सुधीर करंदीकर
“14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे!
काही वर्षांपूर्वी हा शब्द आपल्याला माहीतही नव्हता आणि आता तरुणाईकरिता व्हॅलेंटाइन डे हा अगदी महत्त्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात की, हा परदेशी सण आहे. आपण का म्हणून साजरा करायचा? आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा की, नाही? याकरिता हे माहिती करून घेणे जरुरी आहे की, व्हॅलेंटाईनचा काय अर्थ आहे, आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?
व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे… हे रोममध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याचा असा समज होता की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटाने असा हुकूम काढला की, ‘सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही.’ तथापि, व्हॅलेंटाईन आणि इतर कुणालाच हे पसंत नव्हते, पण आलीया भोगासी… लोक लपून छपून व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार? राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली.
हेही वाचा – फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!
रोमच्या लोकांची अशी धारणा होती की, व्हॅलेंटाईनकडे दिव्यशक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईनने आपल्या दिव्यशक्तीने त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईनला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला… त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला. व्हॅलेंटाईनने जेलरकडून कागद आणि पेन मागून घेतले आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”. हा दिवस होता 14 फेब्रुवारी 496 (काही ठिकाणी 269 असाही उल्लेख आहे).
तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरिता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरू झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक… असे सगळेच या परिघात आले. ज्याच्याविषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना लोक या दिवशी शुभेच्छा देतात. हा सण जगभरात साजरा केलास जातो.
जवळपास तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) वातावरण तयार झाले आणि देशविदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरू झाली. आधी त्याची गती मंद होती आणि आता तर झपाट्याने हे सुरू आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे म्हणता येईल.
आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटले जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दिवाळी, दसरा, राखी पौर्णिमा, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस असे अनेक सण, उत्सव आपण आनंदाने, उत्साहाने आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही. सगळ्या सणांमागची कल्पना एकच असते, ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको असो, प्रियकर – प्रेयसी असो, इतर नातेसंबंधांकरिता असो, मित्र परिवाराकरिता असो, प्राणिमात्रांकरिता असो किंवा निसर्गाकरिता असो… मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं.
हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…
आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही… आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही… या दुष्टचक्रात आपण सगळेच अडकलो आहोत. भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून आपल्या पूर्वजांनी जणू निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा करतो.
असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give.
कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा, यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण –
True love knows no reason
आणि
Love has no boundaries.
सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे.
पूर्वी सगळे नोकरदार एक तारखेला खूश असायचे – “खूश है जमाना, आज पहिली तारीख है…”
आता सगळे प्रेम व्यक्त करणारे 14 फेब्रुवारीला खूश असतात – “खूश है जमाना, आज व्हॅलेंटाईन डे है…”
मोबाइल – 9225631100


