दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 एप्रिल 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 20 चैत्र शके 1948; तिथि : अष्टमी 23:14; नक्षत्र : पूर्वाषाढा 11:27;
- योग : शिव 18:29; करण : बालव 10:20;
- सूर्य : मीन; चंद्र : धनु 18:02; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:54;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते धनंजय गाडगीळ
टीम अवांतर
विख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि थोर विचारवंत धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म 10 एप्रिल 1901 रोजी नागपूर येथे झाला. नागपूरमधील पटवर्धन विद्यालयात आणि केंब्रिजच्या क्वीन्स कॉलेजात त्यांचे शिक्षण झाले. इंग्लंडमध्ये एम्.ए. आणि डी. लिट्. पदव्या संपादन केल्यावर मुंबई सरकारच्या अर्थखात्यात त्यांनी एक वर्ष नोकरी केली. सुरत येथील एम. टी. बी. महाविद्यालयाचे प्राचार्यपद पाच वर्षे सांभाळल्यानंतर 1930पासून ते पुण्याच्या ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’च्या संचालकपदी रुजू झाले. वयाच्या पासष्टाव्या वर्षांपर्यंत कार्यरत राहून त्यांनी ती संस्था नावारूपाला आणली. 1966-67 साली ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. काही वर्षे ते राज्यसभेचे सभासद होते. सप्टेंबर 1967मध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले.
डॉ. गाडगीळ भारतातील सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका वाढीस लावण्याचे श्रेय त्यांना आहे. भारताच्या अर्थकारणाचा, विशेषतः कृषिविषयक जटिल समस्यांचा, सखोल अभ्यास करून त्यांनी आपले मूलग्राही विचार अनेक ग्रंथांतून तसेच लेखांतून मांडले.
हेही वाचा – Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय
अनेक आर्थिक आणि शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांनी पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली असून द इंडस्ट्रियल ईव्हलूशन इन इंडिया, द फेडरल प्रॉब्लम इन इंडिया, रेग्युलेशन ऑफ वेजिस, प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी यासारख्या ग्रंथांतून त्यांच्या तर्कशुद्ध आणि साक्षेपी दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. निव्वळ आर्थिक सिद्धांतांचे विश्लेषण करण्यावर भर न देता त्यांचा व्यावहारिक उपयोग करण्यावर गाडगीळांचा कटाक्ष असे. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा, असे मत ते आग्रहाने मांडीत.
नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर 3 मे 1971 रोजी पुण्याकडे परतताना ट्रेनमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. गोखले अर्थशास्त्र संस्थेने गाडगीळांचे मराठीतील समग्र लिखाण ध. रा. गाडगीळ लेखसंग्रह नामक दोन खंडांत प्रकाशित केले आहे.
आजचे राशीभविष्य
मेष – भविष्याचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. स्वतःची कौशल्ये आणि ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. चैनीच्या वस्तूंची खरेदी टाळणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिकांना नवे प्रकल्प मिळतील. नफ्याचे प्रमाण वाढेल. मानसिकदृष्ट्या सक्षम असाल. उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता आहे.
वृषभ – नोकरीच्या ठिकाणी कामाची गती संथ वाटत असली तरी सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल, तुमची प्रशंसा होईल. व्यावसायिकांना आपला व्यवसाय विस्तार करण्याची संधी मिळेल. यासाठी योग्य त्या व्यक्तीकडून मार्गदर्शनही मिळेल. काही जातकांना कुटुंबाशी संबंधित किंवा भविष्यातील योजनांशी संबंधित खर्चांना सामोरे जावे लागू शकते.
मिथुन – आज खर्चाच्या सवयींकडे लक्ष देण्याची तसेच आर्थिक नियोजनाची पुनर्रचना करण्याची गरज आहे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात किंवा नव्या वळणावर येऊ शकतात. व्यावसायिकांनी नवे करार करण्याआधी सगळी कागदपत्रे नीट समजून घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्याची आणि त्यातही त्वचेची काळजी घ्या.
कर्क – तुमची क्षमता आणि कौशल्ये दाखवण्याची हीच वेळ आहे. इतरांशी सकारात्मक आणि सलोख्याचे संबंध निर्माण करण्यावर तसेच, नातेसंबंधांमध्ये संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित करा. आज तुमची कौशल्ये दाखवण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असाल.
सिंह – ध्येयांच्या दिशेने पुढे जाण्याची आणि बदल घडवण्याची एक दुर्मीळ संधी निर्माण होऊ शकते. अनपेक्षित आव्हाने आणि रोमांचक संधी या दोन्हींचा अनुभव मिळेल. व्यावसायिक आज नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतील. तब्येतीची काळजी घ्या, गुडघेदुखी किंवा स्नायूदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या – स्वतःला प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रवास करताना किंवा गाडी चालवताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक करतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळेल. परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.
तुळ – आज आत्मविश्वासाने पुढे जाल. माक्ष, रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा शब्दाने शब्द वाढत जाऊन चांगले नातेसंबंध दुरावतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. घरातील लग्न सराईच्या दृष्टीने महिला वर्ग दागिने आणि कपडेलत्ते यांची खरेदी करेल. मोसमी फळे अवश्य खा, पाणी भरपूर प्या.
वृश्चिक – अविचारी खर्च करण्याऐवजी काळजीपूर्वक नियोजन करा. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. कामासाठी प्रवास करावा लागेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यावसायिक अनपेक्षितपणे नफा होईल. पित्ताचा त्रास किंवा पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकते.
धनु – नेटवर्किंगमुळे किंवा जुन्या मित्रांच्या मदतीने नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. परदेशातून एखादी मोठी ऑर्डर मिळाल्याने व्यावसायिकांना नवी संधी मिळेल. मानसिकदृष्ट्या आज तणावाखाली असाल. योगाभ्यासाचा फायदा होईल. महिलांना स्वत:ची चमक दाखविण्याची संधी मिळेल.
हेही वाचा – सोनाराने कान टोचताच, नीरज…
मकर – व्यवसायात मोठा नफा मिळाल्याने एखाद्या पार्टीचे आयोजन कराल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल, परंतु सहकारी तसेच वरिष्ठांकडून मदत मिळेल. शालेय यशाची गुरुकिल्ली घोकंपट्टीऐवजी सखोल अध्ययन आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळा. कौटुंबिक जीवनात जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.
कुंभ – सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. व्यावसायिक योजनांबाबत कोणाशीही चर्चा करणे सध्या टाळा. कौटुंबिक सहलीचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्याल. घरासाठी एखादी महत्त्वाची खरेदी कराल. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येत आहे. काही जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल. कामाच्या निमित्ताने लहान प्रवास घडतील. त्याचा भविष्यात मोठा फायदा मिळेल. महिला वर्गाला माहेरची माणसे भेटतील. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असाल.


