दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 फेब्रुवारी 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 21 माघ शके 1947; तिथि : अष्टमी 07:26; नक्षत्र : विशाखा 07:54
- योग : ध्रुव 25:41; करण : तैतिल 20:42
- सूर्य : मकर; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 07:10; सूर्यास्त : 18:35
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस तुमचा आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. सरकारी कामात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि तुमचे मनोबल उंच राहील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना एखादा सन्मान मिळू शकतो. सौम्य बोलण्यामुळे नवीन मित्र बनण्यास मदत होईल, त्यामुळे कठोर शब्द टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने तुम्ही चिंतित असाल.
वृषभ – आजचा दिवस तुमच्या छंदांना वाव देण्याचा असेल. त्याचा मनसोक्त आनंद घ्या. मात्र वाढत्या खर्चाकडे दुर्लक्ष करू नका. आज जोडीदाराच्या मदतीने एखादा व्यवसाय सुरू करू शकता. एखाद्या कराराला अंतिम स्वरुप देता येईल. कोणाहीबद्दलचा मत्सर टाळा. तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.
मिथुन – आजचा दिवस उत्पन्नात वाढ करणारा ठरेल. तुमचा खर्चही जास्त असेल. सरकारी क्षेत्रात चांगले काम कराल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यासंदर्भातील काही ज्ञान तसेच तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांशी कोणत्याही गोष्टीवरून वाद घालणे टाळावे, कारण ते तुमच्या बोलण्याने नाराज होऊ शकतात. अविवाहित जातकांची भेट त्यांच्या नियोजित जोडीदाराशी होऊ शकते.
कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. कामासोबतच तुमच्या आरोग्यासाठी वेळ काढावा लागेल, तरच तुम्ही तंदुरुस्त राहू शकाल. जवळची एखादी व्यक्ती कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्हाला खूप दुःख होईल. एखाद्या मनोरंजन कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढतील.
सिंह – आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल. सामाजिक कार्यात प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बोलण्याने नाराज होऊ शकता. जे काही काम करता त्यासाठी तुम्हाला आधीच नियोजन करावे लागेल. एखादा सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, मात्र कामावर लक्ष केंद्रीत करून हे प्रयत्न उधळून लावाल.
कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सुखसोयी वाढतील. विरोधकांच्या डावपेचांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, तरच, ते उधळून लावू शकता. वडीलधाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळेल. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
हेही वाचा – सखीचा मंद झालेला श्वास अन्…
तुळ – परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडल्याने आनंदी व्हाल. मात्र, भागीदारीत काम करणे टाळा अथवा कोणत्याही भागीदारीतील कामाचा काळजीपूर्वक विचार करा. काही बाबींमध्ये वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागू शकतो. प्रवास करताना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. अविवाहित जातकांची त्यांच्या नियोजित जोडीदाराशी भेट होईल.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी निराशा तुमच्या वाट्याला येईल. पण संयम सोडू नका, परिस्थिती बदलू शकते. व्यवसायात नवीन करार होतील, पण त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या सोडवण्याचा आज प्रयत्न करा. आज धार्मिक कार्यात खूप रस निर्माण होईल. आज आईशी काही कौटुंबिक बाबींवर चर्चा कराल.
धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. पालकांसाठी वेळ काढावा लागेल. तुमचा व्यवसाय वाढेल, परंतु काही अनपेक्षित खर्चामुळे तुमचा ताण वाढेल. जोडीदार तुमच्याकडून एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतो. दिखाव्याचा मोह टाळा. कामाच्या निमित्ताने अचानक प्रवासाला जावे लागू शकते.
मकर – दिवसभर व्यग्र रहाल. एखाद्या मालमत्तेचा व्यवहार निश्चित होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीसाठी शहराबाहेर जावे लागू शकते. कर्जासाठी अर्ज केला तर, तुम्हाला ते सहज मिळेल. तुम्ही भरपूर कष्ट कराल, परंतु तुमच्या प्रयत्नांचे अपेक्षित फळ न दिसल्याने थोडे निराश देखील व्हाल. कोणाशीही बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ – बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामाबद्दल वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा केली जाईल. नोकरी शोधत असाल तर, नवीन संधी मिळू शकते. प्रवास करताना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. जोडीदाराला खरेदीसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता. महिला जातकांनी मैत्रिणींशी वागताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आईचा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो.
मीन – आज नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायातही तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल. आज उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित कराल. सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत सहज मिळेल. वैवाहिक जीवनात नवीन समस्या उद्भवू शकतात, पण संयम बाळगा, त्यातून मार्ग निघेल. संततीच्या प्रगतीची काळजी वाटेल. पालकांचे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत असेल.
दिनविशेष
ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत
टीम अवांतर
श्रेष्ठ मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि बौद्धधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या दुर्गा भागवत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी इंदूर येथे झाला. अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या दुर्गाबाईंची महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेन्री डेव्हीड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राऊनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. केतकर ही काही प्रमुख प्रेरणास्थाने होती.
गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे त्या दोन वर्षे समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. तसेच साहित्य-सहकार या मासिकाचे वर्षभर त्यांनी संपादनही केले. हे अपवाद वगळल्यास त्यांनी संशोधन-लेखन यासाठी नंतर कधीही नोकरी केली नाही. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ ‘अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्पूडन्स’ तर पहिला मराठी ग्रंथ ‘राजारामशास्त्री भागवत : व्यक्तिचित्र, वाङ्मयविवेचन’ हा होय.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण
समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. याशिवाय, साने गुरूजींनी प्रेरीत केल्याने दुर्गाबाईं ललितलेखनाकडे वळल्या. गोंडजीवनातील प्रेमकथा असलेली ‘महानदीच्या तीरावर-गोंडजीवनावरील नवलिका’ ही त्यांची पहिली ललितनिर्मिती. पुढे दीर्घ आजारपणातील बंदिस्त एकांतवासाने त्यांना नव्याने ललितलेखनाची प्रेरणा दिली. ऋतुचक्र पुस्तकाचे लेखन त्यातून घडले. विविध ऋतूंतील निसर्गाच्या बदलत्या लावण्यविभ्रमांचे चित्रांकन करणाऱ्या या गद्यकाव्यात्म ललितनिबंधातून निसर्ग आणि मानव यांच्यातला गूढ ऋणानुबंध प्रतीत होतो. भावमुद्रा, पैस, डूब या संग्रहातून कसदार ललितलेखनाचा एक स्वतंत्र बाज दिसून येतो.
व्यासपर्व ही त्यांची आणखी एक कसदार निर्मिती. महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांचा आणि त्यांच्या जीवनाचा सर्जक अन्वयार्थ लावणारे हे व्यासपर्व अलौकिकतेचा आणि एका विशाल अनुभूतीचा प्रत्यय घडवते. लोकसाहित्याच्या अभ्यासात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मोडणी आढळते, तशीच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेली गहिरेपणाची डूबही दिसते.
आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला. त्यासाठी कारावासही पत्करला. विद्वत्ता, ज्ञानसाधना, नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये आणि खऱ्या लोकशाहीची प्रतिमा सिद्ध करण्यास विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मुक्ता, जनतेचा सवाल ही त्यांच्या त्या काळातील भाषण लेखांची संकलने आहेत. कराड येथे भरलेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अशा या विदुषीचे 7 मे 2002 रोजी मुंबईत निधन झाले.


