दिप्ती चौधरी
भारत आणि अमेरिका या दोन देशांत प्राण्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक आहे. मुके असले तरी प्राणी सुखरूप राहावेत, त्यांनाही भावभावना आहेत त्यांनाही प्रेमाची आणि काळजी घेण्याची गरज आहे ही इथे सार्वजनिक भावना आहे. त्यामुळेच इथे प्राण्यांबरोबरचे सह-अस्तित्व खूप छान आहे. प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करणे म्हणजे काय याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो –
आमचे कुटुंब सुट्टीसाठी जेव्हा बाहेर फिरायला जायचे, तेव्हा ह्यूस्टनमध्ये आम्हाला सांभाळण्यासाठी सुजान नावाची एक आजी यायची. ती जेव्हा पहिल्यांदा आईला भेटायला आली तेव्हा, तिने तिच्यासमोर एक मोठ्ठा फॉर्मच टाकला. त्यात तिनी आईला बऱ्याच अटी घातल्या होत्या.
तिच्या सर्व अटी या आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आमच्या आईच्या नकळत आमची सर्व जबाबदारी तिची असल्यामुळे तिने सर्व निर्णयाचे हक्क मागितले होते. जसे की, काही कारणाने घर राहण्यायोग्य नसेल, वादळामुळे वीज गेली, पाणी शिरले किंवा घरातली वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणा बिघडली तर ती सरळ आम्हाला उचलून तिच्या घरी घेऊन जाणार! अर्थात, हे करताना ती आईला विचारायचा प्रयत्न नक्की करेल, पण तिच्याशी संवाद साधता आला नाही तर, ती तसा निर्णय घेऊ शकत होती. आम्ही आजारी असू तर इमर्जन्सी वैद्यकीय मदतीसाठी ती माझ्या आईच्या परवानगीशिवाय आम्हाला घेऊन आमच्या डॉक्टरकडे जाईल आणि तिथे न्यायला जमले नाही तर, इतर कुठेही इमर्जन्सी रूममध्ये आम्हाला घेऊन जाईल. आमच्या डॉक्टरकडे तिचे नाव आमचे गार्डियन म्हणून नोंदवण्याचे तिने आईला सांगितले. साधारणपणे अशा प्रकारचे आमच्या संरक्षणासाठीचे अधिकार तिने मागितले होते. अर्थात, आईला हेच हवे होते, त्यामुळे हे अधिकार तिने तिला ताबडतोब त्या फॉर्मवर सही करून देऊन टाकले.
पण सगळ्यात महत्त्वाची अट सुजान आजीने घातली, ती म्हणजे तुम्ही परत केव्हा येणार ही तारीख जरी मला सांगितली असली तरी तुम्ही घरी पोहोचल्यानंतर मला एक निरोप पाठवून नक्की करणे! ते का याची तिने एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली.
तिचा नेहमीचा गिऱ्हाईक असलेला टॉम हा बोका त्याच्या वडिलांबरोबर ह्यूस्टनमध्ये राहतो. टॉमचा बाबा हा या जगात एकटा जीव सदाशिव! ना कोणी नातेवाईक ना कोणी जवळचे. टॉम हेच त्याचे सर्वस्व, अगदी मुलासारखे प्रेम! पण टॉमच्या बाबांना कामानिमित्त वरचेवर बाहेरगावी जावे लागायचे. त्यामुळे सुजान आजी ही टॉमची दुसरी आजीच होती जणू. नेहमीप्रमाणे टॉमचे बाबा सुजान आजीकडे जबाबदारी सोपवून आठ दिवसांसाठी दौऱ्यावर गेले. आठव्या दिवशी सुजान आजी टॉमला सांगून आली की, आज रात्री तुझे बाबा येतील, उद्यापासून मी यायची गरज नाही. रात्री सुजान आजी टॉमच्या बाबांच्या निरोपाची वाट बघत होती. पण जेव्हा सकाळीही निरोप आला नाही, तेव्हा आजीच्या मनात पाल चुकचुकली. कदाचित, मला कळवायचे विसरून गेले असतील, अशी तिने स्वतःची समजूत घातली. पण संध्याकाळी मात्र आजीला राहावेना, ती टॉमची खुशाली बघायला त्याच्या घरी पोहोचली. तिला साधारणपणे घरात शिरल्यानंतर वाटले की, टॉमचे बाबा परत आलेले नसावेत. तिने त्याच्या बाबांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन काही लागेना. काहीतरी विपरीत घडले असावे, असा तिला संशय आला.
हेही वाचा – आगाऊपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली…
त्यानंतर आजी रोज टॉम ला भेटायला जायची, त्याची काळजी घ्यायची, त्याचे खाऊ संपले तर स्वतःच्या पैशाने खाऊ आणून ती टॉमची काळजी घेत राहिली. पंधरा दिवसांनंतर एका हॉस्पिटलमधून आजीला फोन आला. पलीकडे एक डॉक्टर होते त्यांनी विचारले तू सुजानच ना? टॉम कसा आहे? आजीला काही कळेना. मग डॉक्टरांनी सांगितले टॉमच्या बाबांचा फार मोठा अपघात झाला. ते पंधरा दिवस बेशुद्धीतच होते. बेशुद्धीतच ते ‘टॉम टॉम’ असं काहीतरी बरळत होते; पण डॉक्टरांना काही कळत नव्हते. फोनची बॅटरी गेल्यामुळे सुजान आजीचा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. शुद्धीत आल्यानंतर टॉमच्या बाबांनी पहिले नाव घेतलं टॉम! फोन करून ताबडतोब सुजान आजीशी संपर्क साधण्यास त्यांनी विनवले. जेव्हा त्यांना कळले की, आपला टॉम सुरक्षित आहे आणि आजी त्याची प्रेमाने काळजी घेत आहे, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांना खूप बरे वाटले आणि त्यांच्या तब्येतीत लवकरच छान सुधारणा झाली. एक महिन्यानंतर पूर्ण बरे होऊन परत घरी येईपर्यंत आजीने टॉमची पूर्ण काळजी घेतली.
इथे ऑस्टिनला आल्यावर आमची नवी कॅट सीटर ब्रायन्ना हिला सुद्धा याच अटी आईने घातल्या आहेत. आम्हाला ब्रायन्ना खूप आवडते, कारण आमचे नेहमीच्या खाण्याबरोबर ती आम्हाला खूप सारा इतर खाऊ सुद्धा देते! त्यामुळे आमचे कुटुंब जेव्हा आम्हाला घरी सोडून सहलीवरती जाते, तेव्हा आम्हाला थोडे वाईट वाटते; पण ब्रायन्ना येणार असल्याने आम्ही काळजी करत नाही. पहिल्या वेळेला जेव्हा ब्रायन्नाने आमच्या खाऊची सर्व पाकिटे आम्हाला देऊन संपवली, तेव्हा तिने आई परत आल्यावर खास आमच्यासाठी भेट म्हणून अजून पाकिटे आणून आईला दिली! आईने तिला सांगितले, ‘अगं, खाऊ संपल्याचा काही प्रश्न नाही, पण हे दोघेही असं जंक फूड खातात, नेहमीचे खाणे खात नाहीत आणि मग वजन वाढवून बसतात!’ यावर तिचे उत्तर होते, ‘मला स्वतःला चटर-पटर खाणे खूप आवडते, त्यामुळे मी सगळ्या माऊंचे असेच लाड करते!’
आईच्या मते आम्ही एकटे राहत असताना आमचे लाड होतात, हे महत्त्वाचे! त्यामुळे तीच आमच्या आवडीचा भरपूर खाऊ ठेऊन देते! आमचे पप्पा तर म्हणतात की, ‘खूप दिवस जर आपण घराबाहेर पडलो नाही तर, ही पोरे आवर्जून विचारतील “आम्हाला ब्रायन्ना हवी आहे खाऊ साठी, आता परत केव्हा जाताय बाहेर? खूप दिवस तुमच्या हातचे पौष्टिक खाऊन कंटाळा आला आहे.’
हेही वाचा – …मग आईने एक अत्यंत अनोखा उपाय शोधून काढला
परतीच्या प्रवासाला सुरुवात करताना जेव्हा आई ब्रायन्नाला निरोप पाठवते की, आम्ही निघतोय पोहोचल्यावर तुला पुन्हा मेसेज करते, तेव्हा ब्रायन्ना तिला नेहमी एकच उत्तर देते “सुखरूप पोहोचा, तुमची बाळे तुमची वाट बघत आहेत.”
(पिदू या बोक्याची आत्मकथा)
diptichaudhari12@gmail.com