तसं बघायला गेलं तर आमचं चौघांचं मस्त कुटुंब. चौघे म्हणजे मी, माझे यजमान, लेक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, माझे सासरे… आमचे सगळ्यांचे आबा! वय वर्ष 79. वयोमानानुसार आलेली विस्मृती आणि कानाला यंत्र, एवढं सोडलं तर, तब्येत तशी ठणठणीत… पण, यंत्र काढून ठेवलं की, एकदम कुंभकर्णाचा अवतार. नगारे वाजवले तरी, कळणार नाही अशी स्थिती!! दंताजीचं ठाणं उठलेलं, पण काही चुकार दात बोळक्यातून लुकलुकणारे… आम्हाला आमच्या सगळ्यांच्याच बालपणाची आठवण करून देणारे…
पांढरा शुभ्र सदरा लेंगा हा घरातला वेष. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र चट्टेरीपट्टेरी, नाडीची, गुडघ्यापर्यंत येणारी अर्धी चड्डी. वर उघडाबंब देह आणि जानव्याने पाठ खाजवण्याची खास लकब… डोक्यावरचे, विरळ होत जाणारे केस, पण तरीही, आंघोळ झाल्यावर तेल लावून चापून भांग पाडायची सवय!
सकाळी फिरायला जाणं, येताना छोट्याशा कापडी पिशवीत सोसायटीच्या बागेतली फुलं खुडून आणणं, दूध आणणं, देवपूजा, साग्रसंगीत पेपर वाचन आदी नित्य कर्म… सकाळी आम्हा सगळ्यांना, स्वतःच्या हातचा चहा पाजल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. एकंदरीत अगदी सुखी आयुष्य त्यांचं…
सरकारी नोकरीतून निवृत्त त्यामुळे आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी. आम्ही रहात असलेलं घर, म्हणजे त्यांचीच मिळकत. आमच्या, आयत्या पिठावर रेघोट्या…
सासूबाईंना जाऊन आता पाच वर्षं झाली. सगळ्या दुःखांवर काळ हाच इलाज, या उक्तीप्रमाणे ते हळूहळू सावरले आहेत, त्यांच्या नसण्याला, आणि फक्त आमच्या असण्याला… आम्ही तिघेही सकाळी ऑफिसला गेल्यावर त्यांचंच राज्य घरावर. बागडत असतात नुसते घरभर. दुपारची तासभर वामकुक्षी सोडली तर, संध्याकाळी आम्ही येईपर्यंत काही ना काही उपद्व्याप सुरू असतात त्यांचे. मोलकरीण गेली की, घासलेली भांडी जागच्या जागी जाणारच, मी येईपर्यंत. एखाद्या दिवशी नसतील गेली तर, समजायचं, आज तब्येत नरम असणार!
माझं ऑफिस तसं सगळ्यात जवळ, त्यामुळे मी सगळ्यांच्या नंतर निघते आणि सगळ्यांच्या आधी घरी परत येते. आल्यावर, ओट्याशी उभं राहायच्या आधी अर्धा कप गरम चहा माझ्या हाती देऊनच आबा खाली उतरतात, मित्रांच्या कंपूमध्ये सामील व्हायला. किती सुखी मी!!
परवा मात्र या आनंदी आबांनी आम्हाला टांगलं, मस्तपैकी! त्यांच्या विसरभोळेपणाचा जबर फटका आम्हाला बसला, पण काय करणार? लहान मूलच ते, कसं आणि किती ओरडणार त्यांना?
मी ऑफिसमध्ये निवांत चहाचे घुटके घेत असतानाच फोन वाजला. शेजारच्या काकू… आता काय काम काढलं यांनी बरं, असा विचार करतच फोन उचलला.
हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्
“अगो, तुमच्या स्वयंपाकघरातून धूर येतोय आणि जळका वास सुद्धा. आम्ही बेल वाजवतोय पण आबा दार उघडेनासे झालेत. फोन पण उचलत नाहीयेत. तू ये लवकर…” काकूंचा घाबराघुबरा स्वर.
माझ्या छातीत धस्स झालं. काही सुचेचना! रडकुंडीला आले मी!!
“अहो, पण तुमच्याकडे आहे ना किल्ली, उघडून बघा की पटकन्… मी पोहोचतेच तेवढ्यात…”
“अगो, काल नाही का तू घेतलीस किल्ली? परत नाही दिलीस. विसरलीस द्यायला बहुतेक.”
खरंच की, काल मी किल्ली घेतली आणि सकाळच्या घाईत ती परत द्यायचीच विसरले. आबांना विसराळू म्हणता म्हणता, मला माझीच स्वतःचीच कीव यायला लागली. साहेबांना सांगून, नवऱ्याला फोन करून निघाले पटकन्. पंधरा मिनिटांचा प्रवास आज संपतच नव्हता. जीव नुसता टांगणीला…
सोसायटीपाशी मी पोहोचायला आणि कर्कश्श सायरन वाजवत, दिव्यांची उघडझाप करत आगीचा बंब पोहोचायला एक गाठ. निळ्या कपड्यातले, डोक्यावर चकचकीत शिरस्त्राण घातलेले जवान आणि मी समोरासमोर… वर आमच्या खिडकीतून काळ्या धुराचे लोट. मी आणि एक अग्निशमन अधिकारी धावतपळत आमच्या मजल्यावर पोहोचलो. मी किल्लीनं दार उघडलं. घरात धूर कोंडलेला थोडासा, स्वयंपाकघरात जाऊन पाह्यलं तर गॅसवर दुधाचं पातेलं काळं ठिक्कर पडलेलं, गॅस चालूच आणि त्यातून निघालेला धूर घरभर आणि घराबाहेर…
‘आबा कुठे गेले?’ मी कासावीस.
त्यांच्या खोलीचं दार बंद. ते ढकलून आत गेले आणि कपाळावर हात मारला. माझ्या मागोमाग आत शिरलेला तो अधिकारी सुद्धा आतलं दृश्य पाहून स्वतःशीच हसला असावा बहुतेक!
आबा, त्यांच्या बेडवर ढाराढूर निद्रेत. कानाचं यंत्र शेजारीच काढून ठेवलेलं. मोबइलही शेजारीच आणि त्यावर अगणित missed calls… मला हसावं का रडावं, तेच कळेना. त्यांना हलवून उठवलं… ते खडबडून जागे झाले आणि वर मलाच विचारलं, “वास कसला येतोय? काही जळलंय काय?”
कर्म माझं!! रागावू, ओरडू, की हसू… मलाच कळेना, एवढे ते निष्पाप…
त्यांना म्हणाले, “आबा, चला जरा स्वयंपाकघरात…” तिथे गेल्यावर एकंदरीत सगळं दृश्य पाहून त्यांची स्मृती जागी झाली.
“अरे देवा!! मीच ठेवलं होतं की, दूध तापत, चहासाठी. तापायला थोडा अवकाश होता म्हणून म्हटलं जरा डुलकी काढू, आणि झोपच लागून गेली.”
त्यांची सारवासारव, केविलवाणी… दूध ठेवलं होतं तापत ते पार विसरूनच गेले होते आबा आणि आता त्यावर पांघरूण घालायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात धापा टाकीत नवरा पोहोचला. तो आता त्यांच्या अंगावर ओरडणार हे जाणवून, मी पटकन डोळे वटारून त्याला शांत केलं. तो चरफडतच गप्प बसला.
अग्निशमन अधिकारी भला माणूस होता. एकंदर परिस्थिति पाहून, जास्त बाऊ न करता, काही कागदांवर नवऱ्याची सही घेऊन, ‘यापुढे काळजी घ्या,’ असं बजावून शांतपणे निघून गेला. शेजारीपाजारी पण आपापल्या घरी गेले आणि आम्ही बाकीचं निस्तरायच्या तयारीला लागलो.
हेही वाचा – कुणीतरी आहे तिथे!
सगळे जाताच आबा हमसाहमशी रडायला लागले… ‘मीच या सगळ्याला कारणीभूत’ म्हणून स्वतःलाच दोष द्यायला लागले आणि आम्ही, काय करावं न सुचून नुसतेच उभे…. आम्ही समजूत घातली त्यांची, पण आता आबांना एकटं ठेवायची भीती वाटायला लागली. त्यांचे चार मित्र येऊन धीराच्या गोष्टी सांगून गेले, पण हे असं कुठवर, ही चिंता भेडसावतच राहिली आम्हाला. परत असं काही झालं तर?
बऱ्याच विचारानंतर, आबांना समजावून, थोडं त्यांच्या कलानं घेऊन, आम्ही दिवसभरासाठी सोबतीला माणूस ठेवायचा विचार केला आणि लगोलग त्याची अंमलबजावणी केली. नशिबाने ओळखीतच चांगला माणूस मिळाला आणि आमची काळजी कमी झाली!
हे असं असतं वार्धक्य. जरी आपण त्याला दुसरं बालपण म्हणत असू, तरी ते तसं नसतं. सगळं कळत असतं पण वळत नसतं, अशी परिस्थिति. ही अशी वेळ थोड्याफार फरकाने सगळ्यांच्याच वाट्याला येणार, ही काळ्या दगडावरची रेघ. आपली मुलं आणि सुना कसा प्रतिसाद देतील, हे मात्र आपलं प्राक्तन, न टाळता येण्यासारखं…


