मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.
अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणजे काय?
चंद्रभेदन प्राणायामास जोडून लगेचच सूर्यभेदन प्राणायाम केल्यास अनुलोम-विलोम प्राणायाम होतो.
चंद्रभेदन प्राणायाम + सूर्यभेदन प्राणायाम यांची चक्रावर्तन क्रिया = अनुलोम-विलोम प्राणायाम
अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा?
मागील लेखातील प्राणायामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यास करावा. यासाठी ध्यानोपयोगी आसनात अथवा सहजासन घेऊन बसावे. जमिनीवर बसण्यास अवघड वाटत असेल तर खुर्चीवर बसावे.
अनुलोम-विलोम प्राणायाम करताना डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करावी, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करावी आणि अभ्यासाला सुरुवात करावी.
प्रणवमुद्रा घेऊन उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा आणि नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने प्रदीर्घ श्वास सोडावा. यानंतर लगेचच डावी नाकपुडी बंद असताना उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा, तद्नंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने प्रदीर्घ श्वास सोडावा. हे झाले एक आवर्तन. पूरक आणि रेचक यांचे प्रमाण 1:2 असावे. अशा रितीने क्षमतेनुसार अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यास करावा.
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
हा प्राणायाम करताना कुंभक केला नाही तर त्यास अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणतात. या प्राणायामात कुंभक केला तर त्यास नाडीशोधन प्राणायाम असे म्हणतात.
अनुलोम-विलोम प्राणायामाचे आरोग्य लाभ
अनुलोम-विलोम प्राणायामाने संपूर्ण नाडीशुद्धी होत असल्याने शारीरिक स्वाथ्याबरोबर मानसिक आरोग्य देखील लाभते.
- मानसिक ताणतणाव दूर होतात.
- मन शांत, स्वस्थ आणि प्रसन्न होते.
- दिवसभर आनंदी आणि उत्साही वाटते.
- मनाची एकाग्रता वाढते.
- शांत झोप लागते.
- मानसिक विकार कमी होतात.
- मानसिक थकवा दूर होतो.
दैनंदिन योग साधना करताना कपालभाती अभ्यास झाल्यावर अनुलोम-विलोम प्राणायामाचा अभ्यास यथाशक्ती क्षमतेनुसार करावा.
योगाभ्यासातील विविध प्राणायाम प्रकार, कृती आणि फायदे तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभ, याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
आपण पुढील लेखात योगाभ्यासातील भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्याबाबत जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हाटसॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


