी पण दोघांचे ऐकून घेतले. सुनेच्या कामाच्या ठिकाणी नवी टीम आलेली असल्यामुळे त्या टीमला शिकवता-शिकवता वेळ जातो… आणि परिणामी कामं बाजूला रहातात, असे म्हणत होती. तर, मुलगा म्हणाला, आमची टीम मस्त तयार झालेली आहे, छान आमचे ट्युनिंग जमले आहे; पण त्यामुळे कामाचा जास्त ताण आमच्यावर टाकला जातो आणि सगळेच जण एकमेकांवर चिडचिड करत रहातात. एकूण काय तर, टीम तयार करताना पण चिडचिड आणि छान टीम तयार झाली म्हणून पण चिडचिड!
एकूण सगळी परिस्थिती बघता लक्षात आले की, विसाव्यासाठी वेळ हवा होता, बाकी काही नाही! पण आता हे समजावून सांगणे आले. मग काय विचारता… ‘चलो’ म्हणून आम्ही दोघं नवरा-बायको मुलांबरोबर बोलू लागलो…
हेही वाचा – दान… गरज फक्त सत्पात्राची!
“का रे परवा पालखीला तुम्ही गेला होता ना? किती वेळ पालखीबरोबर चालत होता? पूर्ण दिवेघाट एका दमात पार केला ना?”
मुलगा- “काही तरी काय ग आई, पालखी तर किती ठिकाणी थांबत होती. त्यामुळे आम्ही पण सगळे थांबत थांबत चालत होतो.”
सुन – “हो ना आई, पण त्यामुळे खरं सांगू का जरा बरे वाटत होते. आम्ही तर रोज व्यायाम म्हणून का होईना, पण इतके चालत असतो. पण ते चालणे जरा वेगळेच होते. त्यामुळे ते थांबणे बरे वाटत होतं.”
“मग प्रत्येक वेळेस थांबल्यावर काय करत होता तुम्ही?”
“काय करणार मागे किती जण आहे? पुढे किती जण आहेत? अजून किती चालायचे आहे? हे बघत होतो. त्याच बरोबर थोडे शांत बसत होते. जेणे करून परत चालायला एनर्जी मिळेल.”
“अगदी बरोबर पण मागे-पुढे बघून काय करत होता तुम्ही? तुम्हाला तर पुढे जायचे होते ना?”
“ते बरोबर आहे, पण आमच्याबरोबर असलेले लोक कुठे आहेत ते समजण्यासाठी मागे पुढे बघायचे…”
“जर कोणी मागे असेल तर काय करत होता?”
“ते येईपर्यंत थांबत होतो. आम्ही एकत्र गेलो होतो ना?”
“अगदी बरोबर. विसाव्याला शांत बसल्यावर नंतर कसे वाटत होते?”
“काय हे विचारता लहान मुलासारखे. छानच वाटत होते. पुढे जाण्यासाठी उत्साहच येत होता.”
“म्हणून तर तुम्ही दिवेघाट पार करून आले… हो ना?”
“ते तर आहेच. आमच्यापैकी काहीजण तर विसाव्याला थांबत नव्हते, पुढे जायचे म्हणायचे… थांबले की मग चालायला जमणार नाही. मग काय घाट सुरू होण्यापूर्वीच ते दमले आणि परत पण आले.”
“चला म्हणजे थोडे थांबण्याचे महत्त्व तुम्हाला समजले तर. मोठा घाट पार करायचा असेल तर असे छोटे- छोटे विसाव्याचे क्षण घेतले पाहिजे. हो ना?”
“ते तर आहेच, पण त्याचा आमच्या कामाबरोबर काय संबंध?”
“बघा तुम्ही सगळे जण रोज नुसते चालत आहात, हा प्रोजेक्ट, मग तो प्रोजेक्ट… ही मीटिंग झाली की, ती मीटिंग… मग काय थांबला की, पुढे चालायला जमणार नाही, असे म्हणणा-या तुमच्या मित्रांसारखे तुमचे झाले आहे. मग काय घाट सुरू होण्यापूर्वीच तुमची परतवारी झाली ना सुरू. काय बरोबर ना?”
“अगं पण थांबायला वेळच नाही आम्हाला. वेळ महत्त्वाची!”
“थांबायचे म्हणजे मुक्काम नाही रे करायचा! पण क्षणभर विसावा सगळ्यांना हवा असतो… त्यावेळी मागे-पुढे बघता येते आणि तुम्ही म्हणता तसे पुढे किती जायचे, ते पण समजते.”
“म्हणजे तुम्ही म्हणता तसे की, आम्ही ऑफिसमध्ये विश्रांती घ्यायची?”
“नक्कीच, प्रत्येकाची विसाव्याची पद्धत वेगळी असेल पण विसावा महत्वाचा.”
“आता एवढे सांगितले तर, काय करणार त्यावेळेत ते पण सांग…”
“बघा अगदी साधे-सोपे म्हणजे
- निसर्गात फेरफटका मारणे किंवा काही वेळ मोबाईलपासून दूर राहणे.
- आवडते संगीत ऐकणे, वाचन करणे किंवा एखादा छंद जोपासणे.
- एकावेळी एकच काम करण्याचा प्रयत्न करणे; सततची घाई कमी करणे.
“बापरे, हे कामाच्या ठिकाणी करायचे म्हणजे झालेच काम!”
“अरे, प्रत्येक गोष्ट कामाच्या ठिकाणीच करायला पाहिजे असे नाही. काही गोष्टी तर तुम्ही घरी पण करूच शकता! जसे की वेळेत झोपणे, वेळेत उठणे, व्यायाम, आहार या गोष्टी वेळेत झाल्या तरी, आपला दिवस व्यवस्थित जातो. प्रत्येक गोष्ट मीच करणार, हा अट्टाहास सोडला तरी, अनेक गोष्टी सोप्या होतात रे! टीम चांगली आहे, तुम्हीच तयार केलेली आहे, तर सोपवा ना कामे त्यांच्यावर किती दिवस तुम्ही त्यांना मदत करणार? आणि सर्वांत महत्त्वाचे ते तरी कधी जबाबदारी घ्यायला शिकणार?”
“हे अगदी खरं… पण नंतर कामाला उशीर झाला, तर त्याचा ताण येतोच ना?”
“अरे, पण तुम्ही अनुभवी आहात ना? मग अशा गोष्टींचे तुम्हाला का टेन्शन येते?”
“तरी पण…”
“ऑफिसमधील काम असो वा आपले आयुष्य आयुष्यात सुख-दुःख दोन्ही येतात; ते जीवनाचा भाग आहेत. झालेल्या चुका किंवा दुःखांबद्दल सतत खंत करत बसण्यात अर्थ नाही. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळेस मनात कटुता न ठेवता क्षमा, समाधान आणि सकारात्मकता जपायची… आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवीन सुरुवातीसाठी मन मोकळे ठेवायचे.”
“किती छान सांगितले तुम्ही दोघांनी. परवाच अगदी हेच सांगितले कंपनीत झालेल्या एका वर्कशॅापमध्ये स्वीकार करा, क्षमा करा, लक्ष केंद्रीत करा, स्वत:ला वेळ द्या, यामुळे मिळालेली शिकण्याची संधी बघा, सकारात्मक रहा.”
हेही वाचा – लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी
“अरे, हे सगळे पूर्वीपासून चालत आलेले आहे. इतक्या वर्षापासून उगीचच नाही विसाव्याच्या जागा ठरलेल्या. आपण कसे वागायचे, हे पूर्वीपासून आपल्याला सांगितले गेले आहे, दाखवले गेले आहे… आपण त्याचे कितीतरी वेळा अनुकरण पण करतो, परंतु न समजता. असो, हरकत नाही. आता तरी विसावा घेत चला.”
“यानंतर बदल नक्कीच करणार, त्याची सुरुवात आजपासून म्हणजे अगदी आत्तापासून करणार चला… आता छान चहा घेऊ आणि मस्त गाणी ऐकू….”
“लाव रे तो रेडिओ…”
आणि काय विचारतां कोणते लागले गाणे?
भले-बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर… या वळणावर…
कसे, कोठूनी येतो आपण?
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतूर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर… या वळणावर…
कधी ऊन तर, कधी सावली
कधी चांदणे, कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावूनिया प्रीतिची झालर
जरा विसावू या वळणावर… या वळणावर…
खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर, कसले काहूर…
भले-बुरे जे घडून गेले…
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर… या वळणावर…


