आरेन
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सामना सुरू असताना कोणालाही मोबाइल वापरण्याची परवानगी नसते. सामना सुरू होण्याआधी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे मोबाइल बाजूला काढून ठेवले जातात. सामना संपल्यानंतरच सर्वांना आपापले मोबाइल दिले जातात. मात्र, असे असतानाही सामना सुरू असताना चक्क एकजण मोबाइल वापरत असल्याचे दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्या व्यक्तीला मोबाइल कोणी दिला आणि यावर अद्याप आयपीएलकडून कोणतीही कारवाई का नाही झाली, याबाबत विचारणा होत आहे.
याप्रकरणे, राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात डगआऊटमध्ये रोमी भिंडर मोबाइल फोन वापरताना टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले. या घटनेमुळे आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ही बाब सर्वप्रथम एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यानंतर या घटनेची अधिकृत पुष्टी झाली. गुवाहाटी येथे शुक्रवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सहा गडी राखून विजय मिळवला होता. मात्र, या विजयानंतरही भिंडर यांचा मोबाइल वापर चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, त्या वेळी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी त्यांच्या शेजारी बसला होता.
हेही वाचा – युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने या प्रकाराला दुजोरा देत स्पष्ट केले की, डगआऊटमध्ये मोबाइल फोन वापरणे पूर्णपणे बंदी आहे. ‘भिंडर यांनी प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया (PMOA) प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे,’ असे त्यांनी सांगितले.
आयपीएलच्या नियमांनुसार, टीम मॅनेजरला ड्रेसिंग रूममध्ये मोबाइल वापरण्याची परवानगी असली तरी डगआउटमध्ये त्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. हे नियम भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांचा एक महत्त्वाचा भाग मानले जातात, जेणेकरून सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये.
भिंडर हे राजस्थान रॉयल्ससोबत सुरुवातीपासून जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांना या नियमांची पूर्ण माहिती असणे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार नकळत घडला असण्याची शक्यता असली तरी नियमभंग झाल्यामुळे कारवाई होणे आवश्यक आहे. यामध्ये इशारा देणे, दंड किंवा बंदी यापैकी कोणतीही शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा – अजिंक्य रहाणेला ठरवून केले जातंय का टार्गेट?
या प्रकरणाचा अंतिम निर्णय सामना रेफरी आणि बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटच्या (ACU) अहवालावर आधारित असेल. त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल पुढील कारवाई निश्चित करेल.
सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी याने भिंडर यांना ‘स्थानिक संरक्षक’ असे संबोधल्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणखी सखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा वाद आगामी काळात अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


