अध्याय तेरावा
जीवाचेनि नावें । तृणातेंही नोलांडवे । मग न लेखितां जावें । हे कें गोठी ॥258॥ मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसा भेटलियां न करवे । अतिक्रमु ॥259॥ ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥260॥ स्वयें श्वसणेंचि ते सुकुमार । मुख मोहाचें माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥261॥ पुढां स्नेह पाझरे । मागां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥262॥ तंव बोलणेंचि नाहीं । बोलों म्हणे जरी कांहीं । तरि बोल कोणाही । खुपेल कां ॥263॥ बोलतां अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मीं न लगे । आणि कोण्हासि न रिघे । शंका मनीं ॥264॥ मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल । आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी ॥265॥ तरि दुवाळी कोणा ना व्हावी । कवणाची भंवई नुचलावी । ऐसा भावो जीवीं । म्हणोनि उगा ॥266॥ मग प्रार्थिला विपायें । जरि लोभें बोलों जाये । तरी परिसे तया होये । मायबापु ॥267॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव
अर्थ
गवताच्या काडीत जीव आहे, असे समजून ती तुडवून जात नाही. मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता, तो त्याला तुडवीत जाईल, ही गोष्ट कोठली ? ॥258॥ मुंगीला ज्याप्रमाणे मेरु पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही. ॥259॥ याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहाशील. ॥260॥ स्वत: श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत! ॥261॥ (तो कोणाशी बोलत असता) पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात ॥262॥ अगोदर तर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर तो काही कोणाशी बोलू म्हणेल (बोलण्याचे मनात आणेल) तर आपले बोलणे कोणाला खुपेल का? ॥263॥ (त्याला असे वाटत असते की) यदा कदाचित् बोलतांना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना ? आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना? ॥264॥ कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभिलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करील ॥265॥ तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नयेत (अथवा रागाने) कोणाची भुवई उचलू नये, असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो, ॥266॥ मग आपण बोलावे, अशी कोणी कदाचित् प्रार्थना केल्यावर, तो प्रेमाने बोलावयाला लागला तर, त्याचे बोलणे जे ऐकतात, त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते. ॥267॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाना कमळदळें, डोलविजती ढाळें


