संध्या हरदास
आमच्या घरात माझ्या थोरल्या बहिणीला रेडिओ ऐकायला भारी आवडायचे. वडील घरात नसले की, कायम विविध भारती, रेडिओ सिलोन, ऑल इंडिया रेडिओ स्टेशनवरून सिनेसंगीताची बरसात व्हायची. वडील शास्त्रीय संगीत गायक आणि आई उत्तम भजन गायिका त्यामुळे चांगल्या सकस सिनेसंगीताची आवड आपसूक मनात रूजत होती. मी लहानपणापासून लता दिदींची चाहती तर ताईला आशाताई आवडायच्या.
मी म्हणायची लतादिदींसारखं ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…’ आणि ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे…’ कुणीच म्हणू शकत नाही, काही बरोबरी होऊच शकत नाही! त्यावर ताईचे आर्ग्युमेंट असायचे, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ आणि ‘दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये…’ या गाण्यांच्या जवळपास कुणीतरी फटकेल का?
हेही वाचा – एक अकेला इस शहर में…
हे बुद्धीला पटायचेही, पण माझं झुकतं माप अजूनही लतादिदींनाच!
आता वाटतं आपण दोघींची तुलना कशाला करतो? तुलना कशासाठी करायची? दोघी आपापल्या ‘ स्टाईल’मध्ये अत्युत्तमच आहेत, तोडीस तोड आहेत, म्हणून तर दोघींनी सिनेसंगीतावर जवळ-जवळ पन्नास वर्षे सलग एकत्रित, एकसमान ‘एकछत्र’ राज्य केले! सतत पैशांभोवती फिरणारी सिनेइंडस्ट्री पेडर रोडच्या ‘दोन महाराणीं’च्या तालावर उगाच नाही नाचली!!
शंभर नंबरी गोड गळ्याचं ईश्वरीय दान आणि ती दैवी देणगी टिकावी म्हणून रोज रियाज करायची तयारी… गाणं संगीताकाराच्या पसंतीस उतरेपर्यंत घंटो मेहनत करायची ऊर्जा बाळगली, म्हणून या दोन गानसम्राज्ञी अनेक वर्षे सुरांचे राज्य स्थापन करू शकल्या… रफीजी लता आणि आशा यांना पेडर रोडच्या महाराणी म्हणायचे.
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
आशाताई, आम्ही खरोखरी सिनेसंगीताची ‘महाराणी’ गमावली असेच वाटते आहे. पण तुमचे ‘लडिवाळ, मधूर, शोख, मुरक्यांनी भरलेले सूर’ आमच्या कायम सोबतीला राहणार आहेत आणि हेच सूर पुढेही अनेक पिढ्यांचे मार्गदर्शन करत राहतील, ही खात्री वाटते.
आशा ताई, तुम्हाला आम्हा सर्व रसिकांची भावपूर्ण, अश्रूपूर्ण, आदरणीय श्रद्धांजली!!!
ओम शांती!!


