माणसांच्या आवाजाचे एक अनाकलनीय गारूड असते. काही आवाज उपजत गोड नसले, तरी त्यांच्यातील भारदस्तपणा आणि त्यातील आर्तता आपल्याला मनापासून भावते. असे काही आवाज स्मृतीमध्ये कायमचे घर करतात. मला आजही आठवतो तो प्रसंग, जेव्हा मी आणि माझी मैत्रीण महाविद्यालयीन दिवसांत रिक्षामधून प्रवास करत होतो. त्या प्रवासात रिक्षावाला अचानक ‘तू वेडा कुंभार’ हे गाणे गुणगुणायला लागला. सुरुवातीला तो आवाज त्याच रिक्षावाल्याचा असेल, यावर आमचा विश्वासच बसला नाही. पण हळूहळू लक्षात आले की, त्या मळकट कपड्यांमागे आणि घामाने डबडबलेल्या शरीरामध्ये एक उत्कृष्ट सुरांची जाण असलेला गायक दडलेला आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत, एका उत्कृष्ट सुरांची जाण असलेल्या त्या व्यक्तीने रिक्षा चालवण्यात आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले होते.
हे केवळ त्या रिक्षावाल्याचे चित्र नाही, तर आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाचे वास्तव आहे. स्त्री असो वा पुरुष, सामाजिक चौकटींच्या शर्यतीत आपले उपजत गुण अनेकदा हरवून जातात. पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ‘लवकरात लवकर आणि अधिक अर्थार्जन’ करण्याच्या दबावापोटी ते आपल्या नैसर्गिक गुणांकडे दुर्लक्ष करतात. ज्या क्षेत्रात त्यांचे मन रमत नाही, अशा ठिकाणी केवळ कुटुंबाची जबाबदारी म्हणून ते आपले आयुष्य पणाला लावतात. परिणामी, त्यांच्यातील मूळ सर्जनशील माणूस त्या शर्यतीत कधीच पूर्ण ताकदीने उतरू शकत नाही किंवा उतरला तरी त्याला हवे ते समाधान मिळू शकत नाही!
हेही वाचा – ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!
स्त्रियांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. लग्नानंतर त्यांना एका विशिष्ट मोजमापात किंवा साच्यात मोजले जाते. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याऐवजी, त्यांच्याकडून ठराविक कौटुंबिक भूमिकांचीच अपेक्षा केली जाते. ज्या जबाबदाऱ्यांसाठी किंवा कामांसाठी त्यांचा मूळ पिंड बनलेलाच नाही, त्या पूर्ण करण्यासाठी त्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत राहतात. या ओढताणीत त्या स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत आणि मग मनात कायम एक अपूर्णतेची भावना राहते.
खरे तर, आपल्यातील अनेकांना ही जाणीव व्हायला खूप उशीर झालेला असतो की, आपण ज्या शर्यतीत धावत आहोत, ती मुळात आपल्यासाठी नव्हतीच. आपण आयुष्यात जेव्हा स्वतःला अपयशी मानतो, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे — बऱ्याचदा आपण चुकीचे नसतो, आपण निवडलेली शर्यत चुकीची असते!
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
शर्यत
जिंकलो नाही कधी
जणू चंद्रावरला डाग होतो
आज उमगले मला
चुकीच्या शर्यतीचा भाग होतो
चालणाऱ्यांच्या गर्दीत या
पंख असलेला महाभाग होतो
आज उमगले मला
चुकीच्या शर्यतीचा भाग होतो
निद्रिस्त वस्तीला आलेली
स्वाभिमानाची जाग होतो
आज उमगले मला
चुकीच्या शर्यतीचा भाग होतो
गार मने इथल्या भ्याड गुलामांची
त्यात मी क्रांतीची आग होतो
आज उमगले मला
चुकीच्या शर्यतीचा भाग होतो


