दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 फेब्रुवारी 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 28 माघ शके 1947; तिथि : अमावस्या 17:30; नक्षत्र : धनिष्ठा 21:15
- योग : परिघ 24:28; करण : किंस्तुघ्न 29:17
- सूर्य : कुंभ; चंद्र : मकर 09:05; सूर्योदय : 07:07; सूर्यास्त : 18:38
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
दर्श अमावस्या
कंकणाकृती सूर्यग्रहण (भारतात दिसणार नाही)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकेल. प्रवास शक्य आहे. आरोग्य चांगले राहील. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शांत आणि स्थिर मनाने पुढे जा, त्याचा तुम्हाला फायदा होईल.
वृषभ – आज आर्थिक समृद्धी अनुभवण्याचा दिवस आहे. उत्पन्नाचे विविध स्रोत तयार होतील. कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या सल्ल्याने नफ्याचे नवे मार्गही खुले होऊ शकतात. शैक्षणिक उपक्रम यशस्वी होतील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. स्वतःच्या आहाराची काळजी घ्या. शक्य असेल तर प्रवास टाळा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन – कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. नकारात्मक विचार तुमचे लक्ष विचलित करू शकतात. नामस्मरणावर लक्ष केंद्रीत करा. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा आणि पथ्यपाणी पाळा.
कर्क – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात चांगला नफा होईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. करिअरला एक नवीन वळण मिळू शकते. आर्थिक लाभामुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. लोकांबद्दल सकारात्मक विचार ठेवणे फायदेशीर ठरेल. आज जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराला महत्त्व द्या.
सिंह – सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल. आजचा दिवस तुम्ही मनोरंजन आणि प्रवासात घालवू शकता. जोडीदाराकडून तुम्हाला मोठा पाठिंबा मिळेल. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असेल. आरोग्याची काळजी घ्या. मनात नकारात्मक विचार असणे हानिकारक ठरू शकते. शिक्षणात प्रगती होईल.
कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जुन्या मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. बोलण्यावर संयम आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट केसेसपासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे.
हेही वाचा – त्याच्या मदतीने तिने मनात रुतलेला काटा उपसून टाकला…
तुळ – आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक लाभ आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. वैवाहिक जीवनात काही कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे संयम ठेवा. मित्रांवर भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. आहाराकडे लक्ष द्या. आरोग्य चांगले राहील. अभ्यासात रस वाढेल.
वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च होईल. अनावश्यक वाद टाळा, रागावर ताबा ठेवा. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहील. कौटुंबिक वातावरण अनुकूल होईल. आज मित्रांच्या भेटी होऊ शकतात.
धनु – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय वाढवण्याची योजना आखाल. कामाचा ताण जास्त असेल, दिवसभर दगदग होईल. मात्र तुमचे प्रयत्न आणि मेहनत सफळ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. आज कुटुंबासह धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.
मकर – आजचा दिवस संमिश्र असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक विचार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच मालमत्तेत गुंतवणूक करा. जोखीमेचे आर्थिक व्यवहार टाळा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. प्रवास फायदेशीर ठरेल. विद्यार्थी त्यांच्या करिअरमधील यशाने आनंदी असतील. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
कुंभ – आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात नफा होईल. परंतु काही अडचणींनाही तोंड द्यावे लागेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. संततीबाबतच्या समस्या उद्भवू शकतात. वाढत्या खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
मीन – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. कठोर परिश्रम आणि कामावर लक्ष केंद्रित केल्याने लक्षणीय नफा मिळू शकतो. तथापि, व्यवसायासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो आणि त्याचा फायदा होईल. आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आज घरातील कामांमध्ये व्यग्र रहाल. तुमचे बोलणे आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा.
दिनविशेष
सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके
टीम अवांतर
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील (रायगड) शिरढोण गावी झाला. वासुदेव फडके यांनी इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जी. आय. पी. रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली. नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी 1863 मध्ये वासुदेव लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. तिथे ते 21 फेब्रुवारी 1879 पर्यंत म्हणजे बंडाचे निशाण उभारेपर्यंत राहिले.
पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना 1871 मध्ये झाली. तिच्यामार्फत महादेव गोविंद रानडे यांची स्वदेशी चळवळीवर दोन व्याख्याने झाली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी वासुदेवांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरविले. ते पुण्यात देशभक्तीपर व्याख्याने देऊ लागले. लोकांचे शासन असावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने संघटना स्थापन केली आणि 22 फेब्रुवारी 1879 रोजी ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर केले.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण
पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इत्याद. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकारांना लुटून मिळवलेल्या पैशातून नव्या टोळ्या उभारायच्या आणि सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेवांचा विचार होता. मात्र ही संघटना फार टिकली नाही. पुढे 21 जुलै 1879 रोजी विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले.
पुणे येथे त्यांच्यावर दंड संहितेच्या कलमांखाली खटला चालविण्यात आला. न्या. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची – काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी 1880 च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता. त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत, शस्त्रसामग्रीही मिळाली नाही; मात्र भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणून त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात. त्यांच्या कार्याचा उचित गौरव शिरढोण येथे 1940 साली त्यांच्या नावाचा स्मारकस्तंभ उभारून करण्यात आला आहे.


