Wednesday, July 2, 2025
Homeललितबाप... हा बापमाणूसच असतो

बाप… हा बापमाणूसच असतो

उमा सुहास काळे

स्त्री तरुण झाली की, आईबापाची साथ सोडते आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते… मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी! जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहिजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या नकळत मुलांना पैसे पुरविते. सहजिकच, ही भावनिक नाळ लहानपणापासूनच जोडलेली असते. मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत आणि जन्मापासून तिच्या सहवासात असतात.

बऱ्याच परिवारात मुलं तरुण झाली, की बापाशी बोलत नाहीत! त्यांना जे मागायचं ते आईकरवी वडिलांना निरोप पाठवतात, आईशी मनमोकळेपणाने बोलतात, खुलपणाने मनातील सर्व चांगल्या-वाईट गोष्टी तिला सांगून टाकतात. काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण, बहुतांश महिला यापासून पतींना दूर ठेवतात. मुलांच्या वाईट सवयी आणि झालेल्या छोट्या-मोठ्या चुका लपवितात, त्यावर पडदा टाकतात… आणि काहीवेळा मुलं मग भरकटतात, बिघडतात. आईचं मुलावर नितांत प्रेम असावं, पण ते इतकं आंधळं प्रेम असू नये की, ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बरबाद होईल.

मुलं वीस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा! आणि ते साहजिकच आहे. पण या कौतुकामुळे त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात. ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलांवर बापाचा वचक राहात नाही. मुलांना आई चांगली वाटते अन् बाप वैरी वाटायला लागतो.

हेही वाचा – सदाफुली… आयुष्यातील सुख

वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो. मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली, नीतिवान, शीलवान, बलवान बनावे. चांगल्या लोकांमधे उठावे बसावे, सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा, आयुष्यातील अशा कितीतरी गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्यात, यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो, मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो. आपल्या मुलाच्या हातून काही चुकीचं घडू नये, असं बापाला वाटत असतं. म्हणून तो आपल्या मुलांचे अकारण लाड करीत नाही. पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही.

बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत. अशा परिस्थितीत माणूस खिन्न होतो… कधी कधी त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही. ती मुलाला समजावण्यात कमी पडते की, बाळा, तुझे वडील तुझ्या भल्यासाठीच तुला बोलतात, रागावतात. ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, ते तुला बोलतात, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही, असं तर होत नाही ना?

उलट, काही घरांत तर आई मुलांसमोरच असं म्हणताना दिसते की, बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला? घरात आले की सुरू होतात, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्यांचे मित्र बनायला पाहिजे तुम्ही, पण नाही..! लेकरांत जीवच नाही ना तुमचा! कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्यांच्याशी…!!

अशाप्रकारे, आई नवऱ्याचा, मुलांसमोर पाणउतारा करते आणि “मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्व काही करते,” असा मातृत्वाचा, प्रेमाचा आणि श्रेष्ठत्वाचा आव आणते!! असे सतत ‘हॅमरिंग’ होऊन मुलं बापापासून दूर जातात!!

हेही वाचा – मालकी नव्हे, माणुसकी हवी…!

म्हणूनच, वेळेचं भान ठेवा! प्रपंच ही फार समजून-उमजून करायची गोष्ट आहे. मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे, पण त्यांना घडवताना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा! हे कायम लक्षात ठेवा. लहानपणी बापाचा हात धरला, तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही!

बाप… हा बापमाणूसच असतो… त्याला कृपया बापडा बनवू नका!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!