हिवाळा संपून उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. तरीही संध्याकाळची समुद्र किनाऱ्यावरची हवा सुखद होती. आज नरिमन पॉइंटवर गर्दी रोजच्यापेक्षा जरा कमीच होती… आणि तेवढ्यात… ती हळूच समोरून चालत आली. पहिल्याच झटक्यात लक्ष तिच्याकडे गेलं… तिने घातलेला सलवार सूट अगदी देखणा… कपड्यांचा साधेपणा पण त्यातला एलिगन्स लगेच जाणवत होता. तिच्या खांद्यावरून अलगद पडलेला दुपट्टा चालताना हलकासा वाऱ्यावर डुलत होता. तिच्या चालण्यात एक शांत आत्मविश्वास होता. केस क्लिपमध्ये हलकेच बांधलेले… चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य… डोळ्यांत एक निरागस चमक… हातात साधीशी बांगडी, कानात छोटेसे झुमके…..
एकूणच, ती फक्त सुंदर दिसत नव्हती तर तिच्या तिथे असण्यामुळे एक शांत, प्रसन्न vibe तयार झाली होती.
ती पुढे चालत गेली… आणि समुद्राच्या काठाशी जाऊन शांतपणे बसली. तिच्या बाजूला तिची छोटीशी टिफिन बॅग होती. बहुतेक ऑफिसमधून सरळ इथे आली असावी. दिवसाचा सगळा थकवा जणू त्या बॅगेसोबतच तिने बाजूला ठेवला होता…
हेही वाचा – श्वास तुझा मालकंस…
समोर क्षितिजावर मावळता सूर्य समुद्रात अलगद विरघळत होता. आकाशात केशरी, गुलाबी रंगांची उधळण झाली होती… त्या सगळ्या रंगछटांमध्ये ती निवांत बसून ते दृश्य डोळ्यांत साठवत होती… तेवढ्यात वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि तिचे केस अलगद उडाले. तिने सहजच हाताने ते बाजूला केले आणि पुन्हा क्षितिजाकडे नजर लावली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती — जणू ऑफिसमधला गोंगाट, दिवसाची धावपळ, सगळं काही मागे पडलं होतं… आणि उरला होता फक्त हा शांत क्षण!!!
काय विचार करत असेल ती?
कदाचित दिवसभराच्या कामाचा थकवा विसरून काही क्षण स्वतःसाठी काढत असेल… कदाचित उद्याच्या आयुष्याची छोटेसे प्लॅनिंग करत असेल… किंवा कदाचित काहीच नाही !
हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…
फक्त या मोकळ्या हवेत, या शांततेत स्वतःला पुन्हा एकदा सापडत असेल… तिच्या डोळ्यांत दिसणारी ती शांत चमक, चेहऱ्यावरचं हलकंसं स्मित… सगळंच खूप काही सांगून जात होतं, पण शब्दांत काहीच मावत नव्हतं.
सूर्य हळूहळू खाली झुकत गेला… आणि त्या सोबतच त्या क्षणाचं सौंदर्य अजून गहिरं होत गेलं.
त्या संध्याकाळी, नरिमन पॉइंटवर… ती फक्त सूर्यास्त बघत नव्हती, तर जणू स्वतःसाठी थोडा वेळ जगत होती… 20 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथे मी अनुभवलेला खरा प्रसंग आहे हा… गर्दीत सापडलेला एक शांत क्षण!


