माझ्या वडिलांच्या दवाखान्यापासून मुसलमान वस्ती काही अंतरावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक मुस्लीम रुग्ण यायचे. अनेक रुग्णांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. त्याकाळात वडील माफक फी घ्यायचे… अर्थात, तेव्हा पैशाचे स्तोमही नव्हते! वडिलांची चांगली प्रॅक्टिस असूनही बरेचदा आम्हालाही कोणाकडून उसने पैसे घ्यावे लागायचे. वडिलांकडचे सर्वच रुग्ण हातातोंडाशी गाठ असलेले असल्याने अनेकदा कमी पैसे किंवा अगदी मोफत देखील उपचार करावे लागायचे. त्याकाळी उपकाराची जाण असायची, त्यामुळे वडिलांनी पैसा कमी, पण आदर जास्त मिळवला. दवाखान्यात गर्दी झाली आणि मी रिकामा असलो तर, वडिलांना मदत करायला जायचो. केसपेपर काढणे, गोळ्यांच्या पुड्या बांधून देणे अशी कामे करायचो. त्यामुळे अनेक पेशंट मला ओळखायचे. रजियाबी या कायम यायच्या. वडिलांशी त्यांचं नाते भावा-बहिणीचे. अर्थात, अनेक रुग्ण स्त्रिया, खासकरून मुसलमान वडिलांना ‘भाई’ म्हणायच्या तर त्यांची मुले चंद्रकांत मामा!
मध्यमवयीन रजियाबी कुठल्यातरी शाळेत शिक्षिका होत्या. काहीशी बारीक अंगकाठी. काळा बुरखा. चश्मा, अत्यंत सौम्य सोज्वळ चेहरा आणि,प्रेमळ डोळे ही त्यांची छबी माझ्या अजून लक्षात आहे. दवाखान्यात गर्दी नसली तर, त्या माझी आणि आईची आपुलकीने चौकशी करायच्या. मुख्य म्हणजे, लग्नानंतर त्यांनी शिक्षण घेतले, हे विशेष! त्यांचे पती हे सारखे बाहेरगावी राहत (पुढे ते वेगळे झाले). नियमित उत्पन्न नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून नोकरी पकडली. त्यांना दोन मुली.
मी एकदा सातवीत कसल्यातरी परीक्षेत पास झालो, तेव्हा त्यांनी पेन्सिलचा बॉक्स दिल्याचे अजून आठवतंय. माझ्या वडिलांना कामचलाऊ उर्दू लिहिता यायचे. त्यांना उर्दू शिकण्याची इच्छा होती, पण वेळ नव्हता. रजिया आपा म्हणाल्या, “विवेक को भेज दिया करो मेरे घर, मैं सिखा दूंगी उसको उर्दू पढने लिखने को.” मीही राजी होतो, पण त्यांची शाळा सकाळी तर माझी दुपारी, त्यामुळे ते अखेरपर्यंत जमलेच नाही!
हेही वाचा – आंब्याचा मधुर रस अन् अप्रतिम शीर खुर्मा…
रमजान ईदला वडिलांकडे अनेक लोक शीर खुर्मा आणून द्यायचे… पण आपा मात्र त्यांच्या घरी आम्हाला शीर खुर्मा खायला बोलवायच्या, तेही सहकुटुंब. बरेचदा ईदच्या दिवशी जमायचे नाही, मग त्याच्या दुसऱ्या -तिसऱ्या दिवशी आम्ही जायचो. साधारणपणे वडिलांचा दवाखाना आटोपला की, रात्री नऊनंतर जायचो. मोहल्ल्यात गेलो की, चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर त्यांचे छोटेसे घर होते. आम्ही येणार म्हणून चादरी, पडदे नवे असायचे. गुलाबाच्या अत्तराचा घमघमाट असायचा. मी सायकलवर तर वडील, आई आणि बहीण मोटरसायकलवर पोहोचायचो. सण म्हणून घराला सफेदी लावलेली… लोखंडी जाळीदार दरवाजा उघडून आपा हसतमुखाने आमचे स्वागत करायच्या. छोट्याशा खोलीत आईवडील खुर्चीत तर आम्ही बहीणभाऊ पलंगावर बसायचो. काचेच्या बाऊलमध्ये काजू किसमीस शेवाया टाकलेला घट्ट गरमगरम शीर खुर्मा दिला जायचा. इतकी वर्षे झाली तरी, त्याची चव अजून जिभेवर आहे. खरेतर दोन बाऊलमध्येच आमचे पोट तुडुंब भरायचे. पण तरी आग्रह केला जायचा. नंतर आई-वडील आपा गप्पा मारत बसायच्या… त्यात अगदी कौटुंबिक बाबींचाही उल्लेख व्हायचा. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही परत यायचो.
काळ पुढे चालत होता. मी शिक्षणानिमित्ताने पाच-सहा वर्षे बाहेर राहिलो. परत आलो, तोपर्यंत आपांच्या मोठ्या मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेल्याचे आणि लहानही नोकरीला लागल्याचे कळले. एकेदिवशी मला वडील संध्याकाळी सोबत घेऊन गेले, ते थेट आपांकडे! तोपर्यंत त्या अंथरूणावर खिळल्या असल्याचे मला माहीतच नव्हते. अगोदरच कृश असलेले शरीर आणखीनच कृश झाले होते. मला पाहाताच त्यांचा चेहरा उजळला.
हेही वाचा – ॲडिक्शनचा ‘गेम’!
“क्यो विवेक भूल गया क्या मुझे?”
मी काय बोलणार? त्यांच्या पलंगाजवळ बसलो. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. कोण जाणे माझ्या डोळ्यांत अचानक अश्रू आले.
“नहीं बेटा, रोना नहीं. जाना तो हैं सब को एक दिन. मेरे भाई का खयाल रखना और ईद को घर पर आना नही भूलना…”
अत्यंत भावनावश होऊन मी परतलो. पुढे काही दिवसांनी त्या वारल्या. अर्थातच, एखादी व्यक्ती गेली की, त्या घराशी तसे संबंध पुढे राहात नाहीत. त्यांच्या मुलीने ते घर विकून टाकले. नंतर ना ती दिसली, ना मी तिची विचारपूस केली. दरम्यान वडीलही गेले, आईही! पण अजूनही ईद आली की, आपाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. तो अप्रतिम चवीचा शीर खुर्मा आणि मायाळू असलेली माझी एक मानलेली आत्या! त्या काळचे निर्व्याज प्रेम काळाबरोबर लुप्त होत गेले बहुतेक… माझे पाणावलेले डोळे हेच सांगतात. कदाचित, वर स्वर्गात किंवा जन्नतमध्ये दोघेही भाऊ-बहीण आणि आई ईदची वाट पहात असतीलही.


